esakal | बंदच्या आदेशानंतरही पिंपळगाव बाजार समिती सुरू; मग लासलगावलाच वेगळा न्याय का?

बोलून बातमी शोधा

Lasalgaoan Market
बंदच्या आदेशानंतरही पिंपळगाव बाजार समिती सुरू; मग लासलगावलाच वेगळा न्याय का?
sakal_logo
By
अरुण खंगाळ

लासलगाव (जि. नाशिक) : जिल्ह्यासह ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता मोठ्या कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद ठेवण्याच्या सूचना पालकमंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथील बैठकीत केल्या होत्या. लासलगाव बाजार समितीसह विंचूर आणि निफाड उपबाजार समितीही बंद राहणार आहेत. मात्र पिंपळगाव बसवंत येथील बाजार समितीत सर्व शेतमालाचे लिलाव सुरू राहणार असल्याने लासलगावला वेगळा न्याय का, असा प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

एकीकडे सलग तीन दिवस किंवा त्यापेक्षा अधिक दिवस बाजार समित्यांमध्ये शेतीमाल खरेदी-विक्रीचे व्यवहार बंद ठेवता येणार नाहीत, अशा प्रकारचे परिपत्रक पणन संचालनालयाने काढले. कोरोनामुळे गंभीर परिस्थिती उद्‍भवली तरी ‘अन्नपुरवठा साखळी’ सुरळीत ठेवण्यासाठी जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा होण्यासाठी बाजार समित्या सुरू ठेवा, अशा सूचना पणन मंडळाने केल्या आहेत. निफाड तालुक्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत असल्याने लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती, विंचूर आणि निफाड उपबाजार आवारावरील शेतमालाचे लिलाव २ मेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. परंतु पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीचे लिलाव सुरू राहणार आहे. लासलगाव बाजार समितीला एक न्याय आणि पिंपळगाव बसवंतला दुसरा न्याय का? असा प्रश्न आता शेतकरी विचारत आहे.

हेही वाचा: गॅंगस्टर रवी पुजारी नाशिक न्यायालयात हजर; मोठा पोलीस बंदोबस्त

शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली

मागील आठवड्यात मुख्य आवार व उपबाजार बंद राहिल्याने कांदा उत्पादकांची गैरसोय झाली. साधारण १५ कोटींवर उलाढाल ठप्प झाल्याची शक्यता आहे. एकीकडे उत्पादनात घट, वेळेवर विक्री न झाल्याने प्रतवारीत घसरण, उत्पादन खर्चाच्या खाली दर, अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. आता पुन्हा बाजार समिती बंद ठेवल्यामुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढली आहे.

वाढता कोरोनाचा प्रादुर्भाव बघता २७ एप्रिल ते २ मेपर्यंत बाजार समितीमधील शेतमालाचे लिलाव बंद ठेवण्याचे आदेश पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिले आहेत. त्यामुळे शेतमालाचे लिलाव बंद राहतील.

-सुवर्णा जगताप, सभापती, लासलगाव बाजार समिती

पिंपळगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सर्व शेतमालाचे लिलाव सुरळीत सुरू आहे.

- बाळासाहेब बाजरे, सचिव, पिंपळगाव बाजार समिती

लाल कांद्याला टिकविण्याची क्षमता कमी आहे. त्यात पुन्हा बाजार समित्या बंद राहिल्याने मोठे नुकसान झाले आहे. किमान शेतकरीवर्गाचे हित ठेवून निर्णय घ्यायला पाहिजे.

-निवृत्ती न्याहारकर, कांदा उत्पादक शेतकरी

हेही वाचा: लसोत्‍सवाचा भार खासगी रुग्‍णालयांवर; मुबलक लसींचा असावा साठा

बाजार समिती प्रशासनाने अधिकजी काळजी घेऊन लिलाव सुरू ठेवणे आवश्यक आहे. कांदा उत्पादकांचे नुकसान होत असल्याने खबरदारी घेऊन कामकाज सुरू ठेवा, अशी मागणी महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक संघटनेने केली आहे.

-भारत दिघोळे, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना