esakal | सप्तशृंगगडावर कावडयात्रा रद्द; ऑनलाईन पासधारकांनाच प्रवेश, जिल्हाधिकाऱ्यांची माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

Saptshrungi devi

सप्तशृंगगडावर कावडयात्रा रद्द; Online पास पासधारकांनाच प्रवेश

sakal_logo
By
दिगंबर पाटोळे

वणी (जि.नाशिक) : लाखो भाविकांचे श्रद्धा स्थान व उत्तर महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र सप्तशृंगगडावरील (Saptashrungi devi) तब्बल सात महिन्यांपासून बंद असलेले आदिमायेचे मंदिर गुरुवारी (ता. ७) उघडणार असून, आई भगवतीची भेट होणार असल्याने भाविकांमध्ये चैतन्याचे वातावरण आहे. गडावरील सर्व व्यावसायिकांमध्येही समाधानाचे वातावरण असून, दुकाने थाटण्याची लगबग सुरू आहे. परंतु, कोरोना (Corona) विषाणूचा प्रसार होऊ नये म्हणून यंदाची कावडयात्रा मात्र रद्द करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

ऑनलाईन पासधारकांनाच मंदिरात प्रवेश

गडावर नवरात्रोत्सवात पुजारी, देवीचे सेवेकरी, ऑनलाईन पासधारक भाविकांना फक्त मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे तसेच पायी येणारे भाविक अथवा ज्योत नेण्यासाठी व कावडधारकांसाठी, तसेच कोजागिरी पौर्णिमेला तृतीय पंथियांनाही बंदी घातली असल्याचा आदेश जिल्हाधिकारी यांनी दिला आहे. नवरात्रोत्सव यात्रोत्सवा बरोबर कावड यात्रोत्सव ही रद्द करण्यात आली असून भाविकांना ऑनलाईन पासद्वारेच दर्शन घेणे बंधनकारक असेल असे जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी सांगितले. गडावर नवरात्रोत्सव आढावा बैठक संपन्न झाली त्यात ते बोलत होते.

हेही वाचा: Navratra 2021 नवरात्रीत उपवास करताय? हे Healthy Fasting चे प्रकार ट्राय करा!

परंपरा खंडित झाल्याने भाविकांमध्ये हुरहूर

लाखो भाविकांचे श्रद्धास्थान व निसर्ग सौंदर्याने मनमोहीत करणाऱ्या सप्तशृंगगडावरील मंदिराच्या पायऱ्या भाविकांशिवाय सात महिन्यांपासून सुन्यासुन्या होत्या. सुमारे चार हजार लोकसंख्येच्या सप्तशृंगगडावर छोटे- मोठे तीनशे व्यावसायिक आहेत. व्यावसायिकांकडे काम करणारे चारशेच्या वर मजूर, कामगार मंदिर बंद असल्यामुळे बेरोजगार झाले होते. त्यामुळे गडावरची अर्थव्यवस्था ठप्प होत ग्रामस्थांवर उपासमारीची वेळ आली होती. मागील वर्षाचा चैत्रोत्सव व नवरात्रोत्सव कोरोनाच्या पहिल्या लाटेत, तर एप्रिलमधील चैत्रोत्सव दुसऱ्या लाटेत रद्द झाले. आदिमायेचे सलग तीन उत्सव रद्द झाले. त्यामुळे व्यावसायिकांचे मोठे नुकसान झाले. या उत्साहात सहभागी होण्याची परंपरा खंडित झाल्याने भाविकांमध्येही हुरहूर लागून होती.

हेही वाचा: दर्शनाच्या ऑनलाइन पाससाठी दोन्ही डोसचे बंधन! जाणून घ्या नवे नियम

बाहेरगावांच्या व्यावसायिकांना दुकाने थाटण्यास बंदी

दरम्यान, राज्य शासनाने यात्रोत्सवावर बंदी कायम ठेवून गुरुवारपासून आदिमायेचे मंदिर कोरोनाच्या अटी- शर्तीनुसार भाविकांना दर्शनासाठी खुले केल्याने भाविक व व्यावसायिकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. नवरात्र यात्रा रद्द असल्याने गडावर बाहेरगावांहून येणाऱ्या व्यावसायिकांना दुकाने थाटण्यास बंदी घातली आहे. मात्र, गडावरील पूजा साहित्य, प्रसाद, खेळणी, हॉटेल, जनरल साहित्य, किराणा, फोटो फ्रेम, फुल-हार, पेढे आदी दुकानांचा व्यवसाय भाविकांच्या आगमनाने काही प्रमाणात पूर्ववत होणार आहे. व्यावसायिकांनी दुकाने थाटणे सुरू केले आहे. फनिक्युलर रोप-वे ट्रॉली, सप्तशृंगी निवासिनी देवी ट्रस्टने रोजंदारीवर तात्पुरत्या स्वरूपात कर्मचाऱ्यांची नेमणुका केल्या आहेत. व्यावसायिकांवर अवलंबून असलेले मजूर, कामगारांनाही रोजगार उपलब्ध होणार आहे. कामधंद्यासाठी इतरत्र स्थलांतरित झालेले ग्रामस्थ गडावर परतत आहेत. येथील पुरोहितांकडेही अभिषेक, पूजेसाठी भाविक येणार असल्याने गडावरील सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

loading image
go to top