Latest Marathi News | मागणी नसल्याने सर्वच भाज्या मातीमोल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

vegetables market

Nashik News : मागणी नसल्याने सर्वच भाज्या मातीमोल

नाशिक : गत पंधरा दिवसांपासून बाजार समितीत पालेभाज्यांसह सर्वच प्रकारच्या भाज्यांच्या आवकेत मोठी वाढ झाली आहे. तुलनेत मागणी घटल्याने सर्वच भाज्या अवघ्या वीस ते तीस रुपये किलोने उपलब्ध होत्या. त्यातच बुधवारी (ता. १४) दुपारी चारच्या सुमारास सुरू झालेल्या अवकाळी पावसाने विक्रेत्यांनी मिळेल त्या भावात विक्रीस पसंती दिली. (less demand for vegetables in market due to climate change nashik Latest Marathi News)

गेल्या काही दिवसांपासून नाशिक बाजार समितीतील पालेभाज्या, फळभाज्यांसह वेलवर्गीय भाज्यांच्या आवकेत मोठी वाढ झाली आहे. मात्र त्या तुलनेत मागणी नसल्याने स्थानिक बाजारातही भाज्यांचे दर कोसळल्याने शेतकऱ्यांना उत्पादन खर्च निघणेही अवघड झाले. चांगल्या दर्जाचा टोमॅटो अवघ्या दहा वीस रुपये किलोने उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च निघणेही अवघड बनले.

त्यातच अवकाळीची भर पडली. बुधवार आठवडे बाजारात मेथी, कोथिंबीर, पालक या भाज्यांच्या जुड्यांसह फ्लॉवर कंद अवघ्या दहा रूपयांत उपलब्ध होता. याशिवाय कोबीचा गड्डा दहा ते पंधरा रूपयांत दोन उपलब्ध होते. चंपाषष्ठीमुळे गत आठवड्यात भाव खाऊन गेलेले भरताचे वांगीही वीस ते तीस रुपये किलोने उपलब्ध होती.

हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

हेही वाचा: Nashik Crime News : जायखेडा पोलिसांनी कारवाईत जप्त केला 30 लाखांचा गुटखा!

अवकाळीने पळापळ

ढगाळ वातावरणामुळे सूर्यदर्शन झालेले नाही. त्यातच चार वाजेच्या सुमारास सुरू झालेल्या अवकाळी पावसाने आठवडे बाजारात खरेदीदारांसह विक्रेत्यांची एकच पळापळ झाली. अचानक आलेल्या पावसाने नुकसान नको म्हणून अनेकांनी मिळेल त्या भावात भाजीपाल्याची विक्री करून घर गाठणे पसंत केले. त्यामुळे गृहिणींना मात्र सलग तिसऱ्या आठवड्यात त्यांच्या बजेटमध्ये भाजीपाला उपलब्ध झाला.

म्हसोबा महाराज मंदिरालगत स्मार्टसिटीकडून रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. याच ठिकाणी दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. मात्र या बाजाराच्या जागेवर मोठ्या प्रमाणावर रस्ता खोदून ठेवल्याने विक्रेत्यांची मोठी अडचण झाली आहे. त्यामुळे या व्यावसायिकांनी आज स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन हे काम त्वरित पूर्ण करण्याचा आग्रह धरला.

हेही वाचा: Nashik News : आकडेमोडीत रमणारा अधिकारी पहिल्‍याच प्रयत्‍नात बनला Ironman