मलढोणला दरोडा, बारा तोळे सोने पळविले | Sinnar | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिन्नर : मलढोणला दरोडा, बारा तोळे सोने पळविले

सिन्नर : मलढोणला दरोडा, बारा तोळे सोने पळविले

सिन्नर (जि.नाशिक) : मलढोण (ता. सिन्नर) येथील सरोदे वस्तीवर आज (ता.२४) मध्यरात्री दीडनंतर दहा ते बारा जणांच्या टोळीने सशस्र दरोडा टाकत कुटूंबप्रमुखावर बिअरची बाटली अऩ विटांचा मारा करीत जखमी केले. प्रसंगावधान राखत घरातील एकाने जवळच्या वस्तीवरील लोकांना कळविल्याने लोकांनी वस्तीकडे धाव घेतली. ते येत असल्याची त्यांची चाहून लागताच चोरटे पळून गेले, मात्र त्यातही दुचाकीने पळून जाण्याच्या तयारीत असलेल्या एका चोरट्यावर काठीने हल्ला करीत त्याला पाडले, तोवर जवळील नागरिक आल्याने एका चोराला पकडण्यात ग्रामस्थांना यश आले. इतर चोर पळून जाण्यात यशस्वी झाले असून घरातील दहा ते बारा तोळे सोन्याचे दागिने त्यांनी ओरबाडून नेले आहेत.

हेही वाचा: सिन्नर : पळून जाणाऱ्या चोरट्याला शिताफीने पकडले

मलढोण-मिरगाव रस्त्यावर वाल्मिक दगडू सरोदे (५०) हे कुटूंबियांसह राहतात. त्यांना चार मुले असून दोघांची लग्ने झालेली आहेत. मंगळवारी रात्री ते पडवीत झोपले होते. शेजारीच आई रखमाबाई (८०) व पत्नी विमल (४६) खाटेवर झोपल्या होत्या. मध्यरात्रीच्या सुमारास दहा ते बारा तरुणांनी वस्तीवर अचानक विटांचा मारा सुरू केला. यात वाल्मिक सरोदेंना जाग येताच एकाने त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून जखमी केले. इतरांनी बाजेवर झोपलेल्या दोन्ही महिलांना खाली ढकलून दिले. बाहेर ही गडबड ऐकून लगतच्या खोलीत झोपलेली मुले बाहेर आली, चोरट्यांनी त्यांच्यावरही हल्ला केला.

घरात प्रवेश करत महिलांच्या अंगावरील दागिने हिसकावून घेतले. तेवढ्यात एका मुलाने मोबाईलने बाजूच्या वस्त्यांवर कळविल्या ग्रामस्थांनी लागलीच सरोदे वस्तीकडे धाव घेतली. माणसे येत असल्याचे पाहताच काही चोरटे शेतातून पसार झाले. याच दरम्यान सरोदे यांच्या एका मुलाने ऋषिकेश राठोड (२५, रा. रुई ता. कोपरगाव) या दरोडेखोराला पाठीमागून काठीचा घाव घालून दुचाकीसह खाली पाडले. तेवढ्यात ग्रामस्थांनी त्याला पकडले अन चोप दिला. जखमी सरोदे आणि चोरट्यावर उपचार सुरू असून वरिष्ठ पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. लवकरच चोरट्यांना पकडू असे पोलिसांनी सांगितले.

loading image
go to top