पेरूचा फंडा! द्राक्षापाठोपाठ नाशिक शहर पेरूच्या लागवडीतही आघाडीवरच...वाचा सविस्तर

peru.jpg
peru.jpg
Updated on

नाशिक : एखाद्या जमिनीवर आरक्षण पडल्यानंतर त्या जमिनीचा दोन ते चारपट मोबदला मिळतो; परंतु त्याव्यतिरिक्त त्याच जमिनीवर फळझाडांची लागवड करण्यात आली असेल तर त्या झाडाच्या वयोमानानुसार किमान चारपट मोबदला मिळत असल्याने आरक्षित जागांवर अधिकाधिक फळझाडांची लागवड करून शासनाकडून अधिकाधिक मोबदला मिळविण्याचा नवा फंडा सध्या नाशिक व परिसरात मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. 

आतापर्यंत ३८ टक्के क्षेत्राचा विकास 

तोडण्यास अधिक सोपे व अधिक मोबदला मिळवून देणाऱ्या पेरूच्या अधिक महिन्यांच्या रोपांना पसंती दिली जात आहे. या फंड्यामुळे द्राक्षापाठोपाठ नाशिक शहर पेरूच्या लागवडीतही आघाडीवर आले आहे. नाशिक शहरातील मोकळ्या जमिनींवर उद्याने, शाळा, दवाखाने, व्यायामशाळा, समाजमंदिरे, रस्ते आदींसाठी आरक्षणे टाकण्यात आली आहेत. आरक्षणांची संख्या एक हजाराच्यावर आहे. वाढत्या शहराच्या अनुषंगाने भविष्यातही आणखी आरक्षण पडणार आहे. शहरात बांधकामाखाली एकूण ९८.६३ चौरस किलोमीटर क्षेत्र आहे. त्यांपैकी आतापर्यंत ३८ टक्के क्षेत्राचा विकास झाला आहे. त्यामुळे निवासी क्षेत्र शहरात मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. 

आरक्षित जागांवर फळबाग लागवड 

एखाद्या भूखंडावर आरक्षण पडल्यास दहा वर्षांत आरक्षित जागा ताब्यात घेणे बंधनकारक असते. परंतु रोख स्वरूपात मोबदला घेण्याकडे अनेकांचा कल असतो. शहरी भागात जागा असेल तर दुप्पट, तर ग्रामीण भागात सरकारी प्रयोजनासाठी जागा ताब्यात घ्यायची असेल तर चौपट मोबदला द्यावा लागतो. मोबदला देताना जागेची किंमत तर असतेच परंतु त्याशिवाय जागेवर विहीर, झाडे असल्यास त्याचाही मोबदला द्यावा लागतो. त्यामुळे नाशिकमध्ये आरक्षित जागांवर फळझाडे लावून अधिकाधिक मोबदला मिळविण्यासाठी जागामालकांचे प्रयत्न आहेत. 

पेरूचे झाड लागवडीला अधिक पसंती

आंबा, पपई किंवा अन्य झाडे लावल्यास त्याचा मोबदला कमी मिळतो. परंतु पेरू नगदी पीक असते. पेरूच्या झाडाची उंची सहा ते सात फुटांपेक्षा अधिक नसते. पेरूचे झाड उगविण्यासाठी फारशी मेहनत नसल्याने आरक्षित जागांवर अधिकाधिक पेरूची झाडे शहरात दिसून येत आहेत. पेरूचे झाड तोडण्यासाठी परवानगी बंधनकारक असली तरी उंचीमुळे ते झाड तोडले तरी लक्षात येत नसल्याने चौपट मोबदल्यासह पेरूचे झाड लागवडीला अधिक पसंती मिळत आहे. 

दृष्टिक्षेपात नाशिक शहर

क्षेत्र : २६ हजार ७४७.७५ हेक्टर 
विकसित क्षेत्र : ११ हजार ७०२.६८ हेक्टर 
अविकसित क्षेत्र : १५ हजार ४४.३३ हेक्टर 
निवासी प्रयोजन : ५,८७५.३६ हेक्टर 
व्यावसायिक : २१९.७३ हेक्टर 
औद्योगिक : १५६९.९८ हेक्टर 
सार्वजनिक प्रयोजन : ८२७.४१ हेक्टर 
सार्वजनिक सुविधा : १६८.४६ हेक्टर 
उद्याने, मैदान ः १२६.८३ हेक्टर 
सिडको : ३९८ हेक्टर 

अविकसित क्षेत्र 

कृषी : ८९६१.४९ हेक्टर 
जलस्रोत ः ९५५.३३ हेक्टर 
वने : ५६९.१३ हेक्टर 
मोकळे : ४,५५९.३३ हेक्टर 

(संपादन - किशोरी वाघ)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com