16151
मालेगाव : उर्दू घर येथे बीएलओंना मार्गदर्शन करतांना प्रांताधिकारी नितीन सदगीर
----
दुबार मतदार नोंदणी टाळून
मतदार यादी निर्दोष ठेवावी : सदगीर
सकाळ वृत्तसेवा
मालेगाव, ता. २३ : निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमांतर्गत मतदार यादी अचूक व त्रुटीमुक्त करण्यासाठी नागरिकांनी एकाच व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदवू नये. तसेच नवीन मतदार नोंदणी करताना अचूक व खरी माहिती द्यावी असे आवाहन प्रांताधिकारी नितीन सदगीर यांनी केले आहे.
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत दावे व हरकती सादर करण्याचा कालावधी ३१ ऑगस्ट ते २६ ऑक्टोबर २०२६ असा आहे. त्याअनुषंगाने शहरातील उर्दू घर येथे मतदार केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) व पर्यवेक्षकांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. बैठकीत मतदार यादीत दुबार नोंदणी होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना बीएलओंना करण्यात आल्या. एकाच व्यक्तीचे नाव एकाच किंवा वेगवेगळ्या मतदारसंघांच्या मतदार यादीत एकापेक्षा अधिक ठिकाणी नोंदविणे कायद्याने निषिद्ध आहे.
नागरिकांनी दुबार मतदार नोंदणी टाळावी. मतदारांनी मतदार यादीतील स्वतःचे नाव, वय, पत्ता व इतर तपशील तपासून काही त्रुटी आढळल्यास विहित मुदतीत दावे किंवा हरकती सादर कराव्यात. या प्रक्रियेसाठी बीएलओ घरोघरी भेट देत असून, नागरिकांनी त्यांना आवश्यक कागदपत्रे व अचूक माहिती उपलब्ध करून द्यावी. नवीन मतदार नाव नोंदविण्यासाठी विहित नमुना क्रमांक ६ मध्ये अर्ज करून खरी माहिती सादर करावी. मतदार यादी अचूक व निर्दोष ठेवण्यासाठी नागरिकांनी विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन श्री. सदगीर यांनी केले.