esakal | नाशिककरांसाठी धोक्याची घंटा! लिक्विड ऑक्सिजन मिळण्याचे प्रमाण झाले कमी

बोलून बातमी शोधा

oxygen cylinder
नाशिककरांसाठी धोक्याची घंटा! लिक्विड ऑक्सिजन मिळण्याचे प्रमाण झाले कमी
sakal_logo
By
महेंद्र महाजन

नाशिक : ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे, टँकरसाठी विशेष व्यवस्था असे धोरणात्मक निर्णय घेतले जात असले, तरीही नाशिककरांच्या दृष्टीने ऑक्सिजनची धोक्याची घंटा वाजू लागली आहे. शहराला पुरवठा होत असलेल्या लिक्विड ऑक्सिजनचा एक टँकर तीन दिवसांमधून एकदा कमी मिळू लागला आहे.

परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता

मुरबाडच्या कंपनीत नाशिककरांच्या ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांचे टँकर चोवीस तास उभे राहण्याचे प्रमाण वाढत आहे. एका कंपनीचा सतरा टनाचा एक टँकर रविवारी (ता. १८) दुपारी दीडला पोचला होता. त्यात लिक्विड ऑक्सिजन भरून सोमवारी सायंकाळी सहाला मिळाला. तसेच, रविवारी पहाटे पाचला पोचलेल्या वीस टनाच्या टँकरमध्ये लिक्विड ऑक्सिजन भरून हा टँकर दुपारी दीडला नाशिकमध्ये आला आहे. दरम्यान, नाशिकला पुरवठा होणाऱ्या लिक्विड ऑक्सिजनची संबंधित कंपन्यांना बेल्लारी आणि जामनगरहून उपलब्धता होते. तेथून लिक्विड ऑक्सिजन मिळण्याचे प्रमाण कमी झाल्याची माहिती नाशिककरांपर्यंत पोचली आहे. प्रत्यक्षात ऑक्सिजन उत्पादक कंपन्यांच्या म्हणण्यानुसार नाशिकसाठीचे टँकर उभे करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे शहर आणि जिल्ह्यासाठी ऑक्सिजनचा तुटवडा दिवसेंदिवस वाढत आहे. अगोदरच कोरोनाग्रस्त रुग्ण आणि त्यांच्यासाठी लागणाऱ्या ऑक्सिजनचे प्रमाण एकीकडे वाढत असताना तीन दिवसांतून एकदा टँकरभर कमी लिक्विड ऑक्सिजन मिळण्याची स्थिती कायम राहिल्यास येत्या काही तासांत नाशिकची परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता आहे. यावर जिल्हा प्रशासनाकडून कसा मार्ग काढला जाणार, याकडे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांच्या नजरा लागल्या आहेत.

हेही वाचा: लग्नाचा बार उडाला पण संपूर्ण वऱ्हाडी मंडळी संकटात!

नाशिकची गरज ४० टनाने वाढली

नाशिकची गरज ४० टनाने वाढली आहे. जिल्हा रुग्णालयासाठी दिवसाला अडीच टनावरून सहा ते साडेसहा टन, तर ग्रामीण रुग्णालयांसाठी पाच टन ऑक्सिजन उपलब्ध करावा लागतो. अशातच, घरगुती उपचार घेणाऱ्या रुग्णांना ऑक्सिजनचे सिलिंडर भरून द्यावे लागत आहे. एका उत्पादक कंपनीच्या माहितीनुसार घरगुती रुग्णांना दिवसाला एक टन ऑक्सिजन भरून द्यावा लागत आहे. त्यामुळे लिक्विड ऑक्सिजनसाठी चोवीस तास टँकर उभे राहू लागल्यास ‘एक ना धड भाराभर चिंध्या’ या उक्तीनुसार ऑक्सिजनच्या उपलब्धतेची अवस्था होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

नाशिककरांसाठी ऑक्सिजनची उपलब्धता व्हावी म्हणून पालकमंत्री छगन भुजबळ स्वतः मुंबईतील कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलत आहेत. एका उत्पादकांच्या टँकरचा घोटाळा झाला असताना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली. आता टँकर उभे राहण्याची समस्या दूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील.

- समीर भुजबळ (माजी खासदार)

हेही वाचा: नाशिकमध्ये गंभीर प्रकार! मृत कोरोना महिलेचे हॉस्पिटलमध्ये मंगळसूत्र चोरीला