Marathi Drama : संघर्ष, वेदना दाखवणारे ‘गांधी विरुद्ध गांधी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Marathi Drama

Marathi Drama : संघर्ष, वेदना दाखवणारे ‘गांधी विरुद्ध गांधी’

नाशिक : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी दक्षिण आफ्रिकेतून भारतहिताचे कार्य हाती घेतल्यानंतर त्यांना वैयक्तिक आयुष्यात करावा लागलेला संघर्ष आणि त्यातून झालेल्या वेदना दाखवणारे नाटक ‘गांधी विरुद्ध गांधी’ होय.

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत शुक्रवारी (ता. २४) महाकवी कालिदास कलामंदिरात अंबापेठ क्लब, अमरावती या संस्थेचे ‘गांधी विरुद्ध गांधी’ हे नाटक सादर झाले.

अजित दळवी लिखित आणि अॅड. प्रशांत देशपांडे दिग्दर्शित या नाटकात महात्मा गांधी यांच्या कार्यासह वैयक्तिक आयुष्यावर प्रकाशझोत टाकण्यात आला आहे. महात्मा गांधी यांनी साबरमती आश्रमापूर्वी दक्षिण आफ्रिकेतून आश्रमाचे काम सुरू केले. भारताला स्वातंत्र्य मिळावे या उदात्त हेतूने प्रेरित महात्मा गांधींनी वैयक्तिक आयुष्यात येणारी प्रलोभने टाळली. आपल्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याला त्यापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला.

अशाच एका प्रलोभनापासून त्यांनी आपला मुलगा हरी याला लंडनला शिकायला पाठवले नाही. त्यामुळे नाराज झालेला त्यांचा मुलगा हरी हा घर सोडून आपल्या पत्नीसह दुसऱ्या ठिकाणी राहायला जातो. स्वतः काही कमावत नसतानाही त्याने दुसरे अपत्य जन्माला घातल्याचा घेतलेला निर्णय गांधीजींना आवडला नाही.

इतकेच नव्हे तर त्याने आपल्या वडिलोपार्जित संपत्तीवर दाखवलेला हक्कही सांगण्यास गांधीजींनी नकार दिला. त्यामुळे दुःखी झालेले कुटुंब त्यांच्यापासून दुरावले. पण आपण करत असलेल्या कार्याची जबाबदारी आपल्या मुलांनी सांभाळावी, अशी आंतरिक इच्छा गांधीजींच्या मनात होती.

त्यापासून दुरावलेला मुलगा आणि आपल्या अपत्यांसाठी दुःखी होणारी त्यांची आई यांची व्यथा या नाटकातून सादर करण्यात आली. गांधीजी आपल्या हेतूपासून यत्किंचितही परावृत्त होत नाही, हेच या नाटकातून अंतिमतः दिसून येते.

स्पर्धा अंतिम टप्प्यात

राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत नाशिकमध्ये साधारणतः महिन्याभरापासून सुरू असलेली नाटके आता अंतिम टप्प्यात पोचली आहेत. महाकवी कालिदास कलामंदिर येथील सर्व नाटके झाली. आता फक्त परशुराम साईखेडकर सभागृहात पुढील दोन दिवसांत तीन नाटके सादर होणार आहेत. त्यानंतर ही स्पर्धा संपुष्टात येईल.

टॅग्स :Nashikdrama