
नारोशंकराची घंटा
ताफ्यापेक्षा परवडला ‘दिवा'
वेळ : दुपारची. स्थळ : नाशिकमधील अशोकस्तंभ चौकाचा परिसर.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे डोंगरे वसतिगृह मैदानावरील कार्यक्रम आटोपून पुढील कार्यक्रमासाठी निघालेले होते. चौकात बंदोबस्त तैनात झाला होता. गर्दीही होतीच. उत्साही तरुणांनी पोलिसांकडे चौकशी केल्यावर मुख्यमंत्री येताहेत म्हटल्यावर गर्दी वाढत गेली आणि तरुणांनी मोबाईलद्वारे चित्रीकरण सुरु केले.
तरुणांमध्ये केंद्रीय मंत्रीमंडळाच्या निर्णयानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वाहनावरील काढलेल्या ‘दिव्या'ची चर्चा सुरु झाली. इतक्यात सायरन वाजवत आलेल्या वाहनांच्या पाठीमागून वाहनांचा ताफा पुढे सरकत गेला. मैदानाच्या बाजूने आलेल्या रिक्षाचालकांची रिक्षा बाजूला घेण्यासाठी तारांबळ सुरु झाली.
हे सारे चित्र पाहत असताना गर्दीतून एक उंच स्वरात म्हणाला, की ताफ्यापेक्षा ‘दिवा' परवडला. हे ऐकताच, एकच हंशा पिकला. मग कुणी हात वर करत होते, तर कुणी हात जोडून नमस्कार करण्यास सुरवात केली होती. मुख्यमंत्र्यांचा ताफा पुढे सरकल्यावर गर्दी नियंत्रणासाठी वाहतूक पोलिसांची तारांबळ तरुणाई पाहत होती. (Naroshankarachi ghanta sakal special comedy tragedy nashik news)
खुर्चीचे काही खरे नाही
गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांच्या श्री समर्थ सेवामार्गातर्फे आयोजित महोत्सवाची रविवारी नाशिकमध्ये सांगता झाली. गुरूमाऊलींसह मुख्यमंत्री मार्गदर्शन करणार असल्याने मोठी गर्दी लोटली होती. अशावेळी प्रथम रांगेत बसलेली एक व्यक्ती काही कारणाने जागेवरून उठल्याची संधी साधत दुस-या व्यक्तीने त्यांच्या खुर्चीचा ताबा घेतला.
संबंधित व्यक्ती पुन्हा त्या जागेवर बसण्यासाठी आली असता त्याठिकाणी बसलेल्या व्यक्तीने उठण्यास नकार दिला. तेव्हा संबंधितांनी ही आपली खुर्ची असल्याचे त्याला सांगितले. तेव्हा त्याठिकाणी बसलेल्या व्यक्तीने संबंधिताला ‘कुणाची खुर्ची कधी जाईल’ याचा नेम नसल्याचे सांगताच उपस्थितांमध्ये चांगलीच हशा पिकली.
हेही वाचा :....इथं बनतो आपला लाडका तिरंगा
दोन मिनिटात होते ‘शेव्हिंग’
औरंगाबाद दौ-यावर निघालेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अचानक जाहीर झालेल्या या दौऱ्याने पोलिसांची चांगलीच दमछाक झाली. एक पोलिस कर्मचाऱ्याची दाढी वाढलेली असल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले.
त्या अधिका-याने संबंधित कर्मचाऱ्यांची चांगलीच कानउघाडणी केली. पोलिस कर्मचाऱ्याने वेळ मिळाला नाही, असे कारण सांगताच अधिका-याने त्या कर्मचाऱ्याला दोन मिनिटात शेव्हींग होते, तरीही वेळ मिळाला नाही का? असा प्रश्न केला, तेव्हा संबंधितांचा चेहरा पाहण्यासारखा झाला होता.