esakal | नाशिकमध्ये गणेश मंडळांना शुल्क माफी; जाहिरात शुल्क मात्र कायम
sakal

बोलून बातमी शोधा

Ganesh festival 2021

नाशिकमध्ये गणेश मंडळांना शुल्क माफी; जाहिरात शुल्क मात्र कायम

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : सार्वजनिक गणेश मंडळांना कोरोनामुळे वर्गणी संकलित करता न आल्याने महापालिकेकडून आकारले जाणारे साडे सातशे रुपयांचे जाहिरात शुल्क माफ करण्यात आले आहे. नाशिक महानगर गणेशोत्सव महामंडळाने गुरुवारी (ता.९) आयुक्तांची भेट घेतल्यानंतर निर्णय घेण्यात आला. दरम्यान, सार्वजनिक ठिकाणी मंडप उभारणीसाठी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांकडून प्राप्त ६५२ अर्जांपैकी ४०३ मंडळांचे अर्ज नाकारण्यात आले आहेत.


महापालिकेकडून कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर कमीत-कमी गर्दी होण्यासाठी उपाययोजना आखण्यात आल्या आहेत. त्यात मंडप धोरणाची कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. महापालिकेने मंडप उभारणीसाठी एक महिना अगोदर ऑनलाइन परवानगीसाठी अर्ज दाखल करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मंडप परवानगी घेताना सार्वजनिक गणेश मंडळांकडून ७५० रुपये जाहिरात शुल्क आकारण्यात आले होते. कोरोनामुळे गणेश मंडळांना वर्गणी संकलित करता आली नाही, तसेच अनेक मंडळांनी वर्गणी न घेण्याचा निर्णय घेतला होता. त्यामळे महापालिकेनेदेखील जाहिरात शुल्क आकारू नये, अशी मागणी मंडळांनी केली होती. त्याऐवजी नाममात्र शंभर रुपये शुल्क आकारण्याचा पर्याय दिला होता, मात्र महापालिकेने मागणी फेटाळल्याने नाराजी व्यक्त करताना शुल्क माफीसाठी महापालिकेसमोर आंदोलनाचा इशारा दिला होता. गुरुवारी (ता. ९) महापौर सतीश कुलकर्णी व आयुक्त कैलास जाधव यांची महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली. गणेश महामंडळाचे अध्यक्ष समीर शेटे, पदाधिकारी गणेश बर्वे, सत्यम खंडागळे, रामसिंग बावरी, माजी आमदार वसंत गिते, शिवसेनेचे नगरसेवक सुधाकर बडगुजर, शिवसेनेचे गटनेते विलास शिंदे आदी या वेळी उपस्थित होते. आयुक्त जाधव यांनी मंडप शुल्कापोटी ऑनलाइन आकारले जाणारे ७५० रुपये शुल्क माफ करण्याचा निर्णय जाहीर केला. मात्र, जाहिरात शुल्क कायम ठेवले. यापूर्वी ज्या मंडळांना शुल्क आकारण्यात आले. त्यांना शुल्काचा परतावा मिळणार नाही. आजपासून म्हणजे नऊ सप्टेंबरपासून शुल्क माफ केले जाणार आहे.

हेही वाचा: हॉटेल कामगाराचा दगडाने ठेचून खून; हत्येचा थरार सीसीटीव्हीत कैद


४०३ मंडळांचे अर्ज नाकारले

महापालिकेच्या संकेतस्थळावर ६५२ सार्वजनिक मंडळांनी मंडप उभारणीसाठी अर्ज सादर केले होते. त्यातील ४०३ मंडळांचे अर्ज नाकारण्यात आले. १२८ मंडळांनीच नियमांची पूर्तता केल्याने त्यांना मंडप उभारणीसाठी परवानगी देण्यात आली. १२१ मंडळांच्या अर्जांवर निर्णय प्रलंबित आहे. पंचवटी विभागात सर्वाधिक १८९ अर्ज आले. त्यातील ११४ अर्ज नाकारताना ४९ मंडळांना परवानगी दिली. सिडकोत १३१ अर्जांपैकी ८३ मंडळांची परवानगी नाकारून २८ मंडळांना परवानगी दिली. पूर्व विभागात १२२ पैकी ९७ मंडळांची परवानगी नाकारून सोळा मंडळांना परवानगी दिली. पश्चिम विभागात ९३ अर्जांपैकी ५१ मंडळांचे प्रस्ताव नाकारले, तर आठ मंडळांना परवानगी दिली. सातपूर विभागात ६१ अर्ज दाखल झाले. त्यातील २६ मंडळांना परवानगी नाकारून दहा मंडळांना परवानगी दिली. नाशिक रोड विभागात ५६ अर्ज प्राप्त झाले. त्यातील सतरा मंडळांना परवानगी दिली.

हेही वाचा: नाशिक : भुजबळांच्या निर्दोष मुक्ततेनंतर समर्थकांचा जल्लोष

loading image
go to top