Market Committee Election : शेतकऱ्यांच्या उमेदवारीवरून संभ्रम; पेच निर्माण होण्याची शक्यता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Market Committee Election

Market Committee Election : शेतकऱ्यांच्या उमेदवारीवरून संभ्रम; पेच निर्माण होण्याची शक्यता

नाशिक : जिल्हयातील कृषी उत्पन्न बाजार समितींच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी मतदारयाद्यांचा कार्यक्रम घोषित झालेला असताना दुसरीकडे, या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांच्या उमेदवारीचा अधिकार देण्यासाठी ठरविण्यात आलेल्या पात्रतेच्या निकषांमध्ये मोठा गोंधळ समोर आला आहे.

शेतकऱ्यांची व्याख्या स्पष्ट होत नसल्याने निवडणुकीत पेच निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर, निवडणूक कार्यक्रम जाहीर तसेच निवडणुकीनंतरही शेतकऱ्यांच्या उमेदवारीवरून हरकती दाखल होऊ शकतात असे बोलले जात आहे. (Market Committee Election Confusion over farmers candidature Potential for embarrassment nashik news)

यंदा राज्य सरकारने बाजार समिती अधिनियम १९६३ मध्ये दुरुस्ती केली व शेतकऱ्यांना उमेदवारीचा अधिकार प्रदान केला आहे. मात्र, मतदानाचा अधिकार देण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांचा मतदारयादीत समावेश झाल्यास निवडणूक खर्चात वाढ होऊन त्यामुळे बाजार समित्या अडचणीत येतील, या भीतीमुळे केवळ उमेदवारीचा अधिकार प्रदान केला गेला.

दरम्यान, १० गुंठे जमीनधारणा असलेले शेतकरी उमेदवारीकरिता पात्र ठरणार आहेत. या शेतकऱ्यांकडे बाजार समितीची कोणतीही थकबाकी नसावी एवढी एकमेव अट लावण्यात आलेली आहे.

पाच वर्षांमध्ये तीन वेळा बाजार समितीत मालाची विक्री करण्याची अट यावर्षी होणाऱ्या निवडणुकांमध्ये लागू होणार नाही. कारण, शेतमालाची विक्री केलेल्या शेतकऱ्यांची माहिती सरकारला त्यासाठी वेळेत मिळू शकली नव्हती.

आयकर भरणाऱ्या शेतकऱ्यांबाबतही नवीन धोरणामध्ये झाल्यानंतर, कोणतीही स्पष्टता करण्यात आलेली नाही. त्यामुळे असे शेतकरीही उमेदवारीसाठी पात्र ठरणार का, याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

दहा गुंठ्यापेक्षा अधिक शेतजमीन असणाऱ्या व्यापारी, तसेच हमाल या घटकांनाही शेतकरी म्हणून उमेदवारी करता येणार का, हे समजू शकलेले नाही. त्यामुळे सहकार विभागातील अधिकारी वर्गही गोंधळात पडले आहेत.

हेही वाचा : ..ही काळजी घ्या नाहीतर खिसा होईल साफ!

साराच सावळागोंधळ

बाजार समितीच्या निवडणुकीकरिता सेवा संस्था, ग्रामपंचायत, हमाल मापाडी व व्यापारी हे मतदारसंघ अस्तित्वात आहेत. आता त्यात शेतकऱ्यांचीही भर पडणार आहे. मात्र, अनेक ठिकाणी हमाल हे सेवा संस्थांचे संचालक म्हणून कार्यरत आहेत.

त्यांची नावे कोणत्या मतदार यादीत समाविष्ट करायची असा पेच आहे. दहा गुंठ्यांपेक्षा अधिक शेतजमीन असणाऱ्या व्यापाऱ्यांचीही यात भर पडली आहे.

२४ ला अंतिम मतदार याद्या

जिल्हयातील बाजार समित्यांचा मतदार याद्यांचा कार्यक्रम १० फेब्रुवारीपासून सुरू झाला आहे. यात बाजार समित्यांनी १ सप्टेंबर २०२२ नंतर निवडून आलेल्या सदस्यांची नावे अंतिम मतदारयादीत समाविष्ट करून मतदार यादी तयार करावी.

त्यानुसार बाजार समित्यांमध्ये हे काम सुरू आहे. तयार झालेली ही मतदार यादी जिल्हा परनिंबधक कार्यालयास २४ फेब्रुवारीला सादर केली जाणार आहे.