Nashik Kailas Math : 108 किलो भस्म केदारनाथ धामला अर्पण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Kedarnath Temple

Nashik Kailas Math : 108 किलो भस्म केदारनाथ धामला अर्पण

नाशिक : केदारनाथ, बद्रीनाथ, गंगोत्री, यमुनोत्री ही हिमालयातील धार्मिक स्थळे आहेत. ज्यांना हिमालयातील चार धाम असेही म्हटले जाते. हिवाळ्यात या मंदिरांचे द्वार बंद केले जातात. केदारनाथ येथे मंदिराचे द्वार बंद करण्याआधी मंदिरात भगवंताचे समाधी पूजन केले जाते. या समाधी पूजनासाठी येथील कैलास मठ येथून १०८ किलो भस्म अर्पण केला जातो. (Nashik Kailas Math Offering 108 kg of Bhasma to Kedarnath Dham Nashik News)

हेही वाचा: Tulsi Vivah 2022 : आजपासून तुलसीविवाहास प्रारंभ

हिमालयातील चार धाम तीर्थातील एक धाम केदारनाथ मंदिर हे सहा महिने भाविकांना दर्शनासाठी उघडे असते, तर हिवाळ्यातील अति शीतलतेमुळे सहा महिने मंदिराचे द्वार बंद करण्यात येते. या काळात मंदिरांचे द्वार बंद करण्याआधी येथे समाधी पूजन केले जाते. या वेळी उपस्थित भाविक, पुरोहितांकडून मंत्रोच्चाराच्या गजरात विधीवत पूजाअर्चा केली जाते. भगवान शंकराला जल, घृत, धान्य, फळ, यासह भस्म अर्पण केला जातो व देवांची शेज आरती करून मंदिराचे कपाट सहा महिन्यांसाठी बंद केले जाते.

या समाधी पूजेप्रसंगी नाशिक येथील कैलास मठ येथून श्री. स्वामी संविदानंद सरस्वती यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी १०८ किलो भस्म तथा पुष्प, फळ अर्पण केले जातात. ज्या वेळी मंदिरांचे द्वार उघडले जाते त्या वेळी देवतांना अर्पण केलेली ही सामग्री भाविकांना प्रसाद रूपाने दिली जाते. या प्रासादातून भाविकांना भगवंताचे आशीर्वाद प्राप्त होऊन दुःख, दोष अन् दारिद्र्य हरण होते असे स्वामी संविदानंद सांगतात.

देवर्षी नारद करतात भगवंताचे पूजन

शास्त्रात अशी मान्यता आहे, की हिमालयातील चार धाम येथे सहा महिने मनुष्य पूजन करतात आणि सहा महिने देवर्षी नारद भगवंताचे पूजन करतात. ज्या वेळी मंदिराचे द्वार बंद होते. त्या वेळी समाधी पूजन करून देवर्षी नारद यांना पूजनाचे अधिकार हस्तांतरित केले जातात, अशी माहिती स्वामी संविदानंद यांनी दिली.

हेही वाचा: SAKAL Exclusive : गडावर 2 स्वतंत्र मार्गांचा विचार; 4 रोप वे करण्याचे नियोजन