esakal | कोरोनाबाधितांवर उपचारासाठी मनपा सक्षम; मालेगावच्या महापौर शेख यांचा विश्‍वास

बोलून बातमी शोधा

Malegaon Mayor Tahera Sheikh

कोरोनाबाधितांवर उपचारासाठी मनपा सक्षम; मालेगावच्या महापौर शेख यांचा विश्‍वास

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : महापालिका प्रशासनाने कोरोना संसर्गावर आजवर सुमारे १३ कोटी रुपये खर्च केले आहे. यातील अवघे पाच कोटी जिल्हा प्रशासनाकडून प्राप्त झाले आहे. उर्वरित खर्च मनपा निधीतूनच केला जात आहे. कोरोनाबाधितांवर उपचारासाठी मनपा सक्षम असून, कोरोना संसर्गावर निश्‍चित मात करू, असा विश्‍वास महापौर ताहेरा शेख, आयुक्त भालचंद्र गोसावी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

महापौर दालनात झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. श्रीमती शेख, श्री. गोसावी व उपायुक्त नितीन कापडणीस म्हणाले, की भविष्यात साथीचा संसर्ग वाढल्यास त्या दृष्टीने पूर्वतयारी केली आहे. मिनी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचे नियोजन आहे. यापूर्वी जिल्हा प्रशासनातर्फे दोन कोटींचा निधी मंजूर झाला होता. त्यातून औषधसाठा खरेदी केल्याने तो चार महिने पुरेल. शहरातील मनपा कोविड केंद्रात दाखल रुग्णांपैकी ६० टक्के रुग्ण शहराबाहेरील आहेत. मानवतेच्या भावनेतून त्यांच्यावर उपचार होत आहेत. बहुतेक रुग्ण दाखल होण्यास विलंब करतात. त्यामुळे मृत्युदर वाढतो. लक्षणे जाणवताच वैद्यकीय उपचार करावेत. कोविड केंद्रासह खासगी रुग्णालयांना रेमडेसिव्हिर इंजेक्शन व ऑक्सिजनचा पुरवठा नियमित होतो की नाही, याची पडताळणी करण्यासाठी आठ सदस्यीय पथक गठित केले आहे.

हेही वाचा: मुले असूनही ती ठरली बेवारस! ओझरकरांनी माणुसकी दाखवत केले अंत्यसंस्कार

शहरात २०३ रुग्ण हे शहराबाहेरील व फक्त ७४ रुग्ण स्थानिक आहेत. कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे काम चांगले झाल्याने साथ नियंत्रणात आहे. ग्रामीण भागात व शेजारीला तालुक्यात काम झाल्यास रुग्णसंख्या आटोक्यात येईल. ऑक्सिजन तुटवडा दूर करण्यासाठी इंदूर गॅस एजन्सीला सायने औद्योगिक वसाहतीत जागा मिळवून दिली. लवकरच हा प्रकल्प कार्यान्वित होऊन दररोज एक हजार सिलिंडर मिळतील. महापालिकेने पाचशे सिलिंडर खरेदी केले आहेत. शहरासाठी रोज किमान एक हजार २०० सिलिंडरची मागणी आहे. सध्या ७० ते शंभर सिलिंडरचा तुटवडा आहे. तो लवकरच दूर होईल, असे श्री. कापडणीस यांनी सांगितले. या वेळी माजी महापौर रशीद शेख, आरोग्याधिकारी डॉ. सपना ठाकरे उपस्थित होते.

हेही वाचा: पीपीई किट घालून महिलेवर अंत्यसंस्कार; कौतिकापाडेच्या सरपंचाने जपली माणुसकी