esakal | तलाठ्याने परस्पर आठ एकर जमीन केली पत्नीच्या नावावर; गुन्हा दाखल
sakal

बोलून बातमी शोधा

Crime

तलाठ्याने परस्पर आठ एकर जमीन केली पत्नीच्या नावावर; गुन्हा दाखल

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि. नाशिक) : जमिनीच्या मूळ मालकाचा मृत्यू झाल्यानंतर सुमारे आठ एकर जमीन वारसांच्या नावे न करता परस्पर पत्नीच्या नावे करण्याचा पराक्रम करणाऱ्या तलाठ्याविरोधात अखेर तालुका पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकारामुळे महसूल खात्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.


हडप सावरगाव व कुसमाडी हद्दीत हा प्रकार घडला आहे. या प्रकरणी मूळ वारस मंदा पवार यांनी तहसीलदार प्रमोद हिले, पोलिस निरीक्षक अनिल भवारी यांच्याकडे तक्रार केली होती. तलाठी अतुल थूल यांनी हडप सावरगाव शिवारातील गट क्रमांक ५७/३ मधील आठ एकर शेतजमीन मूळ वारसांना डावलत नोंदीमध्ये फेरफार करून स्वतःच्या पत्नीच्या नावावर करून घेतली. हा सर्व प्रकार मूळ वारस मंदा पवार (रा. बाभळेश्वर) आपल्या मूळगावी मातुलठाण येथे आल्यानंतर लक्षात आल्याने उघड झाला. या संदर्भात मंडळ अधिकारी अशोक गायके यांनी मंगळवारी तालुका पोलिस ठाण्यात विविध अहवालांचा संदर्भ नमूद करत तत्कालीन तलाठी अतुल थूल यांच्याविरोधात फिर्याद दिली आहे. त्यानुसार थूल यांच्यावर फसवणूक, बनावट, कागदपत्र करणे, शासकीय दस्तऐवज गहाळ करणे आदी गुन्हे दाखल करण्यात आले.

हेही वाचा: 'गवळींनी ट्रस्टची ७० कोटींची संंपत्ती पीएच्या नावावर केली'


परस्पर दाखविला वारस

मंदा पवार यांनी जबाबात म्हटल्याप्रमाणे त्यांचे वडील राधाकिसन कदम यांचे मातुलठाण येथे निधन झाले. परंतु तलाठी थूल यांनी वडील राधाकिसन कदम यांना मृत दर्शवून त्यांना वारस म्हणून त्याची पत्नी अरुणा जगन्नाथ गाजरे यांना दाखवीत तशी नोंद मंजूर केली. मात्र कायदेशीररीत्या आम्ही चार वारसदार असताना त्यांनी गैरप्रकारे ही जमीन परस्पर पत्नी अरुणा गाजरे यांच्या नावावर केली आहे.


कागदपत्रेही केली गहाळ

राधाकिसन कदम यांना अंकुश कदम, संतोष कदम, मंदा पवार, भारती धाकतोंडे हे कायदेशीर चार वारस असताना चुकीच्या पद्धतीने जमीन नावावर केली आहे. विशेष म्हणजे हल्लीचे तलाठी बी. एम. घोडके यांनी या प्रकरणी दिलेल्या अहवालानुसार या नोंदणीची कागदपत्रे दिलेली नसून तलाठी कार्यालयातही याबाबत उल्लेख नसल्याचे म्हटल्याने कागदपत्र गहाळ केल्याचे सिद्ध होते. या संदर्भात सविस्तर फिर्याद देण्यात आली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक अनिल भवारी, उपनिरीक्षक एकनाथ भिसे या प्रकरणी तपास करत आहेत.

वादाच्या केंद्रस्थानी ‘महसूल’

अगोदर प्रांताधिकाऱ्यांवर झालेले आरोप आणि त्यानंतर त्यांच्या विरोधात दाखल झालेला गुन्हा, तलाठी बदली प्रकरणी काहींनी मॅटमध्ये घेतलेली धाव, त्यानंतर थूल यांचे हे प्रताप उघडकीस येऊन दाखल झालेला गुन्हा यामुळे येवल्याचा महसूल विभाग दोन आठवड्यांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. अजूनही काही प्रकरणे पुढे येण्याची ही शक्यता व्यक्त होत आहे.

हेही वाचा: रस्ता चुकल्याने गुजरातचे पर्यटक रात्रभर किल्ल्यावरच

loading image
go to top