esakal | येवलेकरांचे नशीब फळफळले! 2 मंत्री, 3 आमदार, 2 सभापतिपदांचा लाभ
sakal

बोलून बातमी शोधा

bhujbal and pawar

येवलेकरांना प्रथमच 2 मंत्री, 3 आमदार, 2 सभापतिपदांचा लाभ!

sakal_logo
By
संतोष विंचू

येवला (जि.नाशिक) : एकेकाळी येवलेकरांना साधे जिल्ह्यातील संस्थांवर पदे मिळत नव्हती तेव्हा मुंबई-दिल्ली तर दूरच... पण २००४ पासून येवलेकरांचे नशीब फळफळले आहे. सध्या तालुका खूपच नशीबवान समजला जातोय. कारण केंद्रात, राज्यात मंत्रिपद, मतदारसंघाला तीन आमदार, जिल्हा परिषदेत दोन मानाची सभापतिपदे या महत्त्वाच्या पदांचा लाभ इतिहासात प्रथमच येवल्याच्या पदरात पडला आहे. (Nashik-district-got-Honorable-posts-marathi-news)

येवलेकरांना प्रथमच दोन मंत्री, तीन आमदार, दोन सभापतिपदांचा लाभ

कधीतरी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपद, जिल्हा बँकेचे अध्यक्षपद येवलेकरांच्या नशिबात गेल्या दोन दशकांपूर्वी पडले होते. मात्र, २००४ मध्ये हेवीवेट नेते छगन भुजबळ यांनी हा मतदारसंघ निवडला आणि येवलेकरांच्या भाळी तेव्हापासून लाल दिव्याचे नशीब उजळले. कधीकाळी चुकूनही लाल दिवा पाहायला न मिळालेला हा मतदारसंघ आता आठवड्यातून एक-दोनदा तरी लाल दिवा पाहतोच. त्यातच दिंडोरी मतदारसंघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांना केंद्रात मंत्रिपद मिळाल्याने केंद्रीय मंत्रिपदाचा योगदेखील या मतदारसंघाच्या वाट्याला आला आहे. भुजबळांच्या रूपाने २००४ ते २०१५ या दहा वर्षांत सार्वजनिक बांधकाम मंत्रिपद मतदारसंघाला लाभले. त्यानंतरची पाच वर्षे खडतर गेली, पण पुन्हा २०१९ पासून अन्न व नागरी पुरवठामंत्रिपदाच्या रूपाने लाल दिवा मिळाला असून, सलग तिसऱ्या पंचवार्षिकला राज्यात मंत्रिपद मिळाले आहे.

२०१८ मध्ये तर नाशिक स्थानिक स्वराज्य संस्थेत नरेंद्र दराडे व विभागात शिक्षक आमदारपदी किशोर दराडे हे बंधू २१ दिवसांच्या फरकाने निवडून आले आणि राज्यात पुन्हा येवला चर्चेत आले होते. दराडे बंधूंसह भुजबळ यांच्या रूपाने तीन आमदार या मतदारसंघाला लाभले असून, तिन्ही सत्तेतील पक्षातील असल्याने नक्कीच वेगवेगळ्या कामांना चालना मिळत आहे, तर वर्षापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या पदाधिकारी निवडीत येथील जिल्हा परिषद सदस्य संजय बनकर यांच्या रूपाने कृषी व पशुसंवर्धन सभापती, तर सुरेखा दराडे यांच्या रूपाने आरोग्य व शिक्षण सभापती पददेखील मिळाले आहे, तसेच दोन वर्षांपूर्वी जिल्हा बँकेचे अध्यक्षपद दराडे यांच्या माध्यमातून, तर जिल्हा मजूर फेडरेशनचे अध्यक्षपद संभाजी पवार यांच्या माध्यमातूनही येथे मिळाले होते.

हेही वाचा: इलेक्ट्रीक बाईकची बॅटरी चार्जिंग करताना स्फोट

एकूणच भुजबळ येथे आल्यापासून या मतदारसंघाचे वर्चस्व वाढले आहे. आता दिल्ली दरबारीदेखील मतदारसंघाच्या असलेल्या खासदार पवार यांच्या रूपाने राज्यमंत्रिपद प्रथमच मिळाल्याने हादेखील या मतदारसंघाचा सन्मानच म्हणावा लागेल. अर्थात, अर्धा डझन पदे येवलेकरांच्या नशिबी आल्याने येथील रखडलेल्या महत्त्वाच्या कामांना चालना मिळावी, अशी अपेक्षा व्यक्त होऊ लागली आहे. विशेषत: दिल्ली दरबारी अडकलेल्या महत्त्वाच्या प्रश्‍नांना मंत्री पवार यांच्या माध्यमातून अधिक चालना मिळेल, अशी अपेक्षा मतदारसंघाला आहे.

लोकसभेला भाजपवर प्रेम

येवला शहर भाजपचा बालेकिल्ला असल्याचे सांगितले जाते. अर्थात, भुजबळ येथील प्रतिनिधी झाल्यापासून शहरासह तालुका राष्ट्रवादीचा बालेकिल्ला बनला आहे. असे असले तरी सर्व निवडणुकांत राष्ट्रवादी व शिवसेनेमागे राहणारा हा तालुका लोकसभेला मात्र भाजपच्या पारड्यात भरभरून दान टाकतो. माजी खासदार हरिश्‍चंद्र चव्हाण यांच्या दोन्ही निवडणुकांत तालुक्याने मताधिक्य दिले होते. किंबहुना २०१४ मध्ये भुजबळांच्या माध्यमातून राष्ट्रवादीकडून लढलेल्या भारती पवारांपेक्षा चव्हाण यांना येथून मताधिक्य मिळाले होते. मात्र, त्याच पवार जेव्हा २०१९ मध्ये भाजपकडून उमेदवार झाल्या त्या वेळेस भाजप-शिवसेनेच्या एकत्रित प्रयत्नांतून तब्बल २५ हजार मतांचे लीड येवलेकरांनी दिले आहे. इतिहास पाहिल्यास लोकसभेला सलग गेल्या पंधरा वर्षांपासून भाजपवर प्रेम असलेल्या या मतदारसंघाला डॉ. पवारांकडून आता विकासासाठी काय अन्‌ कसा लाभ होईल, हेही पाहणे औत्सुक्याचे ठरेल!

हेही वाचा: मुंबई-नाशिक महामार्गाने प्रवास करणार असाल तर बातमी तुमच्यासाठी

loading image