Nashik Coproration Election : इच्छुक उमेदवार वाढवत आहेत ‘कनेक्टिव्हिटी’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

 इच्छुक उमेदवार

इच्छुक उमेदवार वाढवत आहेत ‘कनेक्टिव्हिटी’

नाशिक रोड : नाशिक रोड परिसरातील सहा प्रभागांमध्ये इच्छुकांनी आपल्या राजकीय हालचाली गतिमान करायला सुरवात केली आहे. प्रभाग रचना जाहीर झाली नाही, म्हणून सध्या सर्वच पक्षाच्या इच्छुकांनी ‘वेट ॲन्ड वॉच’ची भूमिका स्वीकारली आहे. कनेक्टिव्हिटी टिकवून ठेवण्यासाठी सध्या नाशिक रोडमध्ये वेगवेगळे फंडे वापरले जात आहे. एकंदरीत सर्वच पक्षांचे इच्छुक सध्या गुडघ्याला बाशिंग बांधून उभे राहिले आहेत.

हेही वाचा: पटियाला मधुन लढणार कॅप्टन अमरिंदर सिंह; म्हणाले "मी पळून..."

नाशिक रोड भाग सुरवातीपासूनच सेनेचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, मागील पंचवार्षिकला भारतीय जनता पक्षाने शिवसेनेला जोरदार टक्कर देत २३ जागांपैकी सर्वाधिक १२ जागा मिळविल्या आणि नाशिक रोड विभागात एक नंबरचा पक्ष बनला. सध्या शिवसेना आणि भाजप या दोन प्रतिस्पर्धी पक्षात इच्छुकांची संख्या जास्त आहे. त्याखालोखाल राष्ट्रवादी काँग्रेस आणि मनसे या पक्षांमध्ये इच्छुक पाहायला मिळत आहे. आरक्षित प्रभागांमध्ये आरपीआय आठवले गट सक्रिय आहे. जेल रोड भीमनगर भागात कवाडे गटाचा दबदबा आहे. नाशिक रोडमध्ये शिवसेनेच्या रुपाने नयना घोलप यांना महापौरपद मिळाले होते. त्या खालोखाल उपमहापौरपद आजपर्यंत नाशिक रोडमध्ये बाबा सदाफुले आणि रंजना बोराडे यांनी भूषविले आहे, म्हणून नाशिक रोडला पुन्हा एकदा महापौरपदाची संधी मिळायला हवी, यासाठी भाजपा- शिवसेना सरसावले आहेत.

मनसेची भिस्त युवा आघाडीवर

नाशिक रोड परिसरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची भीस्त सध्या युवा आघाडीवर आहे. गेल्या पंचवार्षिकला पाच नगरसेवक निवडून आले होते. त्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केला. त्यामुळे मनसे नाशिक रोडमध्ये सध्या कार्यकर्त्यांची संख्या विरळ पाहायला मिळत आहे. युवा कार्यकर्ते श्याम गोहाड किशोर जाचक, बंटी कोरडे, नितीन धनापुने, विक्रम कदम यांच्याबरोबर साहेबराव खर्जुल सध्या मनसेचे अस्तित्व टिकविण्यासाठी नाशिक रोडमध्ये झटत आहेत. त्यामुळे मनसेने युती केल्यास मनसेतील इच्छुकांच्या आशा पल्लवित होणार आहेत.

हेही वाचा: संयुक्त किसान मोर्च्याकडून PM मोदींना खुलं पत्र; केल्या सहा मागण्या

राष्ट्रवादीने फुंकले रणशिंग

नगरसेवक जगदीश पवार यांच्या रूपाने राष्ट्रवादी काँग्रेसला प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळत आहे. सध्या नाशिक रोडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या दबदबा मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरवात झाली आहे. सत्तेभोवती लोक केंद्रित होत असतात, म्हणून नाशिक रोडमध्ये भुजबळांचा होल्ड दिसायला लागला आहे. त्याचा इफेक्ट निवडणुकीत दिसून येणार आहे. शेतकरी आंदोलनापासून, तर पक्षाच्या लहान-मोठ्या कार्यक्रमांना कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजेरी लावत आहेत. पक्षाचे कॅम्पेनिंग सध्या जोरदार सुरू असल्याने देवळाली मतदारसंघात येणारा महापालिकेचा परिसर आमदार सरोज अहिरे पिंजून काढत आहेत.

आजी-माजी आमदारात सुरस

गेल्या ३० वर्षापासून देवळाली मतदारसंघ शिवसेनेच्या ताब्यात होता. अडीच वर्षांपूर्वी राष्ट्रवादीच्या ताब्यात आल्यामुळे सध्या माजी समाज कल्याणमंत्री बबनराव घोलप व माजी आमदार योगेश घोलप यांच्याविरोधात आमदार सरोज अहिरे यांनी रणशिंग फुंकले आहे. महाविकास आघाडीच्या पॅटर्ननुसार तिकीट वाटप झाले, तर आजी- माजी आमदारांबरोबरच प्रचार करावा लागेल. तिकीट वाटपावरून मोठे वाद होण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्यावेळी घोलप यांच्या घरात दोन तिकिटे गेल्यामुळे मतदारांनी तनुजा व नयना घोलप यांना नाकारले होते. त्यामुळे यंदा घोलप कुटुंबीय महारपालिकेची निवडणूक लढविणार का, हेच पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

वेट ॲन्ड वॉच

येत्या पंचवार्षिकमध्ये भाजप आणि सेनेला सर्वाधिक पसंती मिळल्याने या पक्षाकडे इच्छुकांची सर्वांत जास्त संख्या असल्याचे दिसते. प्रभागाचे नकाशे तयार होत नाही, तोपर्यंत इच्छुकांनी ‘वेट ॲन्ड वॉच’ला प्राधान्य दिले आहे. त्यानंतर पक्षांतर मोठ्या प्रमाणावर होणार असून, इच्छुकांनी आपले प्रभाव क्षेत्र तयार करायला आताच सुरवात केली आहे.

कनेक्टिव्हिटीचे अजब फंडे

सध्या इच्छुक उमेदवार व विद्यमान नगरसेवक मतदारांशी संपर्क राहावा, म्हणून वेगवेगळे फंडे वापरत आहेत. मिसळ पार्टी, क्रिकेटचे सामने, वाढदिवस, विकासकामांच्या उद्‌घाटनाचे इव्हेंट, सोशल मीडियावर शुभेच्छा संदेश, वेगवेगळ्या मित्रमंडळांना जेवण पार्ट्या, होर्डिंग, दहावी-बारावीतील गुणवंत सत्कार, असे फंडे वापरत आहे. त्यामुळे इच्छुकांच्या ॲक्टिव्हिटीमुळे मतदारांची चांगलीच चंगळ होत आहे

loading image
go to top