सोमवारची मुलाखतः इटलीच्‍या वाईनरीज्‌मध्ये ''मेड इन नाशिक'' उपकरणे

सोमवारची मुलाखतः इटलीच्‍या वाईनरीज्‌मध्ये ''मेड इन नाशिक'' उपकरणे
Published on: 
मेन लोगो : सोमवारची मुलाखत इटलीच्‍या वाईनरीज्‌मध्ये ''मेड इन नाशिक'' उपकरणे संजय झा : ‘एनव्हिजन इक्विपमेंट्स’चे क्षेत्र युरोपात विस्‍तारण्यावर भर लीड अवघ्या दोन दशकांच्‍या वाटचाल करताना, एनव्‍हिजन इक्‍विपमेंट्‌सने झपाट्याने विकास साधला आहे. जगभरात वाइन उत्‍पादनासाठी आघाडीच्‍या मानल्‍या जाणाऱ्या इटलीतील वाईनरीला उपकरणे निर्यात करताना कंपनीने मैलाचा दगड रोवला आहे. आगामी काळात संपूर्ण युरोपात व्‍यवसाय संधी विस्‍तारण्याचे कंपनीचे ध्येय आहे. वाईनरीसोबत एकंदरीतच प्रोसेस इंडस्‍ट्रीला लागणारे यंत्र निर्मिती करणाऱ्या या कंपनीचे संस्‍थापक संजय झा यांच्‍यासोबत साधलेला संवाद. - अरुण मलाणी प्रश्‍न : वाईनरीज्‌ला लागणारी उपकरणे बनविण्याची संकल्‍पना कशी सूचली? संजय झा : २००१ मध्ये महाराष्ट्र शासनाने वाइन धोरण जाहीर केले. त्या वेळी वाइन उद्योगाबाबत फारशी माहिती कोणाला नव्हती. आम्ही २००३ पासून या उद्योगात कामाला सुरुवात केली. मी मूळचा मुंबईचा असून, डिझाईन इंजिनिअर आहे. यापूर्वी मी एका बहुराष्ट्रीय कन्सल्टंट कंपनीत कार्यरत होतो. फूड, केमिकल, फार्मा, पेट्रोकेमिकल आणि वाइन अशा प्रोसेस इक्विपमेंट डिझाईनचा अनुभव होता. २००१ चे धोरण आल्यानंतर २००२ मध्ये मुंबईहून नाशिकला आलो. सुरुवातीला कन्सल्टन्सी दिली. २००३ मध्ये नाशिकमध्ये प्रत्‍यक्ष उत्‍पादनाला सुरुवात केली. २०१३ मध्ये प्रशस्‍त जागेत कारखाना सुरु करतांना ‘एनव्हिजन इक्विपमेंट्स’ या नावाने व्‍यवसायाला सुरुवात केली. --- इटली हे वाइन उद्योगाची जननी मानले जाते. त्याच इटलीला नाशिकमधून यंत्रसामग्री पाठवणे हा किती मोठा टप्पा आहे? : सुरुवातीला आम्ही स्वतः इटलीहून इक्विपमेंट्स आयात करायचो. आजही आम्ही टर्नकी प्रोजेक्ट्ससाठी भारतातील सर्वात मोठे आयातदार आहोत. अनेक इटालियन वाइन उत्‍पादक आणि उपकरणे उत्पादक यांच्‍या भारतात वाईनरींना भेटीदरम्‍यान आम्ही तयार केलेल्या उपकरणांची गुणवत्ता त्‍यांना भावली. भारतात अशा दर्जाचे काम होते हे पाहून ते प्रभावित झाले आणि त्यांनी आम्हाला उपकरणे बनवण्यासाठी विचारणा केली. ज्या देशाकडून आपण तंत्रज्ञान घेत होतो, त्याच देशाला म्हणजे जननीलाच तंत्रज्ञान देणे हा आमच्यासाठी मोठा अभिमान आहे. नुकतीच ‘अरोमा मल्टिप्लायर टँक्स’ची पहिली खेप मुंबईच्या न्हावा शेवा बंदरावरून इटलीच्या फ्लोरेन्स शहरासाठी पाठवली आहे. ‘मेक इन इंडिया’ वाइन उपकरणे थेट इटलीला निर्यात होणे हे प्रतीकात्मकदृष्ट्या खूप मोठे आहे. --- आपल्‍या व्‍यवसायाचा विस्‍तार देशांतर्गत व देशाबाहेर कुठे आहे? : यापूर्वी नेपाळ, केनिया आणि युगांडा यांसारख्या देशांमध्ये काही मशिन्स पुरवली होती. मात्र, युरोपमध्ये पाऊल टाकणे वेगळे ठरले. आता इटलीच्या माध्यमातून युरोपीय बाजारपेठेचा मार्ग समजला असल्याने इतर युरोपीय देशांमध्येही संपर्क साधण्याची आमची योजना आहे. तर देशांतर्गत महाराष्ट्र, कर्नाटकसह तेलंगणा, पंजाब, राजस्थान, गोवा आणि बंगळुरूमधील प्रक्रिया उद्योगांना यंत्र पुरविले आहेत. अलीकडे उत्तराखंड आणि उत्तर प्रदेशात दोन प्रकल्प केले आहेत. --- व्‍यवसायात जबाबदाऱ्यांचे वाटप कसे केले आहे? : संस्‍थापक म्‍हणून कंपनीच्‍या कामकाजात मी सक्रिय आहे. अभियांत्रिकी शिक्षण घेतलेला माझा मुलगा हर्ष झा याला या उद्योगाविषयी लहानपणापासून आवड होती. सध्या तो मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) म्‍हणून कंपनीतील जबाबदारी सांभाळतो आहे. पाटण्यातील आयआयटीतून फायनान्स आणि मार्केटिंग विषयातून एमबीएचे शिक्षण सध्या तो घेत आहे. कंपनीचा विस्‍तार परदेशात करण्याच्‍या अनुषंगाने त्‍याचा हातभार लागत असून, इटलीसह युरोपात विस्‍ताराचे धोरण त्याच्यामुळे शक्‍य झाले आहे. आपल्‍या उद्योगामुळे स्थानिक पातळीवर किती रोजगार निर्माण झाला आहे? : आमच्या कारखान्यात थेट ३५ कामगार आणि कर्मचारी कार्यरत आहेत. मात्र, अप्रत्यक्ष रोजगार खूप मोठा आहे. मशीन शॉप्स, बेंडिंग कामे, गॅस सप्लायर्स, वेल्डिंग रॉड सप्लायर्स, इतर विविध वस्‍तू पुरवणारे जवळपास २०० व्‍यावसायिक, पुरवठादार व त्‍यांच्‍या कामगारांना आमच्‍या उद्योगामुळे रोजगार संधी मिळते आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com