esakal | नाशिकमध्ये मॉलला परवानगी; नाट्यगृहांना कधी? मनोरंजनाला अजूनही ब्रेकच
sakal

बोलून बातमी शोधा

theater

मॉलला परवानगी; नाट्यगृहांना कधी?

sakal_logo
By
तुषार महाले

नाशिक : कोरोनामुळे (corona virus) सांस्कृतिक कार्यक्रमांसह चित्रपट, नाट्यगृहांना परवानगी मिळाली नसल्याने हजारो कलाकार अस्वस्थ आहेत. व्यवसायावर पूर्णवेळ अवलंबून कलाकारांची तसेच चित्रपट, नाट्यगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची, तसेच कलावंतांची परवड सुरू आहे. नाशिकमध्ये मॉलला परवानगी दिली. त्याप्रमाणे ५० टक्के क्षमतेसह चित्रपट, नाट्यगृह सुरू करावी. नाट्यगृहांमध्ये प्रथम प्रायोगिक, व्यावसायिक नाटकांना परवानगी दिल्यास घरात बसलेल्या प्रेक्षकांचे मनोरंजन होण्यास मदत होईल, असे जाणकारांचे म्हणणे आहे. (Movies-theaters-need-permission-nashik-marathi-news)

चित्रपट, नाट्यगृहांना परवानगी मिळणे गरजेचे

कोरोना दुसरी लाट ओसरल्यानंतर नाशिकमध्ये सर्व क्षेत्र खुली झाली असून, पूर्वपदावर आली आहे. आता फक्त सांस्कृतिक कार्यक्रमांसह चित्रपट, नाट्यगृह यांना परवानगी मिळणे बाकी आहे. नाशिकमध्ये पहिल्या लाटेत परवानगी मिळाल्यानंतर पहिला प्रयोग दोन महिन्यानंतर जानेवारीत झाला. त्यामुळे परवानगी मिळाल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी प्रयोग होईल असे नाही. त्यासाठी तारखांचे नियोजन आवश्यक असते. नागरिकांच्या मनात कोरोनाची भीती असली तरी प्रेक्षक मनोरंजनासाठी आसुसलेला आहे. मार्चमध्ये निर्बंध लावताना नागरिकांचे मनोरंजन होत राहावे, यासाठी प्रशासनाने महाकवी कालिदास कलामंदिरात होणाऱ्या प्रयोगांना परवानगी दिली होती. अभिनेता प्रशांत दामले, भरत जाधव यासारख्या अभिनेत्यांनी नाशिकमध्ये येत नाटकाचे प्रयोग ५० टक्के क्षमतेत हाउसफुल करून दाखविले. मात्र, आता परिस्थिती वेगळी असून प्रेक्षकांना कसे चित्रपट, नाट्यगृहाकडे वळवावे असा प्रश्‍न कायम आहे. दरम्यान, पालकमंत्री भुजबळ पुढील आठवड्यात होणाऱ्या आढावा बैठकीत यासंदर्भात निर्णय घेण्याची शक्यता आहे.

प्रेक्षक, कलावंत नाटकापासून वंचित

नाट्यगृहांना प्रायोगिक तत्त्वावर ५० टक्के क्षमतेसह परवानगी मिळायला हवी. त्यामुळे सुरवात होण्यास मदत होईल. जर प्रादुर्भाव वाढला तर नाट्यगृह पुन्हा बंद करता येऊ शकतात. ज्याप्रमाणे मॉलला परवानगी दिली आहे. त्याअर्थी नाट्यगृहांना परवानगी देऊन शिथिल करायला हरकत नाही. प्रेक्षक, कलावंत नाटकापासून वंचित आहे.

- प्रा. रवींद्र कदम, अध्यक्ष, नाट्यपरिषद.

नाट्यगृह, चित्रपटगृह यांच्यावर सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले हजारो कलाकार, गायक, सूत्रसंचालक वादक, तंत्रज्ञ, निर्माते यांना उपजीविकेचे साधन मिळते. नाटकाचा प्रेक्षक समजूतदार असतो. नाट्यगृह, चित्रपटगृह बंद असल्यामुळे सगळे घरी बसले आहे. सांस्कृतिक भूक भागविल्यास मानसिक स्वास्थ्य जपण्यास मदत होईल. कलावंत काळजी घेतील. -सचिन शिंदे, दिग्दर्शक

मॉल सुरू झाल्यानंतर नाट्यगृह, चित्रपटगृहांना परवानगी देण्यात यावी, नाट्यगृह सुरु झाल्यास अनेकांचा रोजगाराचा प्रश्‍न सुटेल. रसिक प्रेक्षक जाणकार असल्याने ते काळजी घेतील. नाट्यगृहामधील कर्मचाऱ्यांचे जवळपास लसीकरण झाले आहे. नाट्यगृह, चित्रपटगृहांचे मोठे नुकसान होत आहे. नाट्यगृहांना परवानगी दिल्याने तारखांचे वाटप झाल्यानंतर प्रयोग सुरू होतील. - आनंद जाधव, नाट्यसेवा

हेही वाचा: भाजीपालाखाली लपविले घबाड; पिक-अप अपघातात सत्य समोर

हेही वाचा: राजकारण करण्यापेक्षा तोडगा काढा - खा. संभाजीराजे

loading image