गोमातेच्या सन्मानासाठी
१ डिसेंबरला मुंबईत आंदोलन
जिल्ह्यातून जाणार दोन हजार गोसेवक
सकाळ वृत्तसेवा
जळगाव, ता. १७ : देशभरात गोहत्या पूर्णपणे बंद करावी, गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा द्यावा, यासह विविध मागण्यांसाठी ‘गो सन्मान आव्हान अभियान’ राबविण्यात येत आहे. या अभियानांतर्गत १ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन करण्यात येणार असून, जळगाव जिल्ह्यातून सुमारे दोन हजार गोसेवक सहभागी होणार असल्याची माहिती मनोजचंद्र महाराज यांनी पत्रकार परिषदेत दिली.
अभियानाची माहिती देण्यासाठी मंगळवारी विसनजी नगरातील गायत्री मंदिरात पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी भाजपचे महापालिकेतील गटनेते प्रकाश बालाणी, गोसेवक श्याम करमचंदाणी, गायत्री मंदिराचे सदस्य तुकाराम माळी आणि हरी देशमुख उपस्थित होते. मनोजचंद्र महाराज म्हणाले, की १ डिसेंबरला दुपारी दोन वाजता आंदोलनाला सुरुवात होईल. यानिमित्ताने राबविण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेतील सह्यांसह राज्य शासनाला निवेदन देण्यात येणार आहे. देशात गोहत्या बंदीचा कठोर कायदा करणे, गोमातेला राष्ट्रमातेचा दर्जा देणे, गोसेवकांसाठी केंद्रीय कायदा करणे आणि स्वतंत्र केंद्रीय गो मंत्रालय स्थापन करणे, या प्रमुख मागण्या आहेत. या आंदोलनात सर्व हिंदू संघटनांचे प्रतिनिधी आणि गोसेवकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्रकाश बालाणी यांनी केले.