वैद्यकीयच्‍या प्रवेशासाठी कागदपत्र ठेवा सज्‍ज

सीईटी सेलतर्फे यादी जारी; मूळ कागदपत्रांची आवश्‍यकता
वैद्यकीयच्‍या प्रवेशासाठी कागदपत्र ठेवा सज्‍ज
वैद्यकीयच्‍या प्रवेशासाठी कागदपत्र ठेवा सज्‍जसीईटी सेलतर्फे यादी जारी; मूळ कागदपत्रांची आवश्‍यकता

नाशिक : विविध वैद्यकीय अभ्यासक्रमांच्‍या प्रवेशासाठी नुकतीच ‘नीट’ परीक्षा घेतली आहे. नंतर प्रवेशाच्‍या पुढील प्रक्रियेसाठी आवश्‍यक असलेल्‍या कागदपत्रांचा तपशील राज्‍य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने जारी केला आहे. त्‍यानुसार विद्यार्थी-पालकांकडून कागदपत्रांची जमवाजमव करण्याची लगबग सुरू झाली आहे.

नॅशनल टेस्टिंग एजन्‍सी (एनटीए)तर्फे १२ सप्‍टेंबरला नीट परीक्षा झाली होती. सर्व प्रकारच्‍या वैद्यकीय अभ्यासक्रमांसाठी शासकीय, महापालिका, शासन अनुदानित महाविद्यालयांसह विनाअनुदानित महाविद्यालये, अल्‍पसंख्याक महाविद्यालयात नीट परीक्षेच्‍या गुणवत्ता यादीनुसार प्रवेश दिले जाणार आहेत. अशात प्रवेशाच्‍या पुढील प्रक्रियेतील नोंदणी करताना विद्यार्थ्यांना त्‍यांचे मूळ प्रमाणपत्रे अपलोड करावी लागणार आहेत. ही सर्व मूळ कागदपत्रे प्रवेशावेळी महाविद्यालयात जमा करावी लागणार आहेत. ऐनवेळी विद्यार्थ्यांची धावपळ होऊ नये म्‍हणून सीईटी सेलने आवश्‍यक कागदपत्रांची यादी जारी केली आहे.

वैद्यकीय अभ्यासक्रम एमबीबीएस, बीडीएस, आयुर्वेद (बीएएमएस), होमिओपॅथी (बीएचएमएस), युनानी (बीयूएमएस), फिजिओथेरपी व ऑक्‍युपेशन थेरपी (बीपीटीएच, बीओटीएच) यांसह बी. एस्सी. नर्सिंग या शिक्षणक्रमांच्‍या प्रवेशासाठी ही प्रक्रिया राबविली जाईल.

या कागदपत्रांची असेल आवश्‍यकता

नीट यूजी-२०२१ परीक्षेचे प्रवेशपत्र (ॲडमिट कार्ड), सीईटी सेलकडे अर्ज केल्‍याची प्रत, नीट-यूजी २०२१ चे गुणपत्रक (मार्कशीट), नॅशनॅलिटी व डोमिसाईल सर्टिफिकेट, बारावी व दहावीची गुणपत्रिका, आधारकार्ड व वैद्यकीय प्रमाणपत्र (मेडिकल फिटनेस सर्टिफिकेट) सर्व विद्यार्थ्यांना लागणार आहेत. शिवाय राखीव प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवश्‍यकतेनुसार जातप्रमाणपत्र, जात वैधता प्रमाणपत्र, ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध नॉन क्रिमीलेअर सर्टिफिकेट सादर करावे लागेल. दिव्‍यांग विद्यार्थ्यांना अपंगत्‍वाचा दाखला सादर करावा लागणार आहे. अन्‍य आरक्षण, प्रवर्गातील विद्यार्थ्यांना आवश्‍यक ते कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com