जळगावच्या खुनांची मालिका थांबता थांबेना! मोबाईलच्या वादातून चॉपरने भोसकून हत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime-Scene

जळगावच्या खुनांची मालिका थांबता थांबेना! मोबाईलच्या वादातून चॉपरने भोसकून हत्या

जळगाव : शहरातील खुनांची मालिका थांबता थांबेना, अशी परिस्थिती आहे. आठ-आठ दिवसांत खुनाच्या घटनांची पुनरावृत्ती होत असून महिन्यात एक तरी खुनाची घटना घडतेच इतकी गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. १८ ते २५ वयातील तरुणांमध्ये होणाऱ्या तत्कालिक वादातून खुनासारख्या गंभीर घटना घडू लागल्याने जळगाव शहरात मरण स्वस्त झाल्याची परिस्थिती आहे. अक्षय अजय चव्हाण (वय २३) हा तरुण मित्रांसह गेला असताना किरकोळ कारणावरून वाद होऊन त्याचा चॉपरने भोसकून खून करण्यात आल्याची घटना घडली. (Latest Marathi News)

भारत बंडू राठोड या प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार गणेश कॉलनीतील देशी दारु अड्ड्यासमोरच मोबाईलवरून साडेपाच वाजेच्या सुमारास वाद उफाळला. अक्षय अजय चव्हाण (वय २३), अमरसिंग ओंकार चव्हाण आणि युवराज मोतिलाल चव्हाण असे तिघे मित्र सोबत होते. अमरसिंग दारू प्यायला बसला असताना त्याच्या मोबाईलवरून वादाला सुरवात झाल्यावर अक्षयचा बाळा पवार याच्या भावाशी वाद होऊन अक्षयने बाळाच्या भावाच्या डोक्यात दगड मारुन त्याला जखमी केले. त्याने तत्काळ त्यांच्या भावाला फोन करून पोरं बोलावून घेतले. महामार्गाच्या बाजूलाच दोन्ही गटात लाकडी काठ्या, दगडांनी घमासान हाणामारी झाली. बाळा पवार नावाच्या तरुणाने अक्षय चव्हाण याच्या पोटात एकामागून एक सपासप चॉपर खुपसून त्याला जमिनीवर आडवा केला. त्यानंतर युवराज जाधव याच्या पाठीतही चॉपर मारुन त्याला जखमी केले.

हेही वाचा: तर मुख्यमंत्रीही जनतेतून येऊद्यात, Dhananjay Munde यांचे BJPला चिमटे

आताच कामाला लागला आणि...

अजय हा आई रेणूका, भाऊ शैलेश आणि वडील अजय चव्हाण यांच्यासह पिंप्राळा मढी चौकात वास्तव्यास होता. अजय नुकताच बांभोरी जवळील जैन कंपनीत कामाला लागला होता. रविवारी सुटीमुळे तो घरीच असल्याने मित्रांसोबत बाहेर निघाला आणि थोड्याच वेळात त्याच्या मृत्यूची बातमी आल्याचे सांगता भाऊ शैलेश हुंदके देत आक्रोश करू लागला. मुलाला बघण्यासाठी त्याच्या आईने रुग्णालय डोक्यावर घेत माझ्या मुलाला बघू तर द्या... असा आर्जव केला.

रुग्णालयात बदला घेण्यावरून हाणामारी

अक्षयला जिल्हा रुग्णालयात आणल्यावर डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. अक्षयचा मृत्यू झाल्याचे कळताच रुग्णालयात आलेल्या तरुणांच्या गर्दीमध्ये वाद झाला. खुनाचा बदला घेण्यावरून वाद होऊन तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. घटनेची माहिती कळताच निरीक्षक विजय ठाकूरवाड यांच्यासह कर्मचारी घटनास्थळी दाखल झाल्याने जमाव पांगला.

३०७ किंग अक्षय

अक्षय चव्हाण याची कौटुंबिक परिस्थिती जेमतेम असून मित्रमंडळी हाणामाऱ्या करणाऱ्यांपैकी असून त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर चक्क ३०७ किंग लिहून त्याने फोटो पोस्ट केल्याचे आढळून आले.

हेही वाचा: पवारांच्या बालेकिल्ल्यासाठी मनसेची रणनीती; वसंत मोरेंवर सोपवली महत्वाची जबाबदारी

शहरातील खुनांची मालिका अशी...

- गोलाणी मार्केट : १६ मे २०२२ - मुकेश राजपूत (वय ३२)

- रेल्वे मालधक्का : २५ मे २०२२ - अनिकेत गायकवाड (वय २९)

- कासमवाडी बाजार : ३ जून २०२२ - सागर पाटील (वय २७)

-शाहुनगर जळकी मिल : २० जुलै २०२२ - रहिम शहा ऊर्फ रमा (वय ३०)

-हरिविठ्ठलनगर बाजारचौक : २३ जुलै २०२२ - दिनेश भोई (वय ३२)

Web Title: Killed With Chopper Stabbed Over Mobile Phone Dispute In Jalgaon Crime News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :JalgaonCrime News