Summer Update : मालेगाव तापले; उष्माघाताने अनोळखी वृध्दाचा मृत्यू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Malegaon heats up Unidentified old man dies of heatstroke

Summer Update : मालेगाव तापले; उष्माघाताने अनोळखी वृध्दाचा मृत्यू

मालेगाव (जि. नाशिक) : राज्यातील उन्हाच्या तडाख्याचा फटका मालेगाव शहरालाही बसला आहे. सूर्यनारायणाचा प्रकोप चांगलाच जाणवतोय. उष्माघाताने दुपारी शहरातील शिवाजी पुतळा भागात रस्त्याच्या कडेला पडलेल्या अनोळखी वृध्दाचा उष्माघातामुळे मृत्यु झाल्याचा संशय आहे. (Malegaon heats up Unidentified old man dies of heatstroke)

दुपारपासूनच हा वृध्द रस्त्यावर पडून होता. शहर पोलिसांच्या हा प्रकार निदर्शनास आला. पोलिसांनी रुग्णकल्याण समितीचे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते शफिक अहमद यांना ही माहिती कळविली. त्यांनी रुग्णवाहिका आणून वृध्दाला सामान्य रुग्णालयात हलविले. डॉक्टरांनी तपासणीनंतर त्यास मृत घोषित केले. रात्री उशिरापर्यंत या वृध्दाची ओळख पटू शकली नव्हती. सफेद दाढी, मिशा, सफेद शर्ट, चॉकलेटी काळपट-मळकट पॅन्ट व डोक्याला उपरणे गुंडाळलेले असे या वृध्दाचे वर्णन आहे. कोणाला ओळख पटल्यास शहर पोलिस ठाण्याशी संपर्क साधण्याचा आवाहन पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा: नाशिक : गोदावरी नदीपात्रात दुचाकी पडून दोघांचा मृत्यू

मालेगाव तापले; पारा ४४.४ अंशांवर

मालेगाव शहर व परिसरात उन्हाचा कहर सुरूच आहे. येथे शनिवारी (ता. ३०) पारा ४४.४ अंशांवर गेला होता. या हंगामातील हे सर्वोच्च तापमान आहे. ऊन व उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दोन दिवसांवर अक्षयतृतीया व रमजान ईदचा सण आल्याने उन्हाचे चटके झेलतच नागरिकांना खरेदीसाठी बाहेर पडावे लागत आहे.

शहरात गेल्या दोन महिन्यांपासून पारा ४० अंशांवर आहे. आठवड्यापासून तापमान ४२ ते ४३ अंश सेल्सिअसदरम्यान आहे. शनिवारी सकाळी दहापासूनच उन्हाच्या झळा अंगाला झोंबत होत्या. सायंकाळी साडेपाचपर्यंत उन्हाचे चटके बसत असल्याने नागरिक त्रस्त झाले. हंगामात मंगळवारी (ता. २६) पारा ४४ अंशांपर्यंत पोचला होता. एप्रिलअखेर या हंगामातील सर्वोच्च ४४.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने आगामी मे महिना कसा जाईल, या विवंचनेत नागरिक आहेत. मार्च ते मे या तीन महिन्यांत येथील पारा दर वर्षी वाढतो. या वर्षी मात्र मार्चच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच कडक ऊन पडत आहे. ऊन व उकाड्यामुळे नागरिक असह्य झाले आहेत. कडक उन्हामुळे येथील दळणवळणावर मोठा परिणाम झाला आहे. सकाळी अकरा ते दुपारी चार, या वेळेत रस्त्यांवरचे दळणवळण व बाजारपेठांमध्ये शुकशुकाट जाणवत आहे.

अक्षयतृतीया व रमजान ईदचा सण मंगळवारी (ता. ३) साजरा होणार आहे. सणाच्या पार्श्‍वभूमीवर हिंदू- मुस्लिम बांधव खरेदीसाठी बाहेर पडत आहेत. अक्षयतृतीयेचे साहित्य, किराणा घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे. पित्तरांचा सण असल्याने येथील बाजारात आंब्यांची आवक वाढली आहे. टोपी, उपरणे, गॉगल आदींचा वापर करत नागरिक खरेदी करत आहेत. मुस्लिमबहुल भागात रमजान ईदची खरेदी मात्र रात्रीच केली जात आहे.

हेही वाचा: नाशिक : वावी येथे चोरट्यांचा धुडगूस

भरउन्हात क्रिकेटचा सामना

मालेगावात क्रिकेटप्रेमींची संख्या मोठी आहे. येथील मसगा महाविद्यालय व पोलिस कवायत मैदानावर दर शुक्रवारी दिवसभर शेकडो तरुण क्रिकेट खेळतात. शुक्रवारी (ता. २९) पारा ४३.६ अंशांवर असताना मैदानावर ठिकठिकाणी क्रिकेटचे डाव रंगले होते. शनिवारी पारा ४४.४ अंशांवर असतानाही येथील मसगा महाविद्यालयाच्या मैदानावर क्रिकेटचा सामना सुरू होता. विशेष म्हणजे, खेळणाऱ्यांबरोबर सामना पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांची संख्याही लक्षणीय होती.

Web Title: Malegaon Heats Up Unidentified Old Man Dies Of Heatstroke Nashik Summer Update

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :MalegaonNashiksummer
go to top