esakal | पारनेर येथे अप्रकाशित गिरिदुर्ग 'भोरवाडी' किल्ल्याचा शोध
sakal

बोलून बातमी शोधा

 bhorwadi fort

पारनेर येथे अप्रकाशित गिरिदुर्ग 'भोरवाडी' किल्ल्याचा शोध

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : पारनेर (जि. नगर) येथील सपाट पठारी भागावर अनेक ऐतिहासिक भुईकोट किल्ले, गढी आणि वेसयुक्त गावे आहेत. परंतु, त्यावर आता नव्याने गिरिदुर्गाची भर पडली आहे. वैनतेय गिर्यारोहण गिरिभ्रमण संस्‍थेचे विश्‍वस्‍त तथा जिल्‍हा गिर्यारोहण संघाचे सचिव गिर्यारोहक सुदर्शन कुलथे यांनी यासंदर्भात माहिती दिली. पारनेरच्‍या म्हसोबा झाप येथील अप्रकाशित अशा भोरवाडी किल्ल्याचा शोध त्‍यांनी घेतला आहे. (mountaineer from nashik has discovered bhorwadi fort at Parner)

कुलथे यांनी दिलेल्‍या माहितीनुसार हरिश्चंद्र गडापासून सह्याद्रीची उपरांग थेट पारनेर शहराच्या दिशेना जाताना या उपरांगेची उंची कमी होत जाते. त्यावरील मांडओहोळ धरणाजवळील म्हसोबाझाप ग्रामपंचायतीतील भोरवाडी येथील किल्ला आतापर्यंत अप्रकाशित होता. परिसरात असलेल्या ऐतिहासिक ठिकाणांची भटकंती आणि अभ्यास करत असताना भोरवाडी किल्ल्याचा शोध घेतला.

नगरहून पश्चिमेकडे कल्याण महामार्गावरून म्हसोबा झाप भोरवाडी साठ किलोमीटर, तर पारनेरपासून ३८ किलोमीटरवर आहे. भोरवाडी किल्ल्याची चढाई सोप्या श्रेणीची आहे. कण्हेरवाडी आणि भोरवाडी गावातून किल्ल्यावर जाता येते. परिसरातील लोक किल्ल्याच्या टोकदार निमुळत्या आकारामुळे त्याला ‘चुचुळा’ नावाने संबोधतात. भोरवाडी गावातून मुख्य किल्ला व त्यालगत असलेला छोटा डोंगर यांच्या खिंडीतून वर चढाईचा मार्ग आहे. पायथ्यापासून माथ्यापर्यंतची चढाई केवळ ११० ते १२० मीटरची आहे. किल्ल्यावर चढाई मार्गात खडकातून खोदीव मार्ग आणि अनेक पायऱ्या कोरलेल्या दिसतात. तटबंदीचे जोते आणि पायऱ्यांजवळ ओळीने छोटे गोलाकार छिद्रे कोरलेली दिसून येतात. माथ्यावरील सपाटीच्या भागावर गडफेरी करता येते. सर्वोच्च माथ्यावर नैसर्गिकरीत्या पडलेले अनेक मोठे दगड आहेत. त्यावर स्थानिक ग्रामस्थांनी चकाकणारे स्फटिकाचे छोटे दगड ठेवून त्याची बांगड्या, हळद-कुंकू वाहून पूजा केलेली दिसते. स्थानिक लोक याला ‘माउलाई देवी’ नावाने पुजतात. किल्ल्याला प्रत्यक्ष अभ्यास दौऱ्यादरम्यान सुदर्शन कुलथे यांच्याबरोबर राहुल सोनवणे, हेमंत पोखरणकर, भाऊसाहेब कानमहाले आणि मनोज बाग यांनीदेखील किल्ल्याची पहाणी केली. नाशिकचे ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ व दुर्ग अभ्यासक गिरीश टकले यांचे शोधमोहिमेला मार्गदर्शन लाभले. किल्ल्याच्या माथ्यावरून पारनेर तालुक्याचा बराचसा पठारी भाग दृष्टिपथात येतो.

हेही वाचा: पावसाच्या ओढीमुळे नाशिक जिल्ह्यावर पाणीटंचाईचे सावट

गिरिदुर्ग प्रकारातील एकमेव किल्‍ला

नगर निजामशाहीच्या मुख्य भागात हा किल्ला असल्याने याची निर्मिती आणि इतिहास निजामशाही काळातील टेहाळणी दुर्ग असण्याची दाट शक्यता आहे. भोरवाडीचा किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारातील एकमेव किल्ला प्रकाशात आला आहे. गिरिदुर्गांमध्ये एक महत्त्वपूर्ण भर पडली असल्‍याचे कुलथे यांनी सांगितले.

(mountaineer from nashik has discovered bhorwadi fort at Parner)

हेही वाचा: मोदी, नाशिक अन् ‘त्या’ दोघी…

loading image