esakal | नाशिक शहर कडक लॉकडाउनच्या दिशेने!मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय

बोलून बातमी शोधा

Lockdown

नाशिक शहर कडक लॉकडाउनच्या दिशेने!मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर निर्णय

sakal_logo
By
विक्रांत मते

नाशिक : शहरात कोरोना संसर्गाचा वेग वाढत असताना, मृत्यूच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत आहे. महापालिकेसह प्रशासकीय यंत्रणेवरचा ताण वाढला आहे. राज्य शासनाने ‘ब्रेक द चेन’ अंतर्गत संचारबंदी लागू केली असली, तरी नागरिकांचा सार्वजनिक ठिकाणांवरील मुक्तसंचार कमी होत नाही. त्यामुळे देशात कोरोनावाढीत चौथ्या क्रमांकावर आलेल्या नाशिकमध्ये कडक लॉकडाउन होण्याची शक्यता आहे.

६७ व्यापारी संघटनांसह प्रमुख अधिकाऱ्यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे कडक लॉकडाउनसंदर्भात मत मांडले असून, मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर बुधवारी (ता.२१) कडक लॉकडाउनची अंमलबजावणी शक्य होणार असल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली.

बुधवारपासून शहरात कडक लॉकडाउन..!

अडीच महिन्यांत कोरोना संसर्गवाढीचा वेग भयानक असल्याने अशा परिस्थितीला महापालिका, जिल्हा प्रशासन सामोरे जात आहे. खासगी व महापालिकेच्या रुग्णालयांतील बेड फुल झाले. ऑक्सिजन बेड शिल्लक नाहीत. कधी रेमडेसिव्हिर, तर कधी रक्त व प्लाझ्माचा तुटवडा जाणवत आहे. सामाजिक संस्था कोविड सेंटर निर्मितीसाठी पुढे आल्या असल्या, तरी मेडिकल स्टाफ कमी पडत आहे. अशा परिस्थितीत कोरोना संसर्गाचा वेग वाढतच असल्याने देशात नाशिक चौथ्या क्रमांकावर आले आहे. त्यामुळे आता यापूर्वी लॉकडाउन नको, अशी भूमिका घेणाऱ्या व्यापाऱ्यांच्या ६७ संघटनांनी ‘जनता कर्फ्यू’ची घोषणा केली आहे. औद्योगिक क्षेत्रातूनही लॉकडाउनची मागणी होत आहे. अधिकारी वर्गही कडक लॉकडाउनच्या भूमिकेत आहे. या सर्व पार्श्‍वभूमीचा विचार करता मंगळवारी (ता. २०) किंवा बुधवारी (ता. २१) मंत्रिमंडळाच्या बैठकीत पालकमंत्री छगन भुजबळ, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर लॉकडाउनसंदर्भातील अहवाल सादर करणार आहेत. त्यानंतर बुधवारपासून शहरात कडक लॉकडाउनची अंमलबजावणी होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.

हेही वाचा: एकाच आठवड्यात कुटुंब उद्ध्वस्त! महापालिकेच्या ‘बिटको’तील अव्यवस्थेचे तीन बळी