esakal | अंत्यसंस्काराचे वेटिंग टळणार; महापालिका करणार स्वतंत्र ॲप विकसित
sakal

बोलून बातमी शोधा

funeral

अंत्यसंस्काराचे वेटिंग टळणार; महापालिका करणार स्वतंत्र ॲप विकसित

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहरामध्ये कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना विविध कारणांमुळे मृत्यूच्या प्रमाणातदेखील वाढ झाली आहे. एकीकडे मृत्यूंची संख्या वाढत असताना दुसरीकडे स्मशानभूमीमध्ये (death funeral) अंत्यसंस्कारासाठी वेटिंग (waiting) करण्याची वेळ रुग्णांच्या नातेवाइकांना आली आहे. पाच ते सहा तासांच्या प्रतीक्षेच्या पार्श्वभूमीवर महापालिकेतर्फे शहरातील स्मशानभूमीमध्ये जागा आहे की नाही, याची माहिती ऑनलाइन पद्धतीने नागरिकांना देण्यासाठी ॲप्लिकेशन (online app) विकसित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ( municipality develop app for Waiting funeral)

अंत्यसंस्काराचे वेटिंग टळणार

चार दिवसांपूर्वीच शहरात दोन लाखांच्या पार कोरोना रुग्णांचा आकडा पोचला आहे. महापालिकेच्या दप्तरी दीड हजार मृत्यूंची नोंद झाल्याचे दिसत असले तरी प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणात शहरात मृत्यू झाले आहेत. एप्रिलच्या १ ते १६ तारखेपर्यंत सव्वादोन हजारांहून अधिक मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. ५ मेपर्यंत हाच आकडा पावणेपाच हजारांपर्यंत गेल्याचे बोलले जात आहे. मृत्यूचा आकडा वाढत असल्याने शहरातील स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना पाच ते सहा तास वेटिंग करावे लागते. मृत्यूनंतरचा प्रवासदेखील खडतर होत असल्याने नागरिकांचा रोष वाढत आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने ऑनलाइन पद्धतीने स्मशानभूमीमध्ये जागा शिल्लक आहे की नाही, याची माहिती देण्यासाठी ॲप विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. ॲप्लिकेशनच्या माध्यमातून शहरातील १७ स्मशानभूमींची माहिती मिळणार आहे. स्मशानभूमीत किती बेड आहेत, त्यातील किती बेडची नोंदणी झाली, नोंदणी झालेल्या बेडपैकी किती रिक्त आहेत, याची माहिती तर मिळेलच त्याशिवाय ॲपच्या माध्यमातून स्मशानभूमीमधील बेडची नोंदणीदेखील करण्याची सोय उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न सुरू आहेत. स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर यानिमित्ताने वेटिंग करण्याची वेळ नागरिकांवर येणार नाही, अशी माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली. येत्या आठ दिवसांत ॲप विकसित होईल.

हेही वाचा: कोव्हॅक्सिनच्या दुसऱ्या डोससाठी ज्येष्ठांची फरफट; अनेकांचे जीव टांगणीला

शहरात १७ ठिकाणी स्मशानभूमी असली तरी बहुतांशी नागरिकांचा पंचवटी व नाशिक अमरधाममध्ये अंत्यसंस्कार करण्याकडे कल आहे. त्यामुळे स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कारासाठी नागरिकांना वाट वाट पाहावी लागते हे टाळण्यासाठी अंत्यसंस्काराचे स्वतंत्र ॲप्लिकेशन तयार केले जात आहे.-कैलास जाधव, आयुक्त, महापालिका

हेही वाचा: 'सुला विनियार्ड'ची कोरोना विरुद्धच्या लढ्यासाठी एक कोटींची मदत