दहावीनंतर विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल | Nashik News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सिन्नर : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत विविध कोर्सची विद्यार्थ्यांना माहिती देताना शिक्षक.

दहावीनंतर विद्यार्थ्यांचा आयटीआयकडे कल

सिन्नर : व्यवसाय करण्यासाठी तसेच अनेक कंपन्यांमध्ये उत्कृष्ट कामगार घडवण्यासाठी आयटीआयला अनेक तरुणांनी पसंती दिल्याचे काही वर्षांपासून दिसत आहे. दहावीनंतर लवकरात लवकर करिअरचा पर्याय म्हणून आयटीआयला अनेक विद्यार्थी प्राधान्य देत असतात. दहावीनंतर करिअरचा शेवटचा पर्याय म्हणून एकेकाळी ओळखल्या जाणाऱ्या ‘आयटीआय’ला चांगले दिवस आले आहेत.

सिन्नर शासकीय ‘आयटीआय’मध्ये प्रशिक्षण घेणाऱ्यांपैकी अनेक विद्यार्थी उद्योजक म्हणून स्वतःच्या पायावर उभे राहून इतरांचा आधार बनले आहेत. ही सकारात्मक बाब लक्षात घेऊन ‘आयटीआय’ने उद्योजक घडविण्यासाठी या वर्षापासून ‘उद्यमशिक्षा’ हा उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाद्वारे उद्योजकतेचे धडे दिले जात आहेत.

सिन्नरच्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थंत १३ प्रकारचे औद्योगिक व व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जातात. दहावीत नापास झालेले विद्यार्थी निराश असतात, या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे कौशल्य शिकून स्वतःच्या पायावर उभे राहावे, यासाठी येथे सुतारकाम, शीट मेटल कारागीर, वेल्डर, वेल्डिंग आणि सुतारकाम शिकविण्यात येत आहे.

दहावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी वीजतंत्री (इलेक्ट्रिशियन), जोडारी (फिटर), यंत्र कारागीर, मशिनिस्ट (टर्नर), कॉम्प्युटर ऑपरेटर अँड प्रोग्रमिंग असिस्टंट, इन्फॉर्मेशन अँड कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी सिस्टिम मेन्टेनन्स, इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आदी अभ्यासक्रम शिकविण्यात येत आहेत. तसेच प्रधानमंत्री कौशल विकास योजना स्किल हब इन्स्टिट्यूट योजनेंतर्गत अल्प मुदतीचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. डाटा एन्ट्री ऑपरेटर एसएससी उत्तीर्ण तीन महिने तसेच टेक्निशियन आठवी उत्तीर्ण तीन महिने हे कोर्स सुरू आहेत.

बदलत्या काळानुसार प्रत्येक अभ्यासक्रमासोबत स्वयंरोजगार कौशल्य हा स्वतंत्र विषय शिकवला जातो. प्रत्यक्ष उद्योगाच्या ठिकाणी भेट दिली जाते. दोन वर्षांपूर्वी अभ्यासक्रमात बदल करण्यात आला. नॅशनल स्किल क्वालिफिकेशन फ्रेमवर्क अंतर्गत सध्या अभ्यासक्रम शिकविला जात आहे. विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाबरोबरच रोज पाच तासांचे प्रात्याक्षिक घेतले जाते.

आयटीआयत प्रशिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीना बसभाडे आयटीआयमार्फत दिले जाते. ही योजना काही वर्षांपासूनसुरू होती. या वर्षीही ती सुरू आहे, अशी माहिती आयटीआयचे प्राचार्य नीलेश ठाकूर यांनी दिली.

हेही वाचा: अकरावीच्या पुढील टप्प्याची प्रतीक्षा लवकरच संपण्याची चिन्हे!

आयटीआयसाठी सध्या अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. ४०४ जागा उपलब्ध आहेत. पुढील वेळापत्रक जाहीर होणे बाकी आहे. १ ऑगस्टपासून प्रत्यक्ष आयटीआयला सुरुवात होईल. आयटीआय प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यातून उद्योजक घडविण्यासाठी चालू वर्षापासून उद्यमशिक्षा उपक्रम सुरू केला आहे.

- नीलेश ठाकूर, आयटीआय, प्राचार्य

सिन्नरच्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत वेल्डर, शीट मेटल, सुतारकाम प्रशिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी दर वर्षी बाहेर पडतात. एक किंवा दोन वर्षे प्रॅक्टिस केल्यानंतर त्यांनी स्वतःच्या पायावर उभे राहून स्वतः एक छोटा उद्योग सुरू करून अनेक तरुणांना रोजगार दिला आहे. त्यामुळे ते स्वयंपूर्ण होऊन अनेकांच्या हातांना काम मिळून देण्यात यशस्वी झाले आहेत.

- ए. एम. वाडीले, गटनिदेशक, शासकीय आयटीआय, सिन्नर

कॅम्पस इंटरव्ह्यूद्वारे विद्यार्थ्यांना नोकरी

मुसळगाव, सिन्नर तसेच नाशिक येथील अनेक औद्योगिक आस्थापने शासकीय आयटीआयच्या संपर्कात असतात, यासाठी अनेक कंपनी कॅम्पस इंटरव्ह्यू घेत अनेक विद्यार्थ्यांना नोकरी देतात, यासाठी नामांकित कंपनी कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देऊन स्वयंपूर्ण असा कामगार तसेच उद्योजक बनवतात, यासाठी सुमारे शंभर कंपन्या कॅम्पस इंटरव्ह्यू घेत असतात. यातून अनेक विद्यार्थ्यांची निवड नाशिक येथील बीटीआरआय या शासकीय कार्यालयामार्फत होते. विद्यार्थिनी आयटीआयमध्ये प्रशिक्षण घेऊन अनेक ठिकाणी काम करतात, यासाठी जी काही मदत लागते, ती शासकीय आयटीआय मार्फत करण्यात येते.

हेही वाचा: भाष्य : ‘शालेय रंगभूमी’चे शैक्षणिक महत्त्व

Web Title: Many Student Preferense For Iti In Sinnar Nashik News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..