Kisan Long March : शेतकऱ्यांच्या लाँग मार्चची मुंबईकडे धाव; जिल्ह्यातील शेतकरी सहभागी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Due to the historical long march of the farmers, the march came to the area of ​​Gonde-Wadiwhe on the Mumbai-Agra highway.

Kisan Long March : शेतकऱ्यांच्या लाँग मार्चची मुंबईकडे धाव; जिल्ह्यातील शेतकरी सहभागी

इगतपुरी (जि. नाशिक) : शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या विविध मागण्यांसाठी शेतकऱ्यांच्या ऐतिहासिक लाँग मार्चने मुंबईकडे जाण्यासाठी भल्या पहाटेपासून तयारी करीत चिमणबारी जवळून मंगळवारी (ता. १४) सकाळी घोटी-इगतपुरीकडे कूच केली.

या लाँग मार्चमुळे नेहमी विविध प्रकारच्या वाहनांनी फुलणारा मुंबई आग्रा महामार्ग अक्षरशः लाल बावट्याच्या झेंड्यानी बहरला होता. कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही अशा कडव्या घोषणांनी महामार्ग दुमदुमला होता. (Kisan Long March Run to Mumbai Participating farmers in district nashik news)

दुपारच्या रणरणत्या उन्हातान्हाची, झळांची पर्वा न करता हा विशाल मोर्चा मुंबईच्या दिशेने मजल, दरमजल करीत आगेकूच करीत होता. यासाठी मुंबई आग्रा महामार्गावरील वाहतूक एकेरी करण्यात आली होती. किसान सभेच्या नेतृत्वातील या लाँग मार्चमध्ये नाशिक जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील हजारो शेतकरी सहभागी झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे व समस्यांना सरकारकडून कायम दुर्लक्ष केले आहे. सरकारने वनाधिकार कायद्याच्या अंमलबजावणी बाबत होणारी दिरंगाई, गारपीटग्रस्तांना मदतीबाबत सुरु असलेली उपेक्षा यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष असल्याचे यावेळी किसान सभेच्या नेत्यांनी सांगितले.

आमदार जे. पी. गावित, किसन गुजर, डॉ. अजित नवले, सावळीराम पवार, सुभाष चौधरी, इंद्रजित गावित आदी या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. दररोज किमान ३० ते ३५ किलोमीटर चालण्याचे नियोजन केले आहे.


हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

वाडीवऱ्हे येथे स्वागत

शेतकरी, कामगार व सर्वसामान्य नागरिकांच्या मागण्यांसाठी विधानसभेवर जाण्यासाठी कम्युनिस्ट पक्ष, मार्क्सवादीच्या नेतृत्वाखाली व आमदार जे. पी. गावित यांच्या पुढाकाराने शेतकरी व कामगारांच्या मागण्यांसाठी मोर्चाचे संयोजन करण्यात आले आहे.

या मोर्चात शेतकरी नेते डॉ. उदय नारकर, डॉ. अजित नवले, अजय बुरांडे, कामगार नेते डॉ. डी. एल. कराड, सीताराम ठोंबरे, देवीदास आडोळे, तानाजी जायभावे, तुकाराम सोनजे, संतोष काकडे, मोहन जाधव, हिरामण तेलोरे, आत्माराम डावरे, संतोष कुलकर्णी, अप्पासाहेब भोले, कल्पना शिंदे यांनी मोर्चाचे स्वागत केले.