
Malegaon : लिंबुची आवक वाढल्याने दरात निम्म्याने घसरण
मालेगाव (जि. नाशिक) : शहरासह कसमादे परिसरात मार्च महिन्यापासून लिंबुचे भाव (Rate of Lemon) कडाडले होते. दहा रुपये नगाप्रमाणे लिंबू विकला गेला. मेच्या सुरुवातीपासून लिंबूची आवक वाढली आहे. त्यामुळे मार्च व एप्रिल महिन्यात २०० रुपये किलोप्रमाणे मिळणाऱ्या लिंबूचा भाव सध्या शंभर रुपयावर आला आहे. येथील भाजीपाला बाजारात सध्या लिंबूची आवक अडीचशे कॅरेटपर्यंत वाढली आहे. भाव उतरल्याने छोट्या व्यावसायिकांसह ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. (Lemon prices fall by half due to Incoming of lemons Nashik News)
कोरोना नियंत्रणात आल्याने या वर्षी फेब्रुवारीच्या सुरुवातीपासूनच रसवंतीगृहे फुलली होती. लिंबू शिकंजी, सोडा, सरबत यासह ठिकठिकाणी लिंबुचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात होता. शहर व परिसरात मार्चच्या सुरवातीपासूनच कडक ऊन पडत असल्याने या वर्षी रसवंतीगृह गजबजून गेली आहेत. लिंबु सरबतचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला. दरम्यानच्या काळात आवक घटल्याने भाव कडाडले. घाऊक बाजारात दोनशे रुपये किलोने लिंबू विकला गेला. दहा रुपये नगाप्रमाणे मिळणारा लिंबू सामान्यांच्या घरातून जवळपास बेपत्ता होता. लिंबूचे भाव वाढल्यामुळे यावर्षी लिंबू सरबत, उसाचा रस, लिंबू शिकंजी यांचे दरही दहा रुपयांवरुन १५ रुपये झाले आहेत.
हेही वाचा: Nashik : सिटीलिंकतर्फे विद्यार्थ्यांसाठी बसफेरी
येथील भाजीपाला बाजारात फेब्रुवारी ते एप्रिल महिन्यापर्यंत जवळपास प्रतिदिन १०० कॅरेट लिंबू विक्रीसाठी येत होते. कसमादेसह चाळीसगाव तालुक्यातून लिंबूची आवक होती. गेल्या आठवड्यापासून आवक वाढली आहे. जवळपास रोज अडीचशेपेक्षा अधिक कॅरेट येथे विक्रीसाठी येत आहेत. मध्यम आकाराचा नवीन लिंबू वजीरखेडे, झोडगे, देवारपाडे, दाभाडी या ठिकाणाहून येत आहे. मालेगावी लिंबू स्वस्त मिळत असल्याने धुळे, इगतपुरी, नाशिक आदी ठिकाणचे व्यापारी येथे माल घेण्यासाठी येत आहेत. या वर्षी लिंबूला विक्रमी भाव मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान व्यक्त होत होते. आवक वाढल्यामुळे भाव आणखी कमी होतील की काय, याची शेतकऱ्यांना भिती आहे.
हेही वाचा: धावपळीच्या युगातही आजही पारंपारिकेतला महत्व
"अक्षयतृतीयेच्या सणानंतर लिंबूचा नवीन माल बाजारात दाखल झाला. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात लिंबुची आवक वाढणार आहे. त्यामुळे लिंबूचे भाव आणखी कमी होऊ शकतील. साधारणत: जून महिन्यापासून लिंबूला मागणी कमी होत जाते."
- कृष्णा बाने, घाऊक व्यापारी, मालेगाव
Web Title: Lemon Prices Fall By Half Due To Incoming Of Lemons Nashik News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..