Grape Festival : बागेतील द्राक्षे थेट नाशिककरांच्या दारात! पोलिस, कृषी अन ‘ग्रीन फिल्ड’ चा महोत्सव | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amol Gorhe

Grape Festival : बागेतील द्राक्षे थेट नाशिककरांच्या दारात! पोलिस, कृषी अन ‘ग्रीन फिल्ड’ चा महोत्सव

नाशिक : राज्य सरकारच्या कृषी विभागाच्या ‘विकेल ते पिकेल’ योजनेतंर्गत पोलिस, कृषी आणि ग्रीन फिल्ड ॲग्रोतर्फे बागेतील द्राक्षे थेट नाशिककरांच्या दारात उपलब्ध होतील. द्राक्ष महोत्सवाचे उदघाटन महाशिवरात्रीला (ता. १८) सिटी सेंटर मॉल समोरील लक्षिका सभागृहात होईल.

विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी गंगाथरन डी., पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या हस्ते हा कार्यक्रम होईल. (maha Grape Festival Grapes from garden directly at doorstep of Nashikkar Festival of Police Agriculture and Green Field nashik news)

ग्रीन फिल्डचे अध्यक्ष अमोल गोऱ्हे यांनी ही माहिती गुरुवारी (ता. १६) येथे पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, की नैसर्गिक आपत्तीचे संकट, कोरोनाकाळात मातीमोल झालेले दर, व्यापाऱ्यांकडून होणारी द्राक्ष उत्पादकांची लूट या पार्श्‍वभूमीवर ग्रीन फिल्डतर्फे नाशिकमध्ये द्राक्षाला चांगला दर मिळवून देत आणि नाशिककरांना रास्त दरात द्राक्षे मिळण्यासाठी शहरात विविध ४५ ठिकाणी सलग १०० दिवस द्राक्ष महोत्सव होत आहे.

श्री. शिंदे यांनी सहभाग घेऊन पोलिस अधिकारी व कर्मचारी यांच्या कुटुंबांचा शेतकऱ्यांच्या विकासासाठी हातभार लागावा म्हणून प्रत्येक विक्री केंद्रावर पोलिस कुटुंबातील सदस्य उपस्थित राहतील. राज्य सरकारने शहरात शेतकऱ्यांचा भाजीपाला आणि फळे विक्रीसाठी निवडलेल्या जागांवर द्राक्ष विक्रीचे केंद्र असेल.

गुरुवारी पोलिस पाल्य आणि पत्नींना शेतकरी आणि शेतीमाल विक्रीची माहिती ‘चला हवा येवू द्या’ या मालिकेचे लेखक अरविंद जगताप आणि शिक्षण अभ्यासक सचिन जोशी यांनी माहिती दिली. श्री. वाघ यांनी शेतकऱ्यांच्या व्यथा, मार्केटिंग आणि नफ्याचे गणित याविषयी सांगितले.

हेही वाचा : अल्पमतातील निवाडे आणि सामान्य माणूस

फडणवीसांच्या हस्ते प्रकाशन

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नुकतेच महोत्सवाच्या लोगोचे प्रकाशन झाले. महोत्सवात जागतिक महिला दिनानिमित्त शेफ विष्णू मनोहर हे भगिनींना द्राक्षापासून तयार होणारे खाद्यपदार्थ, द्राक्षांचे दागिने याबाबत माहिती देणार आहेत.

महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या हस्ते उत्कृष्ट द्राक्ष उत्पादकांचा गौरव, तर वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते उत्कृष्ट द्राक्ष विक्रेता पोलिस पाल्य, कृषी महाविद्यालयातील विद्यार्थी आणि द्राक्ष उत्पादकांचा गौरव करण्यात येणार आहे, असेही श्री. गोऱ्हे यांनी सांगितले.