नारोशंकराची घंटा! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

naroshankar

नारोशंकराची घंटा!

मॅडम, तेवढं सांभाळून घ्या...

राजकारणात तटस्थ राहणे काही सोपे नसते. दोनपैकी एक भूमिका घ्यायची वेळ येते, तेव्हा अशा तटस्थ कार्यकर्त्यांची चांगलीच कोंडी होते, याचा प्रत्यय नुकताच नाशिकमध्ये आला. सध्या अनेक इच्छुकांनी विधानसभा निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. (naroshankarachi ghanta by sakal nashik news)

यात, एक महिला तहसीलदाराचे नावही विधानसभेच्या देवळालीतील इच्छुक म्हणून चर्चेत आहे. काही दिवसांपूर्वी देवळालीच्या आमदारांनी नाशिकच्या एका महिला तहसीलदारांविरोधात विधानसभेत तक्रार करीत, संबधित अधिकारी कामात व्यत्यय आणत असल्याचा आरोप केला.

तेवढ्यावर न थांबता त्यांनी पत्रकार परिषद घेऊन महिला तहसीलदारांवर आरोप केले होते. त्या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या काही कार्यकर्त्यांची मात्र नंतर चांगलीच कोंडी झाली. अशीच कोंडी झालेल्या एका गावच्या प्रतिष्ठित पदाधिकाऱ्याने थेट तहसीलदार मॅडमला फोन केला.

अहो, तुमच्याशी एक विषय बोलायचा आहे. त्या दिवशी आमदारांच्या पत्रपरिषदेला मी होतो, पण मॅडम पत्रकार परिषद कशासाठी होती, हे काही मला माहिती नव्हते. आपल्या गावातील धरणाच्या विषयावर असल्याचे मला ऐनवेळी कळले. गावाचे प्रश्न असले म्हणजे आम्हाला आमदार आणि तुमची पण मदत होत असते.

त्यामुळे आम्हाला काही राजकीय वादात इंटरेस्ट नाही. काही वेळा पक्षीय भूमिका म्हणून घेत सोबत राहावे लागते. त्यामुळे तुन्ही काही मनावर घेऊ नका, सांभाळून घ्या, असे सांगत कार्यकर्त्याने बाजू मांडून मान सोडवून घेतली.

हेही वाचा: नारोशंकराची घंटा : `भाऊ तुम्ही माझी चप्पल घातली!’

प्रेमासाठी ‘तो’ बनला डमी उपनिरीक्षक

प्रेमात सर्व काही माफ असते, असं म्हटलं जातं. म्हसरूळ येथील एक तरुण नवविवाहितेच्या प्रेमात पडला. इतकेच नाही, तर काही दिवसांपूर्वी तिला भेटण्यासाठी त्याने थेट शिक्रापूर गाव गाठले.

त्यांची प्रेमकथा येथेच संपत नाही, तर त्याने चक्क पोलिस उपनिरीक्षक बनून तिची भेट घेतली. त्यासाठी त्याने आजोबा आणि कुटुंबीयांकडून खर्चासाठी देण्यात आलेल्या पाच हजारांच्या रकमेतून पोलिस उपनिरीक्षकाचा ड्रेस (वर्दी) शिवून घेतला.

स्टार, बेल्ट, बूट अशा विविध वस्तू खरेदी करून खराखुरा पोलिस उपनिरीक्षक शोभेल, अशी वेशभूषा केली. त्यानंतर तिला भेटण्यासाठी गेला. दोघेही चर्चा करताना परिसरातील काही नागरिकांना त्याच्यावर संशय आला. त्यांनी सजगता दाखवत स्थानिक पोलिसांना माहिती दिली. शिक्रापूर ग्रामीण पोलिस तेथे दाखल झाले.

त्यास बघताच प्रथम तेदेखील थक्क झाले. अधिक चौकशी केली असता तो बनावट पोलिस उपनिरीक्षक असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी त्यास बेड्या ठोकत त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. शुक्रवार (ता.२०) शिक्रापूर पोलिस संशयिताला घेऊन भद्रकाली पोलिस ठाण्यात दाखल झाल्यानंतर सर्व प्रकार उघडकीस आला.

शालिमार येथील एका टेलरकडे त्याने ड्रेस शिवल्याने टेलरच्या चौकशीसाठी पोलिस संशयितास घेऊन आले होते. प्रेमासाठी कोण काय करेल हे सांगता येत नाही, अशी चर्चा भद्रकाली पोलिस ठाण्यात रंगली होती.

हेही वाचा: नारोशंकराची घंटा : तेल गेले अन तूपही गेले...