सिन्नर (जि. नाशिक) : वावी येथील खळवाडी परिसरात शनिवारी (ता.३०) मध्यरात्रीनंतर दोनच्या सुमारास धाडसी घरफोडी (Burglary) करून चार ते पाच चोरट्यांनी कपाटात ठेवलेले साडे चार तोळ्याचे सोन्याचे दागिने, बावीस हजारांची रोकड व मोबाईल फोन घेऊन पोबारा केला. या घटनेमुळे रहिवाशांमध्ये घबराट पसरली आहे. (Midnight burglary at Wavi Nashik Crime News)
सिन्नरच्या शासकीय धान्य गोदामात काम करणारे सुनील बबन वर्पे हे खळवाडी परिसरात आई, पत्नी व लहान मुलासोबत राहतात. शेजारीच त्यांचे मामाही राहतात. शुक्रवारी रात्री साडे अकराच्या सुमारास श्री. वर्पे हे पत्नी व मुलासह घरात झोपले होते. त्यांची आई संरक्षक दरवाजाची कडी आतल्या बाजूने लावून समोरच मामाच्या घरी झोपण्यासाठी गेली होती. मध्यरात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराच्या दर्शनी भागातील संरक्षक दरवाजाची कडी उघडून प्रवेश केला.
घराचा मुख्य दरवाजा उघडून आत आल्यावर पाठिमागच्या बाजूचा दरवाजा उघडून चोरट्यांनी शेजारच्या खोलीत कपाट उघडून साहित्याची तपासणी केली. च खोलीत वर्पे कुटुंबीय गाढ झोपेत होते. कुलर व पंखा चालू असल्याने त्यांना जाग आली नाही. चोरट्यानी कपाट उघडून आतील कप्प्यात ठेवलेले साडेचार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने (Jewelry), बावीस हजारांची रोख रक्कम व काही नकली दागिने घेऊन चोरटे पसार झाले. जातांना त्यांनी वर्पे यांच्या मुलाच्या पायातील चांदीचे पैंजण देखील काढून नेले. पाठिमागच्या दरवाजाने बाहेर पडत चोरट्यांनी तेथे मुद्देमाल शाळेच्या दप्तरात भरून पोबारा केला.
दुसऱ्या घराचे कुलूप तोडले
पहाटे चारच्या सुमारास वर्पे यांना जाग आल्यावर हा प्रकार लक्षात आला. ते ओरडत घराबाहेर आले असता शेजारची मंडळी व नातेवाईक अगोदरच जागे असल्याचे त्यांच्या लक्षात आले. रात्री अडीच वाजेच्या सुमारास शहा रस्त्याच्या पलीकडे असलेल्या गावित यांच्या घराचे कुलूप तोडल्याची घटना घडली होती. हा प्रकार घराच्या गच्चीवरून आवाज ऐकल्याने शेजारी राहणाऱ्याच्या लक्षात आला. त्यांनी आरडाओरडा केल्यावर पाच जण बाजूच्या डाळिंबाच्या बागेत पसार झाले होते. चोरटे आल्याची आरडाओरड केल्याने श्री. वर्पे यांच्या घराशेजारील रहिवासी रस्त्याच्या पलीकडच्या बाजूला धावले होते. मात्र, चोरटे वर्पे यांच्या घरात चोरी करून तिकडे गेले याचा थांगपत्ता कोणालाही नव्हता. पहाटे चारला हा प्रकार लक्षात आल्यावर पोलिसांचे वाहन पुन्हा घटनास्थळी आले. पोलिस उपनिरीक्षक विजय सोनवणे, हवालदार रामनाथ तांबे यांनी स्थानिक तरुणांच्या मदतीने परिसरात शोध घेतला मात्र चोरटे पसार झाले होते.
चोरट्यांनी फवारले गुंगीचे औषध?
सकाळी पोलिस निरीक्षक सागर कोते, हवालदार दशरथ मोरे, नितीन जगताप यांनी घटनास्थळी येऊन माहिती घेतली. पहाटेच्या वेळी दोघांनाही अचानक मळमळ होत असल्याने जाग आल्याचे वर्पे कुटुंबीयांनी सांगितले. चोरट्यांनी गुंगी येणारे औषध फवारले असावे, त्यामुळे अगदी डोक्याजवळ असलेल्या कपाटाच्या दरवाजा उघडल्याच्या आवाजाने जाग आली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. यासंदर्भात पोलिसांकडून माहिती घेण्यात आली. चोरट्यानी मोबाईल फोन देखील सोबत नेल्याने यादृष्टीने तांत्रिक तपास पोलिसांकडून करण्यात येत आहे. या घटनेत घरातील साडे चार तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व बावीस हजार रुपये रोख रक्कम चोरीला गेल्याचे वर्पे यांनी वावी पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.
ती संशयास्पद बोलेरो चोरट्यांचीच
दोन दिवसांपासून खळवाडी परिसरात मध्यरात्रीच्या वेळी पांढऱ्या रंगाची बोलेरो जीप संशयास्पदरीत्या फिरत असल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे भरधाव वेगात ही जीप पळवली जाते तसेच कधीकधी घरापासून दूर अंतरावर अचानक उभी केली जाते अशी माहिती रहिवाशांनी दिली. सध्या वावी परिसरात समृद्धी व शिर्डी महामार्गाची कामे सुरू असल्याने या कामावरील वाहन असावे म्हणून स्थानिकांकडून दुर्लक्ष केले जाते. मात्र, आगामी काळात पोलिसांसह सर्वांनीच सावध राहणे गरजेचे ठरणार आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.