Nashik: प्रारूप प्रभागरचनेचा कच्चा आराखडा आयुक्त कैलास जाधव यांना सादर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

nashik-municipal-corporation

प्रारूप प्रभागरचनेचा कच्चा आराखडा आयुक्त कैलास जाधव यांना सादर

नाशिक : राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार महापालिका निवडणुकीसाठी तयार करण्यात आलेल्या कच्चा प्रभागरचनेचा आराखडा महापालिका आयुक्त कैलास जाधव यांना सादर करण्यात आला आहे. आयुक्तांकडून छाननी झाल्यानंतर २९ नोव्हेंबरला आयोगाकडे सादर केला जाणार आहे.

पुढील वर्षाच्या प्रारंभी राज्यातील २२ महापालिकांची निवडणूक होत असून, त्यासाठी त्रिसदस्यीय प्रभागरचना घोषित करण्यात आली आहे. कोरोनामुळे २०२१ मध्ये जनगणना न झाल्याने २०११ च्या लोकसंख्येनुसार कच्ची प्रभागरचना तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दहा वर्षात झालेली लोकसंख्यावाढ गृहीत धरून निवडणूक होणाऱ्या प्रत्येक महापालिकेत अकरा नगरसेवकांची संख्या वाढवून देण्यात आली आहे.

हेही वाचा: ममतांचे आमंत्रण मोदींनी स्वीकारले

त्यामुळे त्रिसदस्यीय प्रभागरचना करताना तीन सदस्यांचे ४३, तर चार सदस्यांचा एक असे एकूण ४४ प्रभाग अस्तित्वात येणार आहे. महापालिका आयुक्तांच्या दालनाशेजारी प्रभागरचना तयार करण्याचे काम सुरू होते. गोपनीय पद्धतीने काम सुरू असताना कर्मचाऱ्यांना मोबाईल बंद करणे सक्तीचे होते. सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या देखरेखीखाली कामकाज सुरू होते. राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार प्रारूप प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे काम पूर्ण झाले असून, आयुक्त कैलास जाधव यांना सादर करण्यात आला.

आयुक्तांकडून कच्च्या प्रारूप आराखड्याची छाननी केल्यानंतर निवडणूक आयोगाला सादर केला जाणार आहे. २९ नोव्हेंबरच्या आत आराखडा गोपनीय पद्धतीने सादर केला जाणार आहे. प्रगणक गट, प्रभाग दर्शविणाऱ्या केएमएल फाइल, सर्व प्रभाग व त्यामध्ये समाविष्ट प्रगणक गट व लोकसंख्येची माहिती राहणार आहे.

हेही वाचा: दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं... “कॉसमॉस नावाचा निसर्गाचा शत्रू

डिसेंबरअखेर अंतिम आराखडा

प्रभागरचनेचा कच्चा आराखडा तयार करण्यात आल्याने निवडणुकीच्या तयारीचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. निवडणूक आयोगाकडून आराखडा अंतिम केला जाईल. त्यानंतर हरकती व सूचना मागविल्या जातील. त्यानंतर अनुसूचित जाती, जमाती, इतर मागास वर्ग, महिलांसाठी आरक्षण टाकले जाईल. दरम्यान, पहिला टप्पा पूर्ण झाल्याने कोणाचा प्रभाग तुटला, कोणता भाग जोडला, याकडे इच्छुकांचे लक्ष लागले आहे.

loading image
go to top