Khandoba Shadtrotsava : आजपासून खंडोबा षड्‌त्रोत्‍सवास प्रारंभ; सर्वत्र उत्साहाचे वातावरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Khandoba temple hill

Khandoba Shadtrotsava : आजपासून खंडोबा षड्‌त्रोत्‍सवास प्रारंभ; सर्वत्र उत्साहाचे वातावरण

नाशिक : अवघ्‍या महाराष्‍ट्राचे लोकप्रिय दैवत म्‍हणून खंडोबा प्रसिद्ध आहे. सर्व थरात खंडोबा दैवताची उपासना केली जाते. खंडोबा षड्‌रात्रोत्‍सव हा मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदा ते मार्गशीर्ष शुध्द षष्‍ठी असा सहा दिवस साजरा केला जातो. गुरुवार (ता. २४) पासून षड्‌त्रोत्‍सवास प्रारंभ होत आहे. तसेच गुरुवारी मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेस देवदिवाळी साजरी केली जाते. (Khandoba Shadtrotsava starts from today Excitement everywhere Nashik news)

गेल्‍या आठ दिवसांपासून शहरातील खंडोबाची मंदिरांना रंगरंगोटी करून विद्युत रोषणाईने मंदिरे सजविण्यात आली आहे. षड्‌त्रोत्‍सवासाठी सर्व मंदिरे सज्‍ज झाली असून, सर्वत्र उत्‍सवाचे स्‍वरूप आले आहे. यात प्रामुख्याने खंडोबाची प्रसिद्ध तीर्थस्‍थान असलेले तसेच नाशिक शहर पंचक्रोशीतील सर्वात मोठी यात्रा ओझर येथे भरते. रामतीर्थावरील खंडोबा मंदिर येथे चंपाषष्‍ठी ला यात्रा, देवळाली कॅम्प खंडोबा टेकडी येथे चंपाषष्ठीला १२ बैलगाड्या ओढल्‍या जातात.

आख्यायिका

खंडोबा ऋषी- मुनींच्या विनंतीला मान देवून उन्मत्त झालेल्‍या मणी- मल्‍लांचा वध करून जेजुरीला लिंगद्वय रूपाने जेजुरीला प्रकट झाले. यामुळे जेजुरी जागृत खंडोबा देवस्‍थान म्‍हणून प्रसिद्ध आहे. लाखो भाविक दर्शनासाठी येथे गर्दी करत असतात. तसेच नवसाला पावणारा देव म्‍हणूनही खंडोबा प्रसिद्ध दैवत आहे. गोदातीरी रामतीर्थावर खंडोबा देवस्‍थान असून, त्‍याला लागूनच खंडोबा तीर्थ आहे. गुरुवारपासून खंडोबाचा उत्‍सव सुरू होत असून चंपाषष्ठीला रामतीर्थावर खंडोबाच्या दर्शनासाठी भक्‍तांची गर्दी होत असते.

तसेच या दिवशी रामतीर्थावर यात्रा असते. खंडोबा जनसामान्यांचा देव म्‍हणून त्‍यास भरीत, रोडगा फार प्रिय आहे. तसेच त्‍याच्या उपासनेत भंडारा म्‍हणजेच हळद यास फार महत्त्व आहे. खोबरे- भंडाऱ्याची (हळदीची) उधळण करून ‘येळकोट येळकोट जय मल्‍हार’ अशा गजरात चंपाषष्‍ठीला कुलधर्म केला जातो. यात भाविक तळी भरून देवाची नैवेद्य आरती करतात. नैवेद्यात प्रामुख्याने पुरणपोळी, भरीत, रोडगा यांचा सामावेश असतो.

Elon Musk Takeover Twitter : ट्विटरची टिवटिव थांबणार का?

हेही वाचा: Winter Temperature : उत्तर महाराष्ट्रात थंडीचा जोर कायम; कारसूळला पारा 5 अंश सेल्सिअसवर

देवदिवाळी सहा दिवस

मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेस देवदिवाळी साजरी केली जाते. कार्तिक शुक्‍ल एकादशीला चातुर्मासाची समाप्ती होते. भगवान विष्‍णू निद्रावस्‍थेतेतून जागे होतात. म्‍हणून मार्गशीर्ष महिन्यात सर्व देवांना आमंत्रण देवून देवांची दिवाळी साजरी केली जाते. सर्व देवदेवतांचे स्‍मरण करून देवदिवाळी साजरी केली जाते. हा उत्‍सव सहा दिवस केला जातो. या उत्‍सवाची सांगता चंपाषष्ठी ला सर्व देवतांना नैवेद्य दाखवून, कुलधर्म करून मोठया उत्‍साहात केली जाते.

असे जेजुरी राजधानी जयाची ।
सती म्हाळसा पट्टराणीच साची ।।
असा थोर मार्तंडराणा मल्हारी ।
सदा वंदितो देव तो खड्गधारी ।।

हेही वाचा: Nashik Crime News : जानोरी MIDCत अवैध Biodiesel निर्मिती; 1 कोटींचे अवैध इंधन जप्त