
नाशिक : (येवला) कोरोनाच्या अफवातून पोल्ट्री व्यवसायाला आलेल्या मंदीने व्यावसायिक हतबल झाले आहेत. पण या मंदीचे रूपांतर संधीत करण्याची किमया शहरालगतच्या बल्हेगाव येथील नानासाहेब पिंगळे यांनी साधली आहे. त्यांनी अशी शक्कल लढविली की सगळे अवाक झाले. मेहनत अन् चिकाटीसोबतच संकटाशी दोन हात करत त्यांनी मंदीच्या सवटात साधली संधी...
मंदीचे रूपांतर संधीत
पिंगळे या युवा शेतकऱ्याने राज्यशास्त्रात एम.ए. करून संगणक डिप्लोमा करून आपल्या वडिलोपार्जित साडेचार एकर जमिनीतच सोने पिकवायचा चंग बांधला. मात्र यश हुलकावणी देतच होते. अशातच पोल्ट्रीचा निर्णय घेतला. दहा वर्षांत सुमारे दीड-दोन कोटी रुपये खर्च करून पोल्ट्रीफार्म उभारला. ही रक्कमही बॅंका, पतसंस्था यांच्याकडून कर्ज काढून उभी केली. या पोल्ट्रीत 60 दिवसाला 30 हजार कोंबड्या म्हणजे दोन महिन्यांना सुमारे 70 टन चिकन व दोन हजार अंडी उत्पादन क्षमता आहे. देशातील अनेक शहरांत या पोल्ट्रीच्या कोंबड्या वितरित होतात. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाबाबतच्या अफवांमुळे पोल्ट्री व्यवसाय धोक्यात येऊनही पिंगळे यांनी हताश न होता, या मंदीचे रूपांतर संधीत केले. त्यांनी एक पत्रक छापून चिकन व अंडी घरपोच देणार असल्याचे सांगितले.
चार मुले कामासाठी बोलावली अन् कल्पना सत्यात उतरवली
वितरणाबाबत पिंगळे यांनी सांगितले, की कोरोना विषाणूच्या भीतीने व कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतीने पोल्ट्रीफार्म व्यवसाय धोक्यात आला आहे. सोशल मीडियावरील अफवांमुळे चिकन व अंडी खरेदीकडे दुर्लक्ष होत आहे. याचाच फटका पोल्ट्रीफार्म व्यावसायिकांना बसला. तेजी असो अथवा मंदी, 40 दिवस सांभाळून पोल्ट्रीधारकाला किलोमागे फक्त पाच रुपये मिळतात. मात्र व्यापारी कमी कष्टात दुपटीहून अधिक नफा कमावतात. कोरोनामुळे चिकनला ग्राहक कमी झाला असला तरी रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रोटिन्सची गरज असते. ही बाब हेरून मी स्वतः चार मुले कामासाठी बोलावली अन् चिकन, अंडी घरपोच देण्याची कल्पना सत्यात उतरवली. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यांनी सुरू केलेला घरपोच चिकन अन् अंडी देण्याचा फंडा लोकप्रिय होत आहे.
बाजारात मिळत असलेल्या भावातच ताजे आणि चांगले चिकन प्लॅस्टिक कंटेनरमध्ये उपलब्ध होत असल्याने ग्राहकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस वाढतच आहे. शहरापासून अवघ्या साडेतीन किलोमीटरवर पोल्ट्री असल्याने ग्राहक थेट पोल्ट्रीला भेट देऊन चिकन खरेदी करीत आहेत. - नानासाहेब पिंगळे, पोल्ट्री व्यावसायिक, बल्हेगाव
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.