
MVP Election : कोतवालांच्या ऐंट्रीने गायकवाडांचा पत्ता कट
नाशिक : मविप्र निवडणुकीच्या घडामोडींना वेग आलेला असून, बदलत्या समिकरणांनुसार उमेदवारांच्या भूमिकादेखील बदलत आहेत. मंगळवारी (ता.९) झालेल्या मेळाव्यात संदीप गुळवे अचानक विरोधीपक्षाच्या व्यासपीठावर दिसून आले.
चांदवड तालुक्यातून माजी आमदार शिरीष कोतवाल यांनी अर्ज दाखल केला असल्याने जिल्हा परिषद माजी उपाध्यक्ष डॉ.सयाजी गायकवाड यांचा पत्ता कट झाल्याची चर्चा सुरु होती. (MVP Election Shirish Kotwal entry being problematic for dr sayaji Gaikwad nashik Latest marathi news)
सत्ताधाऱ्यांवर टीका करतांना ॲड. नितीन ठाकरे यांच्यासोबत डॉ. सयाजी गायकवाड हेदेखील वेळोवेळी पत्रकार परिषदांना उपस्थिती राहिले आहेत. चांदवड तालुक्यातून त्यांची तयारी सुरू होती. माजी आमदार शिरीष कोतवाल यांनीही चांदवडमधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे.
अशात मंगळवारी झालेल्या मेळाव्यात श्री.कोतवाल यांनी व्यासपीठावरून सत्ताधार्यांवर टीका केली. दुसरीकडे डॉ.गायकवाड व्यासपीठावर उपस्थित नव्हते. त्यामुळे ऐनवेळी डॉ.गायकवाड यांचा पत्ता कट करत श्री.कोतवाल यांना ॲड. ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील परिवर्तन पॅनलकडून चांदवड तालुक्यातून उमेदवारी दिली जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
दरम्यान कालपर्यंत सत्ताधारी गटाकडून इच्छुक असलेले संदीप गुळवे मंगळवारी मात्र रॅली व मेळाव्यात विरोधी गटाच्या चमूत दिसून आले. त्यांनी व्यासपीठावरून भाषणही केले. या बदललेल्या समिकरणामुळे यापूर्वी परिवर्तन पॅनलकडून इगतपुरीकरीता उमेदवारीसाठी इच्छुक उमेदवारांमध्ये नाराजीचा सूर असल्याचे बोलले जात आहे.