Employees Strike: सिन्नरला कार्यालयांमध्ये शुकशुकाट; विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टी, पालकांची नाराजी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

employee strike

Employees Strike: सिन्नरला कार्यालयांमध्ये शुकशुकाट; विद्यार्थ्यांना अघोषित सुट्टी, पालकांची नाराजी

सिन्नर (जि. नाशिक) : राज्य सरकारने कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी कर्मचारी संघटनांच्या महासंघाने आजपासून राज्यव्यापी संप पुकारला आहे. सिन्नर तालुक्यात महसूल विभागातील ५० व जिल्हा परिषदस्तरावर विविध विभागांमध्ये कार्यरत असलेल्या ८४५ कर्मचाऱ्यांनी या संपात सहभाग घेतला आहे.

त्यामुळे तहसील कार्यालयासह पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद संलग्न आस्थापनांमध्ये शुकशुकाट बघायला मिळाला. शिक्षक संघटना संपात सहभागी असल्याने शाळांना अघोषित सुट्टी देण्यात आल्याचे चित्र ग्रामीण भागात होते. आरोग्य केंद्रस्तरावर देखील कर्मचारी संपात उतरल्याने रुग्णांना माघारी फिरण्याची वेळ आली. (Sinnars employees strike in office Unannounced holiday to students parents displeasure nashik news)

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

जिल्हा परिषद अंतर्गत येणाऱ्या सर्वच विभागातील कर्मचारी या संपात सहभागी झाल्यामुळे नागरिकांना गैरसोयीचा सामना करावा लागला. तहसील कार्यालयात तहसीलदार, नायब तहसीलदार व कंत्राटी कामगार वगळता कोणीही कर्मचारी कामावर हजर न झाल्यामुळे ग्रामीण भागातून कामे घेऊन येणाऱ्या नागरिकांची अडचण झाली.

पंचायत समिती स्तरावर देखील सर्वच विभागांमध्ये शुकशुकाट होता.शिक्षक संघटना संपात उतरल्यामुळे शाळांना देखील अघोषित सुट्टी मिळाली. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरविल्या जात आहेत.

त्यामुळे सकाळी पायपीट करून विद्यार्थी शाळेपर्यंत पोचले. आणि तेथून त्यांना शिक्षकांनी पुन्हा घरी जायला सांगितले. सिन्नर तहसील कार्यालयात तहसीलदार एकनाथ बंगाळे यांच्यासह सर्वनायक तहसीलदार कार्यालयात उपस्थित होते. पंचायत समितीमध्ये कार्यरत १०४८ कर्मचाऱ्यांपैकी ८४५ कर्मचारी संपात उतरले होते. तर उर्वरित कर्मचारी पूर्वपरवानगीने गैरहजर होते.