esakal | लसोत्‍सवाचा भार खासगी रुग्‍णालयांवर; मुबलक लसींचा असावा साठा

बोलून बातमी शोधा

vaccine
लसोत्‍सवाचा भार खासगी रुग्‍णालयांवर; मुबलक लसींचा असावा साठा
sakal_logo
By
प्रशांत बैरागी

नाशिक : लसीकरण मोहिमेची व्‍याप्ती वाढविताना गर्दी टाळण्यासाठी जास्‍तीत जास्‍त लसीकरण केंद्रे आणि अखंडित लसीकरणासाठी मुबलक लसींचा साठा असावा, अशी मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनने केली आहे. दरम्‍यान, १८ ते ४४ वयोटातील नागरिकांसाठीच्‍या या लसोत्‍सवाचा संपूर्ण भार खासगी रुग्‍णालयांवर येणार असल्‍याचे सूत्रांकडून सांगितले जात आहे. प्रशासकीय यंत्रणेतर्फे या संदर्भात आराखडा जारी केल्‍यावरच अधिक बाबी स्‍पष्ट होतील.

लसीकरण केंद्र वाढविताना मुबलक साठा देण्याची आयएमएची मागणी

कोरोना प्रतिबंधात्‍मक लसीकरण मोहिमेंतर्गत सध्या ४५ वर्षांच्‍या पुढील नागरिकांना लसीकरण केले जाते आहे. खासगी व शासकीय रुग्‍णालयांचे पर्याय त्‍यासाठी उपलब्‍ध आहेत. अशात मोहिमेची व्‍याप्ती वाढल्‍यानंतर सुसूत्रता आणण्यासाठी १८ ते ४४ वयोगटातील व्‍यक्‍तींना खासगी लसीकरण केंद्रातून लसीकरणाचा पर्याय दिला जाणार असल्‍याची शक्‍यता आहे. त्‍यासाठी जिल्ह्यातील ५० रुग्‍णालये प्राथमिक स्‍तरावर निश्‍चित झाल्‍याचे समजते. दोनच दिवसांत व्‍याप्ती वाढणार असली, तरी या संदर्भात ठोस मार्गदर्शक तत्त्वांची रुग्‍णालयांना प्रतीक्षाच होती.

हेही वाचा: कमालच! स्कोर १५, रेमडिसिव्हीर अन् ऑक्सिजनशिवाय आजोबांची कोरोनावर मात

या बाबींचा संभ्रम कायम...

बुधवारी (ता. २८) दुपारी चारला नोंदणी प्रक्रिया सुरू होताच पोर्टल संथगतीने चालत होते. त्‍यामुळे काही बाबींसंदर्भात संभ्रम निर्माण झाला आहे. नोंदणीवेळी लगेचच अपॉइंटमेंट मिळतेय की येत्‍या दोन-तीन दिवसांत मिळणार. केवळ खासगी रुग्‍णालयांतच १८ ते ४४ वयोगटासाठी सुविधा असेल, की शासकीय रुग्‍णालयांमध्येही लसीकरण करता येईल, याबाबत संभ्रमाची परिस्‍थिती कायम होती.

हेही वाचा: वजनदार मंत्र्यांच्या जिल्ह्यातच रेमडेसिव्हिरचा मुबलक पुरवठा; गिरीश महाजनांचा राज्य सरकारवर निशाणा

आयएमए, वैद्यकीय संघटनांच्‍या सूचना

* जास्‍तीत जास्‍त लसीकरण केंद्रे सुरू करून गर्दी टाळावी.

* लसीकरणाचा सुरळीत व मुबलक पुरवठा व्‍हावा.

* ४५ वर्षांपुढील, ज्‍येष्ठ व दुसरा डोस घेणाऱ्यांसाठी स्‍वतंत्र नियोजन असावे.

* केंद्रनिहाय लशीच्‍या कंपनीची निश्‍चिती झाल्‍यास सुलभता येईल.

* कोरोना केअर सेंटर परिसरात लसीकरण केंद्रे नकोत.

* लाभार्थ्यांची वाढती संख्या लक्षात घेता, निरीक्षण कक्षाची व्‍याप्ती वाढवावी.

* पोर्टलची कार्यप्रणाली सुरळीत चालावी, जेणेकरून नोंदणीला प्रतिसाद मिळेल.

लसीकरण मोहिमेचा वेग वाढवावा, अशी आमची मागणी आहे. जास्‍तीत जास्‍त खासगी रुग्‍णालयांत केंद्रे सुरू करण्यासंदर्भात आम्‍ही प्रशासकीय यंत्रणेची सहाय्यता करू शकतो. लसीकरणाची उपलब्‍धता सुरळीत असणे आवश्‍यक ठरेल. -डॉ. हेमंत सोननीस, अध्यक्ष, आयएमए नाशिक