esakal | मालेगाव : एमआयएमने फुंकले महापालिका निवडणुकीचे बिगुल
sakal

बोलून बातमी शोधा

Malegaon MIM Rally

मालेगाव : एमआयएमने फुंकले महापालिका निवडणुकीचे बिगुल

sakal_logo
By
प्रमोद सावंत

मालेगाव (जि. नाशिक) : शहरात विकासाचा असमतोल आहे. पूर्व भागाला विकासापासून वंचित ठेवून पश्‍चिम भागाच्या विकासाला प्राधान्य दिले जाते. सत्ता भ्रष्टांनी विचारांशी तडजोड करून सत्तेसाठी कॉंग्रेसने शिवसेनेशी हातमिळवणी केली. कृषिमंत्री दादा भुसे यांच्या इशाऱ्यावर महापालिकेचे कामकाज सुरू आहे. एमआयएमवर आरोप करणाऱ्यांनी आत्मपरिक्षण करावे. आगामी काळात सत्ताधाऱ्यांचा खरा चेहरा जनतेसमोर आणू, असा इशारा एमआयएमचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष तथा मनपा गटनेते डॉ. खालिद परवेज यांनी दिला. हबीब लॉन्समध्ये एमआयएमतर्फे झालेल्या सभेत ते बोलत होते. या सभेच्या माध्यमातून एमआयएमने महापालिका निवडणूक प्रचाराचे बिगुल फुंकले आहे.

डॉ. खालीद परवेज म्हणाले, की विकास कामात दुजाभाव होतो. सत्ताधाऱ्यांनी या अंदाजपत्रकात विरोधकांना थारा दिला नाही. माजी आमदार रशीद शेख कुटुंबियांवर त्यांनी कठोर शब्दात टीका केली. मुस्लिम मतविभाजनाचा एमआयएमवर आरोप करणारेच मुस्लिम समाजाची फसवणूक करताहेत. आजवर तीन तलाक, एनआरसी आदी मुस्लिम विरोधी भूमिकांना फक्त एमआयएमने विरोध केला. खासदार असदुद्दीन ओवेसी मुस्लिम समाजाच्या हितासाठी व रक्षणासाठी लढा देत आहेत. आमदार मौलाना मुफ्ती मोहंमद इस्माईल यांचा संबंध बांगलादेशी नागरिक इकबलशी जोडला गेला. यात विकास कामात अडथळा आणण्याचे राजकारण होते. याच पद्धतीने गोध्रा कांडातील संशयिताशी माजी महापौर मलिक यांच नाव जोडले गेले. पक्षाला बदनाम करण्याचे गलिच्छ राजकारण खपवून घेणार नाही. तुमचे खरे चेहरे उघड करू, कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसचा डाव मुस्लीम बांधवांनी ओळखावा, आगामी निवडणुकीत एमआयएमची साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले. या वेळी ज्येष्ठ नगरसेवक युनूस ईसा, माजी महापौर अब्दुल मालिक, नगरसेवक हाजी माजिद शेख यांनी मनोगत व्यक्त केले.

हेही वाचा: नाशिक-पुणे महामार्गावर जीवघेणे खड्डे; प्रवासी त्रस्त

कोरोना नियमांचा फज्जा…

हबीब लॉन्समधील जाहीर सभेला प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता. एमआयएमचे नेते डॉ. खालीद परवेज यांचे फटाक्यांच्या आतषबाजीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. सभेची गर्दी पाहून मालेगाव शहरात कोरोनाची ऐसीतैसी होत असल्याची प्रचिती आली. आगामी मनपा निवडणूक पाहता शहरात दर शुक्रवारी विविध राजकीय पक्षांच्या सभांचा धडाका सुरू होईल. या सभा कोरोना संसर्गवाढीला कारणीभूत ठरू नयेत हीच अपेक्षा.

हेही वाचा: Nokia चा प्रत्येकाला परवडेल असा स्मार्टफोन Nokia C01 Plus लॉंच

loading image
go to top