पाठशिवणीच्या खेळात वाघाची मावशी अन् बिबट्याची थेट विहिरीत उडी! : Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

A leopard and cat ying in a well at Thangaon

Nashik News : पाठशिवणीच्या खेळात वाघाची मावशी अन् बिबट्याची थेट विहिरीत उडी!

सिन्नर (जि. नाशिक) : सावज म्हणून हेरलेल्या मांजराचा पाठलाग करणे बिबट्याच्या चांगलेच अंगलट आले. मांजराने जीव वाचवण्यासाठी मारलेली उडी तिला थेट विहिरीत घेऊन गेली आणि तिच्यापाठोपाठ बिबट्या देखील विहिरीत पडला.

या कृतीने दोघांचाही जीव धोक्यात आला खरा... मात्र, नशीब बलवत्तर असल्याने त्या दोघांची दुसऱ्या दिवशी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रेस्क्यू ऑपरेशन राबवत सुखरूप सुटका केली.

सुमारे ५० फूट खोल पाणी असलेल्या विहिरीत बिबट्याला बसायला वीज पंपासाठी रोवलेल्या लोखंडी अँगलचा आसरा मिळाला. मांजराने देखील रात्रभर बिबट्याची शेपूट पकडून आपला जीव वाचवला. (leopard and cat jump directly caught into well at sinnar nashik news)

सिन्नर तालुक्यातील ठाणगाव पट्ट्यात टेंभुरवाडी येथील अण्णासाहेब सांगळे यांच्या विहिरीत बिबट्या अन मांजराची जोडी पडल्याचा प्रकार मंगळवारी सकाळी लक्षात आला. भल्या सकाळी बिबट्याची डरकाळी ऐकून सांगळे कुटुंबीयांनी विहिरीकडे धाव घेतल्यावर विहिरीत मोटार ठेवण्यासाठी असलेल्या लोखंडी अँगलवर बिबट्या बसल्याचे आढळून आले.

पण त्याच्या शेपटीच्या आधार घेत धडपडणारी मांजर देखील दिसली. रात्री पाठशिवणीच्या खेळात दोघेही विहिरीत पडल्याचा एव्हाना अंदाज आला होता. या विहिरीत सुमारे ५० फूट खोल पाणी होते. पण बिबट्या ज्या आधारावर बसला होता, तो अँगल देखील पाण्यात बुडालेला होता.

श्री. सांगळे यांनी वनपाल सुनील झोपे यांना कळवले. बिबट्या मांजराचा पाठलाग करताना विहिरीत पडल्याची माहिती श्री. झोपे यांनी सिन्नरच्या वनपरिक्षेत्र अधिकारी मनीषा जाधव यांना सांगितली.

त्यानंतर नाशिक पश्चिम विभागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्याला वाचवण्यासाठी रेस्क्यू पथक सिन्नरला रवाना करण्यात आले. हे पथक पोहोचेपर्यंत वनरक्षक पोपट बिन्नर, गोरख पाटील, दत्तात्रय इघे, आकाश रुपवते, किरण गोर्डे, चंद्रमणी तांबे, रोहित लोणारे, वसंत आव्हाड हे देखील घटनास्थळी हजर झाले होते.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

विहिरीभोवती असलेली बघ्यांची गर्दी दूर करत वनविभागाच्या पथकाने बचाव मोहिमेला सुरुवात केली. प्रारंभी जाड दोर विहिरीत सोडत त्या आधाराने मांजराला पाण्याबाहेर काढण्यात यश मिळाले. विहिरीच्या कठड्यापर्यंत आल्यावर मांजराने उडी मारत जवळच्या घराकडे धूम ठोकली. नाशिक येथून आणलेला विशेष पिंजरा त्यानंतर विहिरीत सोडण्यात आला.

हा पिंजरा विहिरीत सोडता क्षणीच पाण्यात बुडालेल्या अँगलवर बसलेल्या बिबट्याने या पिंजऱ्यात उडी मारली. अवघ्या अर्ध्या तासात वनविभागाच्या बचाव पथकाला बिबट्या आणि मांजर दोघांनाही बाहेर काढण्यात यश आले.

बिबट्याला तातडीने सिन्नरच्या मोहदरी घाटातील वनउद्यानात हलवण्यात आले. तेथे या बिबट्याची वैद्यकीय तपासणी करून औषध उपचार करण्यात आले. तपासणीअंती हा बिबट्या मादी प्रकारातील असून तिचे वय अडीच ते तीन वर्ष असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

वैद्यकीय निगराणीखाली या बिबट्याला औषधे व जेवण देण्यात आले. त्यानंतर उप वनसंरक्षकांच्या आदेशाने त्यास सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले.

टॅग्स :NashikLeopardCat