NSK26H32645
जळगाव : चारा साक्षरता व संवर्धन अभियानात पशुपालकांना मार्गदर्शन करताना पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी.
–––
संभाव्य चाराटंचाई मात करण्यासाठी मार्गदर्शन
पशुपालकांना विविध तंत्रज्ञानासह प्रात्यक्षिकांद्वारे दिली माहिती
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : संभाव्य चाराटंचाईवर मात करण्यासाठी पशुपालकांमध्ये चारा उत्पादन, संवर्धन आणि प्रक्रिया तंत्रज्ञानाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने पशुसंवर्धन विभागातर्फे आमडदे (ता. भडगाव) येथे ‘चारा साक्षरता व संवर्धन अभियान’ राबविण्यात आले. यावेळी पशुपालकांना चारा संवर्धनाच्या विविध तंत्रज्ञानांची माहिती देण्यासह प्रात्यक्षिकांद्वारे मार्गदर्शन करण्यात आले.
‘एल निनो’च्या संभाव्य प्रभावामुळे उद्भवू शकणाऱ्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर चाराटंचाई टाळण्यासाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या पुढाकाराने जिल्हाधिकारी रोहन घुगे व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी करिश्मा नायर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा वार्षिक योजनेतून खरीप हंगामात वैरण बियाण्याचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यात चारा उत्पादन वाढविण्यासाठी विविध उपाययोजना राबविण्यात येत असून, आगामी रब्बी हंगामातही १०० टक्के अनुदानावर वैरण बियाणे वाटप करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. संभाव्य चारा टंचाईचा सामना करण्यासाठी पशुसंवर्धन विभागाने तालुक्यातील प्रत्येक गावात या अभियानाचे आयोजन केले आहे.
अभियानांतर्गत पशुपालकांना चाऱ्याची गुणवत्ता वाढविणे, चाऱ्याची नासाडी टाळणे आणि पर्यायी चारा उत्पादन पद्धतींचा अवलंब करणे याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने निकृष्ट चारा सकस करणे, पर्यायी चारा उत्पादन, चाऱ्याची नासाडी रोखून कडबा कुट्टी यंत्राचा नियमित वापर करून चाऱ्याचा योग्य उपयोग करण्याचे आवाहन केले.
चौकट
चारा पिकांच्या लागवडीवर भर
आगामी रब्बी हंगामात चारा पिकांचे लागवड क्षेत्र वाढविण्यासाठी कमी पाण्यात येणाऱ्या ज्वारी, बाजरी आणि मका या चारा पिकांची लागवड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.