
महापालिका निवडणुकांचा बिगुल वाजणार; 'या' महिन्यात होणार मतदान
नाशिक : महापालिका निवडणुका (Municipal elections) वेळेत होतील कि नाही यावर गेल्या दिड महिन्यांपासून सुरु असलेल्या चर्चेला पुर्ण विराम मिळाला आहे. राज्य निवडणुक आयोगाने मुंबई महापालिकेचा आरक्षण विरहीत प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार नाशिक महापालिकेचा आरक्षण विरहीत प्रारुप आराखडा मंगळवारी (ता. १) जाहीर केला जाणार आहे. त्याच तारखेपासून हरकती व सूचना मागविल्या जाणार असून त्यानुसार एप्रिल महिन्यात महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होतील अशी माहिती प्रशासन उपायुक्त मनोज घोडे-पाटील यांनी दिली. महापालिका निवडणुकांसाठीचा हा पहिला व महत्वाचा टप्पा असल्याने त्याअनुशंगाने निवडणुकीचा बिगुल वाजणार आहे.
मुंबईच्या धर्तीवर नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभागरचना
नाशिक महापालिकेसह राज्यातील १८ महापालिकांची मुदत मार्च २०२२ मध्ये संपुष्टात येत आहे. कोरोना (Corona), आरक्षणाच्या (Reservation) गोंधळामुळे अद्यापर्यंत निवडणुकीच्या प्रक्रियेला विलंब झाला आहे. नियमित वेळेत निवडणुक झाल्यास आता पर्यंत आचारसंहिता लागु होणे अपेक्षित होते परंतू तसे न झाल्याने अनेक इच्छुकांची घालमेल वाढली. सहा जानेवारीला प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा सादर करण्यात आला होता. ओबीसी आरक्षणाबाबत (OBC Reservation) ८ फेब्रुवारीला निर्णय होणार असल्याने प्रारूप प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर करण्यास विलंब होईल. त्यामुळे राज्य निवडणुक आयोगाने मुंबई महापालिकेचा प्रारूप प्रभाग रचनेचा एक फेब्रुवारीला जाहीर करण्याचे घोषित केले. निवडणूक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारूप अधिसूचना शासन राजपत्रात प्रसिध्द केली जाणार असून याच तारखेपासून हरकती व सूचना मागविल्या जातील. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेची प्रारूप प्रभागरचना जाहीर केली जाणार आहे.
हेही वाचा: कंत्राटी कामगारांच्या वेतन वाढीचा फरक मिळण्यासाठी 'तारीख पे तारीख'
असा आहे प्रभाग रचनेचा कार्यक्रम
- १ फेब्रुवारी- निवडणुक प्रभागांच्या सीमा दर्शविणारी प्रारुप अधिसुचना शासन राजपत्रात प्रसिध्द करणे.
- १ ते १४ फेब्रुवारी- प्रारुप अधिसुचनेवर हरकती व सुचना मागविणे.
- १६ फेब्रुवारी- प्राप्त हरकती व सुचनांचे विवरण पत्र राज्य निवडणुक आयोगाला सादर करणे.
- २६ फेब्रुवारी- राज्य निवडणुक आयोगाच्या अधिकायांसमोर हरकती व सुचनांवर सुनावणी.
- २ मार्च- सुनावणीनंतर शिफारशींसह राज्य निवडणुक आयोगाला अहवाल पाठविणे.
विभागिय कार्यालयात आराखडे
दरवेळी प्रारुप प्रभागरचना जाहीर करण्याचा कार्यक्रम महाकवी कालिदास कलामंदिर मध्ये होतो. प्रभाग आरक्षणाची सोडतही येथेचं काढली जाते. परंतू कोरोनामुळे पालिका मुख्यालयात मुख्य कार्यक्रम व सहाही विभागीय कार्यालयात त्या-त्या विभागातील प्रभागांची प्रारूप रचना प्रसिध्द केली जाणार आहे. त्याशिवाय महापालिकेच्या वेबसाईटवर अपलोड केली जाणार आहे.
१५ मार्चलाचं मुदत संपणार
नाशिक महापालिकेची पंचवार्षिक मुदत पंधरा मार्चला संपुष्टात येत आहे. त्यानुसार एक मार्चला महापौर, उपमहापौर कार्यालयाला त्यासंदर्भातील पत्र नगरविकास विभागाकडून प्राप्त होईल. या कालावधीत निवडणुक न झाल्यास प्रशासकीय राजवट लागू होईल. परंतू त्यापुर्वीचं प्रशासकीय राजवट लागु होणार असल्याचे बोलले जात आहे. परंतू महापालिकेच्या सातव्या पंचवार्षिकची मुदत संपुष्टात येत नाही. तोपर्यंत प्रशासकीय राजवट लागू होणार नाही. त्यापुर्वी प्रशासक बसवायचा असल्यास महापालिका बरखास्त करावी लागेल. परंतू बरखास्ती शक्य नसल्याने प्रशासक बसविण्याच्या चर्चेला पुर्णविराम मिळाला आहे.
हेही वाचा: नाशिक : महावितरणच्या विरोधात शेतकऱ्यांचे शोले स्टाईल आंदोलन
एप्रिल महिन्यात निवडणुक?
एक फेब्रुवारीला प्रारुप प्रभाग रचनेचा आराखडा जाहीर केला जाईल. १४ फेब्रुवारी पर्यंत हरकती व सुचना मागविल्यानंतर राज्य निवडणुक आयोगाकडे अहवाल सादर करण्यापर्यंत साधारण फेब्रुवारी अखेर प्रभाग रचना अंतिम केली जाईल. या दरम्यान मतदार याद्यांचे भागनिहाय विभाजन होईल. मार्च महिन्याच्या पहिल्या आठवड्यात निवडणुक कार्यक्रम जाहीर करण्याचा निर्णय घेतल्यास पुढील ४५ दिवसात एप्रिल महिन्याच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात निवडणुक होवू शकते अशी माहिती सुत्रांनी दिली.
Web Title: Municipal Elections Will Held In Maharashtra Nashik Political News
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..