esakal | सात बारा उताऱ्यावरील ५४ हजार नोंदी कमी - विभागीय आयुक्तांचा पुढाकार
sakal

बोलून बातमी शोधा

7/12

सात बारा उताऱ्यावरील ५४ हजार नोंदी कमी

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक : सातबारा उताऱ्यावरील कालबाह्य नोंदी कमी करण्याची नाशिक महसूल विभागात मोहीम राबविण्यात येत आहे. विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या पुढाकारातून सुरु झालेल्या सातबारा उताऱ्यावरील अनावश्यक बोजा, नोंदी कमी करण्यामुळे शेतकऱ्यांना खरेदी-विक्री, कृषी कर्ज घेण्यास अडचणी दूर होण्यास मदत होणार आहे.

अनेक जटील प्रश्न लागले मार्गी

शेतकरी व सामान्य नागरिकांच्या जमिनीच्या मालकी हक्काचा पुरावा असलेल्या सात-बारा उताऱ्यांवर गेल्या अनेक वर्षांपासून इतर हक्कांमध्ये तगाई, बंडिंग, सावकारी बोजे आणि नजर गहाण यासह अस्तित्वात नसलेल्या संस्थांच्या नावाच्या विविध बोजांच्या नोंदी आहेत. जमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरील जुन्या सावकारी कर्जांच्या नोंदीमुळे अनेक जटिल प्रश्न निर्माण होत होत्या. त्यामुळे शेतकरी व नागरिकांना जमिनीची खरेदी विक्री करताना आणि संपादित जमिनीचा मोबदला वाटप करताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यामधून अनेक वाद निर्माण होत होते. ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून अशा प्रकारच्या नोंदी निर्गत करण्याची धडक मोहीम घेऊन कालबाह्य नोंदी कमी करण्याचे आदेश विभागातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना नाशिक विभागीय महसूल आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिले होते.

हेही वाचा: मनसे काळातील प्रकल्प ऊर्जितावस्थेत आणणार

५४ हजार १५० नोंदी कमी

उत्तर महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यात सात-बारा उताऱ्यांची एकूण संख्या ४६ लाख ९७ हजार १२२ एवढी असून यापैकी ७५ हजार ९९९ एवढ्या सात-बारा उता-यांवरील इतर हक्कात कालबाह्य नोंदी होत्या. ज्यामध्ये नाशिक जिल्ह्यात १७ हजार ९८८, धुळे जिल्ह्यात ६ हजार ४७८, नंदुरबार जिल्ह्यात ६ हजार ९८६, जळगाव जिल्ह्यात ३२ हजार ५५ आणि नगर जिल्ह्यात १२ हजार ४९२ कालबाह्य नोंदी होत्या. ऑगस्ट महिन्यापासून सात-बारा उताऱ्यातील कालबाह्य नोंदी कमी करण्याची धडक मोहीम हाती घेतल्यानंतर मागील दोन महिन्यात एकूण ५४ हजार १५० कालबाह्य नोंदी कमी करण्यात आलेल्या आहेत.

कमी केलेल्या नोंदी

नाशिक ८ हजार ५५२,

धुळे ४ हजार ७९८,

नंदुरबार ६ हजार ००४,

जळगाव २५ हजार ५४९

नगर ९ हजार २८७

हेही वाचा: दहावी-बारावीच्या सतरा नंबर फॉर्मसाठी संपेना अडथळ्यांची शर्यत

शेतकरी व सामान्यांंना फायदा

''सात-बारा उता-यावरील कालबाह्य नोंदी कमी झाल्यामुळे महसूली अभिलेख परिपूर्ण व दोषविरहित होऊन शेतकरी व सामान्य नागरिकांना त्याचा निश्चितच फायदा होईल. राज्यातील ही एक अभिनव मोहीम असून अभिलेखे दोषविरहित झाल्याने वाद विवाद कमी होतील.'' - राधाकृष्ण गमे, विभागीय आयुक्त नाशिक

''माझ्या सातबाऱ्यावरील अनावश्यक नोंदी कमी झाल्यामुळे मला कृषी कर्ज तत्काळ मार्गी लागले." - श्रीकृष्ण पांडुरंग धांडे, फत्तेपूर (ता.जामनेर, जळगाव)

''माझ्या रावेर तालुक्यातील खिरोदा गावातील गट नं-९४ मधील जमिनीवर असलेला तगाई कर्जाचा अतिशय जुना कालबाह्य बोजा रद्द केल्याबद्दल मी महसूल विभागाचा आभारी आहे." - सतीष चौधरी, खिरोदा ता. रावेर.

loading image
go to top