
Nashik News : 12 हजार स्वयंरोजगारांना होणार कर्ज वितरण
नाशिक : गेल्या तीन महिन्यांत खासदार हेमंत गोडसे (Hemant Godse) यांच्या पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील विविध बँकांनी १२ हजार प्रलंबित कर्ज प्रकरणे निकाली काढली असून सुमारे दोनशे कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण केले.
२८ फेब्रुवारीला संबंधितांना कर्ज वितरण करण्यात येणार आहे. (Loans will be distributed to 12 thousand self employed on 28 feb meeting nashik news)
जिल्ह्यातील विविध बँका आणि महामंडळाकडून कर्ज प्रकरणे काढली जात नसल्याच्या तक्रारीवरून खासदार गोडसे यांनी यांनी तीन महिन्यांपासून स्वयंरोजगारांची कर्ज प्रकरणे निकाली निघावीत, यासाठी प्रयत्न सुरू केले होते. बॅक ऑफ महाराष्ट्र, बडोदा बँक, सेंट्रल बँक,
स्टेट बँक, एचडीएफसी, अॅक्सिस बॅक, इंडियन बॅक, युनियन बॅक, इंडियन ओव्हरसिस, एचडीएफसी बँक, पंजाब नॅशनल, पंजाब -सिंध बॅक, आयसीआयसीआय, कोटक महिंद्रा, आयडीएफसी, कॅथलिक, फेडरल, सिटी युनियन, कर्नाटका बॅक, आरबीएल आदी बँकांमध्ये स्वतः जात वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा प्रलंबित स्वयंरोजगाराच्या कर्ज प्रकरणांच्या मंजुरीसाठी पाठपुरावा केला.
हेही वाचा : हिंडेनबर्ग अहवालाचा फटका भाजपला भविष्यात बसणार?
कोणत्या बँकांनी नेमके किती कर्ज प्रकरणे निकाली काढली याचा सविस्तर आढावा घेण्यासाठी खासदार गोडसे यांनी आज सर्वच बँका आणि महामंडळाच्या अधिकाऱ्यांची एकत्रित बैठक नाशिक पंचायत समितीच्या सभागृहात घेतली. बैठकीस महाराष्ट्र बँकेचे (एलडीएम) जिल्हा मॅनेजर आर. आर. पाटील, अजित सुरसे, डीआयसीचे मॅनेजर महाजन, केव्हिआयबीचे सुधीर केंजळे आदी मान्यवरांसह पंचवीस बँकांचे अधिकारी उपस्थित होते.
गेल्या दोन महिन्यात जिल्ह्यातील शासनाच्या आठ महामंडळांकडून डीआयसी, मुद्रा, बचतगट, स्वनिधी आदी योजनांतर्गत विविध बँकांकडे आलेली बारा हजार कर्ज प्रकरणे निकाली काढल्याची माहिती उपस्थिती अधिकाऱ्यांकडून उपलब्ध झाली आहे.
मंजूर करण्यात आलेल्या कर्ज प्रकरणांची रक्कम सुमारे दोनशे कोटीच्या घरात आहे. मंजूर झालेल्या लाभार्थींना २८ फेब्रुवारीला कालिदास कलामंदिर येथे कर्ज मंजुरी पत्र व धनादेश देण्यात येणार असल्याचे गोडसे यांनी सांगितले.