esakal | मालेगाव परिसरात मुसळधार पाऊस; शेतकरी सुखावला
sakal

बोलून बातमी शोधा

Malegaon rain

मालेगाव परिसरात मुसळधार पाऊस; शेतकरी सुखावला

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहर व परिसरात पावसाने सोमवारी (ता. ३०) रात्री जोरदार हजेरी लावली. मंगळवारी दुपारी दोन तास मुसळधार पाऊस झाला. पावसामुळे झोपडपट्ट्यांसह सखल भागात पाणी साचले. हातगाडीवरील व्यावसायिकांची तारांबळ उडाली. शहरात ५९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. ग्रामीण भागातही कमी-अधिक प्रमाणात मुसळधार पाऊस झाल्याने खरिपाच्या पिकाला जीवदान मिळाले आहे. दोन दिवसांच्या पावसामुळे विहिरींना पाणी उतरण्याच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

धरणाच्या साठ्यात वाढ

शहरी भागात वेळोवेळी पावसाने हजेरी लावली. तालुक्यासह कसमादे भागात जून-जुलैमध्ये पाऊस रुसला होता. पावसाच्या लपंडावामुळे खरिपाची पिके धोक्यात आली होती. १६ ऑगस्टपासून सलग आठ दिवस पावसाने हजेरी लावली. त्यामुळे खरिपाची पिके तग धरून होती. गेल्या दोन दिवसांपासून सर्वत्र मध्यम व जोरदार पाऊस झाला. या पावसामुळे जलसाठे भरण्यास मदत झाली. कसमादेतील हरणबारी धरण यापूर्वीच ओव्हरफ्लो झाले आहे. चणकापूर, पुनंद व केळझर या तिन्ही धरणांतील जलसाठा ८० ते ९० टक्क्यांदरम्यान आहे. पावसाचा ओघ असाच कायम राहिल्यास गिरणा व मोसम या दोन्ही नद्यांना पूर येण्याची शक्यता आहे.

हेही वाचा: तलाठ्याने परस्पर आठ एकर जमीन केली पत्नीच्या नावावर; गुन्हा दाखल

सर्वच पिकांना जीवदान

दोन दिवसांच्या पावसामुळे शहरात ठिकठिकाणी पाणी साचले आहे. जवळपास सर्वच रस्त्यांची दाणादाण उडाली आहे. पावसाच्या पाण्यामुळे येथील पोलिस कवायत मैदानाला तलावाचे स्वरूप आले आहे. भीज पावसामुळे खरिपाचे पीक चांगले येईलच, शिवाय विहिरींना पाणी उतरण्यास सुरवात होणार आहे. गेल्या पंधरा दिवसांतील पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. पिके जोमात असल्याने पोळ्याचा सण उत्साहात साजरा होण्याची शक्यता आहे

हेही वाचा: 'जशास तसे' उत्तर देणाऱ्या नगरसेवक शहाणेंना फडणवीसांकडून बळ

loading image
go to top