
नामपूर : शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात काही बड्या अधिकाऱ्यांनी दलालांना हाताशी धरून गुणवंत विद्यार्थ्यांचे शोषण केले आहे. बेकायदेशीरपणे केलेल्या कोट्यवधी रुपयांच्या टीईटी परीक्षा घोटाळ्यातील सुमारे आठ हजार शिक्षकांना पुणे येथील राज्य परीक्षा परिषदेने लगाम लावला आहे. आगामी काळात टीईटी परीक्षा (TET Exam) घोटाळ्यातील दोषींना कधीच परीक्षा देता येणार नसल्याचा निर्णय घेण्यात आला असून, संबंधित बोगस शिक्षकांची यादी परीक्षा परिषदेने प्रसिद्ध केली आहे. टीईटी घोटाळ्यात खासगी, माध्यमिक शाळांमधील सर्वाधिक शिक्षकांचा भरणा आहे. (Latest Marathi News)
टीईटी परीक्षा घोटाळा प्रकरणामुळे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये खळबळ उडाली होती. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेत गैरप्रकार केलेल्या उमेदवारांची यादी परीक्षा परिषदेने पोर्टलवर जाहीर केली असून, ७ हजार ८७४ उमेदवारांची टीईटीची प्रमाणपत्रे रद्द करण्यासह त्यांना आगामी काळात टीईटी परीक्षा देण्यास कायमस्वरुपी प्रतिबंध घालण्यात आला आहे. परीक्षा परिषदेच्या निर्णयाचे ग्रामीण भागातील डीएड- बीएडधारकांनी स्वागत केले आहे.
२०२० मध्ये झालेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये झालेल्या गैरव्यवहाराबाबत पुणे येथील सायबर पोलिस ठाण्यात माहिती तंत्रज्ञान अधिनियम, २००० कलम ६६ (डी), महाराष्ट्र विद्यापिठ मंडळाच्या परीक्षामध्ये होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध अधिनियम, १९९० (सुधारीत) प्रमाणे १६ डिसेंबर २०२१ ला फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. तपासादरम्यान परीक्षार्थीच्या उत्तरपत्रिकांची कसून तपासणी केली असता ७ हजार ८८० उमेदवारांनी परीक्षेत गैरप्रकार केल्याचे निष्पन्न झाले आहे. अशाच स्वरूपाच्या व्यापम घोटाळयात सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाले असतील.
कायमस्वरूपी प्रतिबंध
घोटाळ्यामध्ये सहभागी उमेदवारांना वेगळे करावे. तसेच, परीक्षा रद्द न करता सदर उमेदवारांचे निकाल वेगळे काढून कोणतीही कारणे दाखवा नोटीस न देता त्यांचे निकाल रद्द करावेत. त्यानुसार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने उमेदवारांची सदर परिक्षेतील संपूर्ण संपादणूक रद्द करून यापुढे घेण्यात येणाऱ्या शिक्षक पात्रता परिक्षेसाठी कायमस्वरूपी प्रतिबंधित करण्याचा निर्णय घेतला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.