
नामपूर : दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर येथील बाजार समितीच्या आवारातील कांद्याचे लिलाव मंगळवार (ता. ७) पासून २० तारखेपर्यंत बंद राहणार आहेत. ऐन कांद्याच्या दरवाढीच्या काळात पहिल्यांदा तब्बल दोन आठवडे कांदा मार्केट बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आर्थिक टंचाई, मंजूर टंचाई, कांदा व्यापाऱ्यांचा विनंती अर्ज आदी बाबींमुळे कांदा खरेदी मार्केट बंद राहील. पणन संचालकांचे तीन दिवसांपेक्षा जास्त मार्केट बंद ठेवू नये असे आदेश असताना त्यला केराची टोपली दाखविण्यात आली आहे. (Keep onion market closed for week Farmers angry as Nampur market closed for 14 days due to Diwali Nashik News)
मंगळवारी (ता. ७) एक सत्र लिलाव सुरू राहणार असून दुपारपासून मार्केट कांदा मार्केट बंद राहणार असल्याचे सचिव संतोष गायकवाड यांनी कळविले आहे.
शेतकऱ्यांनी मंगळवारी माल विक्रीस आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती मनीषा पगार, उपसभापती युवराज पवार, सचिव संतोष गायकवाड यांनी केले आहे. दरम्यान बाजार समिती प्रशासनाने मार्केट बंदचा कालावधी एका आठवड्याने कमी करावा, अशी मागणी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.
उन्हाळ कांद्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक वाढ झाल्याने येथील बाजार समितीच्या आवारात मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे. गेल्या आठवड्यात कांद्याने प्रतिक्विंटल पाच हजार रुपयांचा टप्पाही ओलांडला होता.
त्यानंतर केंद्राने कांद्याचे निर्यातमूल्य सुमारे आठशे डॉलर केल्याने कांद्याच्या दरात सुमारे दीड हजार ते अठराशे रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे. केंद्र शासनाच्या शेतकरीविरोधी निर्णयामुळे शेतकऱ्यांसह व्यापारीही कमालीचे नाराज आहेत.
नामपूर शहर कांदा व्यापारी असोसिएशनच्या मागणीनुसार कांदा मार्केट दोन आठवडे बंद राहणार आहे.
तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस मार्केट बंद करू नये, असे आदेश पणन संचालक यांनी दिले असले तरी नामपूरसह जिल्ह्यातील अनेक बाजार समित्या बंद राहणार असल्याने बाजार समित्यांनी पणनच्या आदेशाला केराची टोपली दाखवली आहे.
ऐन भाववाढीच्या काळात कांदा खरेदी बंद राहणार असल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
बाजार समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीत जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती यतींद्र पगार यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी विकास पॅनेलने सर्वाधिक जागा जिंकून सत्ता हस्तगत केली आहे. परंतु कांदा व्यापाऱ्यांच्या एकाधिकाशाहीमुळे बाजार समितीचे संचालक मंडळ बॅकफूटवर आल्याची शेतकऱ्यांमध्ये चर्चा आहे.
मातीमोल भावाने कांदा विकणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये यंदा भाववाढ झाल्याने समाधानाचे वातावरण होते. परंतु कांदा व्यापारी यांच्या शेडवर दिवाळीमुळे मजूर उपलब्ध नसल्याने मार्केट चौदा दिवस बंद राहणार आहे.
"दिवाळीच्या काळात भेडसावणारी मजूर टंचाई कांद्याचे लिलाव बंदचे प्रमुख कारण आहे. कांद्याच्या दराबाबत दैनंदिन दोलायमान स्थिती असल्याने कांदा व्यापारी माल खरेदी करून धोका पत्करण्यास तयार नसतात. भुसार मार्केट ९ तारखेपासून बंद राहील. शेतकऱ्यांच्या हितासाठी बाजार समिती प्रशासन कटिबद्ध आहे. शेतकऱ्यांनी २१ तारखेला कांदा विक्रीस आणावा. शेतकऱ्यांनी बाजार समिती प्रशासनास सहकार्य करावे."
- युवराज पवार, उपसभापती, नामपूर.
"शेतकऱ्यांनी गेले आठ-नऊ महिने मातीमोल भावाने कांदा विकला असून ऐन भाववाढीच्या काळात मार्केट बंद राहणार असल्याने शेतकरी कमालीचे नाराज आहेत. नऊ महिने साठविलेला चाळीतील कांदा खराब होवू लागला आहे. नामपूरला दैनंदिन सुमारे २७/३० हजार क्विंटल कांद्याची आवक होत असून १४ दिवस तुंबलेला माल एकाच वेळी मार्केटला आल्यास कांद्याचे भाव पाडले जातील. याबाबत संचालक मंडळाने बंदच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा."
-शैलेंद्र कापडणीस, जिल्हा उपाध्यक्ष शेतकरी संघटन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.