Market Committee Election : मतदानापूर्वी 24 तास अगोदर प्रचार होणार बंद! आचारसंहिता लागू

Code-of-Conduct
Code-of-Conductesakal

नाशिक : लोकसभा, विधानसभा, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना असणाऱ्या आचारसहिंता आता कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या निवडणुकांना देखील लागू झाली आहे. बाजार समितीच्या निवडणुकांना यंदा प्रथमच आचारसंहिता लावण्यात आली आहे.

यात प्रामुख्याने मतदान सुरू होण्यापूर्वी २४ तास अगोदर प्रचारावर बंदी आली आहे. तर इलेक्ट्रॉनिक मीडियाद्वारे कोणतेही साहित्य प्रसारित करण्यापूर्वी त्या संदर्भात संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून सदर साहित्य तपासून प्रमाणपत्र घेणे बंधनकारक केले आहे.

सदर आचारसंहितेचे पालन होत आहे की नाही, आचारसंहिता भंग केली जात आहे का, याबाबत वॉच ठेवण्यासाठी स्वतंत्र अधिकाऱ्यांची नेमणूकदेखील करण्यात आली आहे. (Market Committee Election Campaigning will be closed 24 hours before voting Code of Conduct applies nashik news)

राज्य सरकारने महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम १९६६ मधील मुख्य नियमाच्या नियम ७ मधील पोटकलम (४) नंतर पाचचा समावेश करत कायद्यात दुरुस्ती केली. त्यानुसार समितीचे सदस्य स्वीकृत केले आहे. जुन्या निवडणूक नियमांमध्ये बाजार समितीसाठी आचारसंहितेची तरतूद नव्हती. मात्र, नवीन बदलामध्ये ती करण्यात आली आहे.

बाजार समिती निवडणूकप्रक्रियेत २७ मार्चपासून अर्ज दाखल करण्यास सुरवात झाल्याने ही आचारसंहिता लागू झाली आहे. सदर आचारसंहिता अंमलबजावणी करण्याचे अधिकार जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी (कृषी उत्पन्न बाजार समिती) यांना असतील. जिल्हा उपनिबंधक सतीश खरे यांनी जिल्ह्यातील बाजार समित्यांसाठी असलेली आचारसंहिता लागू केली आहे.

अशी आहे आचारसंहिता

१. आदर्श आचारसंहिता निवडणुकीसाठी तत्काळ प्रभावाने लागू होईल, बाजार समितीच्या क्षेत्रात तिच्याशी निगडित बाबींसाठी ही आचारसहिंता लागू असेल.

२. नामनिर्देशनपत्र सुरू होण्याच्या तारखेपासून ते मतमोजणी संपेपर्यंत ही आचारसंहिता राहील.

३. मतदानास सुरवात होण्यापूर्वी २४ तास अगोदर प्रचार बंद होईल.

४. आचारसंहितेचे पालन करणे सर्व संबंधितांना बंधनकारक आहे.

५. आचारसंहितेच्या अंमलबजावणीत बाजार समितीच्या दैनंदिन कामकाजात खंड पडता कामा नये. अत्यावश्यक निविदा काढणे, जाहिराती देणे आदींसाठी राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाची परवानगी बंधनकारक राहील.

हेही वाचा : जीएसटीसाठी नोंदणी केलीच नाही तर??

Code-of-Conduct
Nashik ZP News : प्रशासकीय मान्यतेसाठी लोकप्रतिनिधींची धावपळ!

६. बाजार समितीचा कोणताही सेवक, त्या बाजार समितीच्या निवडणुकीत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरीत्या सहभाग घेणार नाही. सेवकाने निवडणुकीमध्ये व प्रचारामध्ये कोणत्याही उमेदवारासाठी अथवा पॅनलसाठी प्रत्यक्ष अथवा अप्रत्यक्षरीत्या सहभागी होऊ नये. या काळात सर्व सेवक हे निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली येतील.

७. आचारसंहिृताकाळात बाजार समितीच्या सेवकांच्या बदल्या करता येणार नाही. निवडणूक निर्णय अधिकारी निवडणूक कामकाजाच्या सोईसाठी व निवडणूक कालावधीपुरते निवडणुकीचे कामकाजासाठी त्यांची बदली करू शकतील.

८. बाजार समितीच्या खर्चाने पूर्ण झालेल्या कामांचे उद्‌घाटन समारंभ आदी याकाळात आयोजित करता येणार नाहीत.

९. आचारसंहिता कालावधीत बाजार क्षेत्रात किंवा बाजार क्षेत्राच्या बाहेरही संस्थेच्या खर्चाने संचालक मंडळाने दौरे करू नयेत. विश्रामगृहाचा वापर संचालकास, उमेदवारास करता येणार नाही.

१०. बाजार समितीची सर्व वाहने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली राहतील. निवडणूक निर्णय अधिकारी बाजार समितीच्या वाहनांचा वापर निवडणुकीच्या कामकाजासाठी व संस्थेच्या दैनंदिन कामकाजासाठी करू शकतील. कोणत्याही परिस्थितीत निवडणुकीच्या काळात प्रचारमोहीम, निवडणूक कार्य किंवा निवडणुकीशी संबंधित प्रचार करण्यासाठी बाजार समितीच्या वाहनांचा वापर होणार नाही.

११. निवडणुकीशी संबंधित व्यक्तीस शस्त्रास्त्रे बाळगता येणार नाहीत. ही बंदी निवडणूकप्रक्रिया पूर्ण होईपर्यंत अमलात राहील.

१२. प्रचाराचा कालावधी संपल्यानंतर इलेक्ट्रॉनिक मीडयिाद्वारे देखील प्रचारावर बंदी राहील.

१३. आचारसंहितेच्या कालावधीमध्ये संबंधित बाजार समितीच्या सेवेत भरती करण्याच्या दृष्टीने जाहिराती देणे, मुलाखती घेणे इ. करण्यात येऊ नये.

१४. बाजार समितीच्या अधिमंडळाचे वार्षिक, तसेच संचालक मंडळ व विविध समित्यांच्या (विषय समित्या इ.) बैठका ज्या कायद्यानुसार घेणे बंधनकारक आहे, त्या घेता येतील. परंतु त्यात मतदारांवर प्रभाव पडेल, असे कोणतेही निर्णय घेता येणार नाहीत.

Code-of-Conduct
Market Committee Election : नाशिक बाजार समिती निवडणुकीत तिसऱ्या दिवशी 12 उमेदवारांचे अर्ज दाखल!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com