esakal | नाशिक शहर बसचे लोकेशन एका क्लिकवर! कमांड कंट्रोल सेंटर, मोबाईल ॲपवर माहिती
sakal

बोलून बातमी शोधा

nashik bus

नाशिक शहर बसचे लोकेशन एका क्लिकवर! नागरिकांमध्ये उत्सुकता

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : नव्याने सुरू झालेल्या शहर बससेवेला दिवसागणिक प्रतिसाद मिळत असल्याने या सेवेबाबत नाशिककरांमध्ये उत्सुकता निर्माण झाली असून, कमांड कंट्रोल सेंटरला जोडण्यात आलेली इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) बससेवेत सर्वाधिक आकर्षण ठरत आहे. एका क्लिकवर बसची सर्व माहिती सीसीसी सेंटरकडे उपलब्ध होत असल्याने अगदी कमी वेळेत, कमी मनुष्यबळात प्राप्त होणाऱ्या डाटामुळे भविष्यात परिवहन सेवेबरोबरच सार्वजनिक वाहतुकीची इत्थंभूत माहिती महापालिकेकडे उपलब्ध होणार आहे. (nashik-city-bus-location-at-one-click-marathi-news)

कमांड कंट्रोल सेंटर, मोबाईल ॲपवर माहिती

९ जुलैपासून शहरात नियमित बससेवा सुरू झाली आहे. दररोज एक लाख रुपयांवर महसूल, तर पाच हजारांपर्यंत दररोज प्रवासी प्रवास करत आहेत. सध्या २७ बस रस्त्यावर धावत असून, पुढील काळात २५० बस रस्त्यावर उतरविण्याचे नियोजन आहे. नवी मुंबई, पुण्याच्या धर्तीवर बससेवेत आधुनिक तंत्रज्ञान वापरण्यात येऊन कमांड कंट्रोल सेंटरला सर्व सुविधा जोडण्यात आल्या आहेत. त्यामुळे नेमक्या काय आहेत आधुनिक सेवा याबाबत कमांड कंट्रोल सेंटरच्या पाहणीतून घेतलेला धांडोळा.---------

कंमाड कंट्रोल सेंटरचे बसवर नियंत्रण

-आयटीएमएस सेवा शहर बससेवेत इंटेलिजंट ट्रान्स्पोर्ट मॅनेजमेंट सिस्टिम (आयटीएमएस) प्रणालीचा वापर करण्यात आला आहे. इंटरनेटच्या माध्यमातून कंमाड कंट्रोल सेंटरला सेवा जोडण्यात आल्याने बसवर नियंत्रण ठेवता येते. प्रवाशांना वेळापत्रक, मार्गाचे किलोमीटर, प्रवासास लागणाऱ्या वेळेची माहिती उपलब्ध होते. व्यवस्थापनास प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे फेऱ्यांचे नियोजन करता येते.

-ईटीआयएम सेवा : याद्वारे इलेक्ट्रॉनिक टिकिटिंग इस्युइंग मशिन (ईटीआयएम) जोडण्यात आले आहे. या मशिनमध्ये जीपीएस तंत्रज्ञान वापरण्यात आले आहे. या मशिनद्वारे प्रवासी तिकीट व अन्य सवलती दिल्या जातात. तिकीट काढल्यानंतर तीस संकेदांत कमांड कंट्रोल सेंटरला संदेश पोचतो. ३० सेकंदांपर्यंत वाहकांनी मशिनचा वापर न केल्यास लॉगआउट होते. बसमध्ये किती प्रवासी आहेत? किती भाडे येते? कोणत्या आगारात किती भाडे जमा होते? किती पासेस असलेल्या प्रवाशांनी प्रवास केला? कोणत्या वेळेत जास्त प्रवाशांनी प्रवास केला? कोणत्या मार्गावर किती प्रवासी प्रवास करतात? कोणता मार्ग फायदेशीर आहे? या संदर्भातील अचूक माहिती सतत प्राप्त होते.

-एव्हीएलएस सेवा : ऑटोमॅटिक व्हेइकल लोकेशन सिस्टिम प्रणाली कंमाड कंट्रोल सेंटरला जोडण्यात आली आहे. या माध्यमातून बसचा मार्ग, वेळ, सध्या बस कुठल्या मार्गावर आहे, शेवटचे लोकेशन आदी माहिती या प्रणालीद्वारे प्राप्त होते. बस नियमित न धावणे, थांब्यावर न थांबणे, चालकांकडून बस वेगाने किंवा हळुवार चालविणे आदी माहिती कमांड कंट्रोल सेंटरकडे प्राप्त होते.

-जिओ फेन्सिंग : जीपीएस यंत्रणेद्वारे बस व बसथांब्यामध्ये कनेक्टिव्हिटी ठेवण्यात आली आहे. त्यामुळे बसथांब्यावर आल्यानंतर उद्‌घोषणा होते. बसमधील इलेक्ट्रॉनिक रूट बोर्डावर थांब्याचे नाव येते व पुढील बसथांब्याची घोषणा होते. बस निर्धारित थांब्यावर थांबत नसल्यास त्या संदर्भातील माहिती जीपीएसद्वारे कमांड कंट्रोल सेंटरला प्राप्त होते व त्यातून चालकाच्या हालचालींवर नियंत्रण ठेवता येते.

हेही वाचा: इलेक्ट्रीक बाईकची बॅटरी चार्जिंग करताना स्फोट

-पीआयएस : पब्लिक इन्फर्मेशन सिस्टिमद्वारे निवारा शेडमध्ये थांब्यावर येणाऱ्या बसची येण्याची व जाण्याची वेळ दर्शविली जाणार आहे. त्यातून वेळ वाचविण्यास मदत होणार आहे.

-मोबाईल ॲप : प्रवाशांना मोबाईलमध्ये सिटीलिंक ॲप्लिकेशन उपलब्ध करून देण्यात आले आहे. यात बसचे सध्याचे लोकेशन, सचा मार्ग, बुक माय टिकिट, व्ह्यू टिकिट, माय पास, माय फिवरेट्स, फीडबॅक, हेल्पलाइन या सेवा उपलब्ध आहेत. प्रवासी मी कुठे आहे, मार्गावरील बस रूटची माहिती, मोबाईलवरून तिकीट बुक करणे, पासेस काढणे आदी सुविधा ॲपमध्ये उपलब्ध आहेत.

हेही वाचा: येवलेकरांना प्रथमच 2 मंत्री, 3 आमदार, 2 सभापतिपदांचा लाभ!

loading image