esakal | जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट! ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येने गाठला उच्चांक
sakal

बोलून बातमी शोधा

corona

जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट! ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येने गाठला उच्चांक

sakal_logo
By
अरुण मलानी

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा विळखा अधिक घट्ट होत चालला असून, ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णसंख्येने प्रथमच चाळीस हजारांचा आकडा ओलांडला आहे. सोमवारी (ता. १९) दिवसभरात सहा हजार ८४५ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आले आहेत. एका दिवसात आढळलेली ही उच्चांकी संख्या ठरली आहे. दुसरीकडे मृतांची संख्यादेखील आटोक्‍याबाहेर असून, जिल्ह्यात चाळीस बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे.

यापूर्वी बुधवारी (ता. १४) दिवसभरात सहा हजार ८२९ कोरोनाबाधित आढळले होते. आतापर्यंतची ही उच्चांकी संख्या ठरली होती. परंतु चारच दिवसात नव्‍याने आढळणाऱ्या कोरोनाबाधितांच्‍या संख्येने पुन्‍हा उच्चांक गाठला आहे. इतकेच नव्हे, तर सध्या उपचार घेत असलेल्‍या ॲक्‍टिव्‍ह रुग्‍णांची संख्यादेखील विक्रमी झाली आहे. सद्यःस्‍थितीत जिल्ह्यात ४१ हजार १५५ बाधित उपचार घेत असून, यापैकी नाशिक महापालिका क्षेत्रातील २३ हजार ३३२, नाशिक ग्रामीणमधील १५ हजार ६८१, मालेगावचे दोन हजार चार, जिल्‍हाबाहेरील १३८ बाधितांवर सध्या उपचार सुरू आहेत.

हेही वाचा: एकाच आठवड्यात कुटुंब उद्ध्वस्त! महापालिकेच्या ‘बिटको’तील अव्यवस्थेचे तीन बळी

दिवसभरात आढळलेल्‍या कोरोनाबाधितांमध्ये नाशिक महापालिका क्षेत्रातील तीन हजार ८७०, नाशिक ग्रामीणमधील दोन हजार ७४८, मालेगाव महापालिका क्षेत्रातील १६१, तर जिल्‍हाबाहेरील ६६ रुग्‍णांचा अहवाल पॉझिटिव्‍ह आला आहे. तुलनेत बरे झालेल्‍या रुग्‍णांची संख्या चार हजार ११७ होती. दरम्‍यान, जिल्ह्यात झालेल्‍या चाळीस मृत्‍यूंपैकी सर्वाधिक २१ मृत नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. नाशिक ग्रामीणमधील १९ बाधितांचा कोरोनाने बळी घेतला आहे. मृतांमध्ये आहेरखेड (ता. चांदवड) येथील २६ वर्षीय, पंचक परिसरातील २८ वर्षीय युवकासह पंचवटीतील रोहिणीनगरमधील ३५ वर्षीय, जेल रोडवरील ३७ वर्षीय युवकाचा कोरोनामुळे मृत्‍यू झाला आहे.

दरम्‍यान, जिल्‍हाभरातील रुग्‍णालये व गृहविलगीकरणात सहा हजार ७५७ रुग्‍ण दाखल झाले आहेत. यापैकी सहा हजार ४५६ रुग्‍ण नाशिक महापालिका क्षेत्रातील आहेत. तर जिल्‍हा रुग्‍णालयात सोळा, डॉ. वसंत पवार वैद्यकीय महाविद्यालयात २३, नाशिक ग्रामीण रुग्‍णालयात २१७, मालेगाव महापालिका क्षेत्रात ४५ संशयित रुग्‍ण दाखल झाले आहेत.

जिल्ह्यात दहा लाख चाचण्या

रुग्‍णसंख्येसोबत चाचण्यांचा वेगही वाढला आहे. जिल्ह्यातील एकूण स्‍वॅब चाचण्यांच्‍या संख्येने सोमवारी दहा लाखांचा आकडा ओलांडला. आतापर्यंत जिल्ह्यात दहा लाख १८ हजार ५२० चाचण्या झाल्या आहेत. यापैकी सात लाख ४२ हजार ८२ जणांचे अहवाल निगेटिव्‍ह आले आहेत. दोन लाख ७० हजार ६१५ रुग्‍णांचे अहवाल पॉझिटिव्‍ह आल्‍याने त्‍यांना कोरोनाची लागण झाल्‍याचे निष्पन्न झाले आहे. सायंकाळी उशिरापर्यंत पाच हजार ८२३ अहवाल प्रलंबित होते.

हेही वाचा: नाशिकमध्ये मृतांच्या आकड्यांचा खेळ; 15 दिवसांत 2 हजारांहून अधिक दहन

loading image