esakal | अंतर्गत राजकारणामुळेच ऑक्सिजनचा तुटवडा : सुधाकर बडगुजर

बोलून बातमी शोधा

Sudhakar Badgujar
अंतर्गत राजकारणामुळेच ऑक्सिजनचा तुटवडा : सुधाकर बडगुजर
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा


नाशिक : नाशिक शहर आणि जिल्ह्यात ऑक्सिजनअभावी भयावह परिस्थिती असून, त्याला सर्वस्वी प्रशासकीय यंत्रणेतील समन्वयाचा अभाव व अंतर्गत राजकारण कारणीभूत आहेत, असा गंभीर आरोप शिवसेना महानगरप्रमुख सुधाकर बडगुजर यांनी केला. प्रशासकीय यंत्रणा याबाबत एकमेकांकडे अंगुलिनिर्देश करण्यात मग्न आहे. याला काय म्हणावे, असेही बडगुजर म्हणाले.


महापालिका क्षेत्रात १४८ कोविड सेंटरला मंजुरी दिली आहे. त्यांना ऑक्सिजनचा पुरवठा करण्याची जबाबदारी महापालिका, जिल्हाधिकारी कार्यालय व ‘एफडीआय’ची आहे. मात्र ऑक्सिजन पुरवठ्याबाबत त्यांच्यात समन्वयाचा अभाव आहे. जिल्हाधिकारी कार्यालय म्हणते जबाबदारी ‘एफडीआय’ची आहे, तर ‘एफडीआय’ म्हणते ही जबाबदारी महसूल विभागाची आहे. यासंदर्भात महापालिका ‘नोडल एजन्सी’ म्हणून काम करते. महापालिका आयुक्तांनी डॉ. झाकिर हुसेन हॉस्पिटल आणि बिटको हॉस्पिटलसाठी अनुक्रमे २० केएल आणि १० केएलच्या टाक्या उभारल्या नसत्या, तर ऑक्सिजनअभावी काय परिस्थिती झाली असती, याची कल्पनाच करवत नाही. नाशिकला ऑक्सिजनचा पुरवठा पुण्याहून होतो. त्या अर्थाने बघितले तर ऑक्सिजनबाबत नाशिक महापालिका स्वयंभू आहे, असेच म्हणावे लागेल. उर्वरित जिल्हा आणि अन्य क्षेत्रासाठी १३८ टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. मात्र शासनाकडून फक्त ८८ टन इतकाच साठा उपलब्ध होतो. ऑक्सिजनच्या वाटपाबाबतची परिस्थिती वेगळीच आहे. ज्याचे राजकीय वजन जास्त त्याला जास्त ऑक्सिजन मिळते आणि सर्वसामान्य रुग्णालयांना मात्र ऑक्सिजनसाठी प्रशासकीय यंत्रणेच्या हातपाया पडण्याची वेळ येते, हे दुर्दैवच म्हणावे लागेल. समन्यायी पद्धतीने ऑक्सिजनचा पुरवठा व्हावा यासाठी अनेक हॉस्पिटलच्या संचालकांनी आंदोलन केले व त्यांनी कथन केलेली वस्तुस्थिती भयावह आणि मन हेलावून टाकणारी असल्याचे बडगुजर यांनी निदर्शनास आणले. त्यामुळे ऑक्सिजनच्या पुरवठ्याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय आणि ‘एफडीआय’ यांनी एकत्रित तोडगा काढणे गरजेचे आहे. राज्याच्या मुख्य सचिवांनी यात स्वतः लक्ष घालून नाशिकला योग्य प्रमाणात ऑक्सिजनचा साठा करण्याची व्यवस्था न केल्यास नाशिकमधील परिस्थिती अधिक भयावह होईल, असा इशाराही बडगुजर यांनी दिला. महापालिका आणि जिल्हाधिकारी कार्यालयाने स्वतंत्ररीत्या प्रत्येकी दोन टँकरची व्यवस्था केल्यास ऑक्सिजनबाबत सुसूत्रता निर्माण होऊन सर्वांनाच दिलासा मिळेल, असा विश्वासही बडगुजर यांनी व्यक्त केला.

हेही वाचा: नाशिक शहरात लसीकरण मोहिमेला पुन्हा ब्रेक!